आकलन : आर्थिक विकास आणि जनतेचे समाधान Print

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

देशाच्या वाढत्या जीडीपीबरोबर जनतेचे समाधान वाढले पाहिजे, पण तसे होत नाही, कारण आर्थिक सुधारणा स्वीकारण्यास योग्य अशी मानसिकता बनलेली नसते. आर्थिक सुधारणांमुळे थोडी अस्थिरता येत असली तरी स्थिरतेचा हव्यास माणसाचा उत्कर्ष रोखतो.
जनतेच्या हातात अधिक पैसा दिला की जनता समाधानी होत जाते हे सर्वमान्य गृहीतक. या गृहीतकावरच सर्व देशातील धोरणे ठरविली जातात. देशाच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडय़ाला महत्त्व येते ते या गृहीतकामुळे. भारताचा विकास दर आठ टक्क्यांच्या वर गेला म्हणजे भारतातील अधिक लोक श्रीमंत झाले, म्हणजेच भारतात अधिक समाधान नांदू लागले, असे तर्कशास्त्र मांडले जाते.


आर्थिक विकास आणि जनतेचे समाधान यातील परस्परसंबंध तपासण्याचा यत्न समाजशास्त्रज्ञांनी केला. पैसा अधिक मिळाला की माणसाचा आनंद वाढतो, असेच १९४७ सालापासून अमेरिकेत झालेल्या बहुतेक पाहण्यांमध्ये आढळून आले. पैसा म्हणजेच आनंद हे या पाहणीतील निष्कर्ष अमेरिकी भांडवलशाहीला बळकटी देणारे होते. समाधानाचा मार्ग भांडवलशाहीतून जातो असे गृहीतक तेव्हा मांडले गेले. आजही त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. भारतातील सर्व क्षेत्रांतील पुढारी वर्ग असाच विचार करतो.
दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक व अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड ईस्टरलीन यांनी मात्र १९७२मध्येच वेगळा विचार मांडला. अमेरिकेतील विविध पाहण्यांची जगातील तशाच पाहण्यांशी तुलना करता त्यांना वेगळा निष्कर्ष दिसला. पैसा मिळाल्याने आनंद वाढतो. कारण माणसाच्या क्षमता वाढतात. मात्र काही वर्षांची सलग पाहणी केली तर पैसा वाढला तरी एकूण समाधान कमी झालेले आढळते. ईस्टरलीनच्या या निष्कर्षांने अन्य अनेकांना या संशोधनाकडे वळविले. त्यातून अर्थशास्त्र व आनंदी जीवन यांचा परस्परसंबंध तपासणारी  शाखाच जन्माला आली. अर्थशास्त्राला समाजशास्त्र, मानसशास्त्र व आता मेंदूविज्ञान यांची जोड देऊन माणसाच्या समाधानाचा अभ्यास सुरू झाला. ईस्टरलीन यांची ही कामगिरी नोबेल मिळण्याइतकी महत्त्वाची मानली जाते.
आर्थिक विकासाचे उत्तम परिणाम ईस्टरलीन यांना अमेरिकेत दिसत होते. अर्थशास्त्रीय पाहण्यांतून तेच दिसत होते. तोच प्रकार जगात इतरत्र होतो काय याचा त्यांना अभ्यास करायचा होता. ९०मध्ये युरोपातील अनेक देश रशियाच्या पंजातून मोकळे झाले. या देशांमध्ये अमेरिकेप्रमाणे मुक्त अर्थव्यवस्था राबविण्यास हळूहळू सुरुवात झाली. याच वेळी चीनमध्ये डेंग यांनी धडाक्याने हाच प्रयोग सुरू केला. या सर्व घडामोडी त्या त्या देशांतील जनतेच्या मनावर खोल परिणाम करीत होत्या. ईस्टरलीन यांच्यासाठी ही भव्य प्रयोगशाळाच होती. १९९०पासून आशिया, आफ्रिका, युरोप व अमेरिका येथील बदलती आर्थिक धोरणे व तेथील जनतेचे समाधान यातील परस्परसंबंध तपासणाऱ्या अनेक पाहण्या हाती घेण्यात आल्या. यापैकी काही ईस्टरलीन यांनीच केल्या, तर अन्य अनेक मान्यवर संस्थांकडून करून घेण्यात आल्या.
चीनकडे ईस्टरलीन यांचे विशेष लक्ष होते.  २० वर्षांत तेथील उत्पन्न जवळपास चौपट वाढले होते. उत्पन्नात अशी घसघशीत वाढ अगदी अमेरिकेतसुद्धा कधी घडली नव्हती. चीनमध्ये असा मुबलक पैसा खेळू लागल्यावर तेथील जनता त्याच पटीत समाधानी होणे अपेक्षित होते, पण ईस्टरलीन यांना थोडे वेगळे चित्र दिसले. सुधारणांच्या पहिल्या टप्प्यात चिनी जनता खूप आनंदी होती, पण नंतर तो आनंद कमी होत गेला. इतकेच नव्हे तर १९९०पूर्वी, म्हणजे आर्थिक सुधारणा राबविल्या जाण्यापूर्वी जनता जितकी समाधानी होती, जवळपास तितकीच आता आहे असेही दिसले. वेगवेगळ्या मार्गानी केलेल्या पाहण्यातूनही हाच निष्कर्ष समोर आला.  
पूर्व युरोपीय देशातही असेच आढळून आले. तेथील जनताही पूर्वी अधिक समाधानी होती. या लोकांची भौतिक सुखे आता निर्विवाद वाढली आहेत. अनेक वस्तूंचा सुकाळ झाला आहे. पूर्वी साधा विजेचा दिवा दुरापास्त होता. आता प्रत्येकाच्या घरात दोन टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आहेत. गाडी घेणे, परदेश प्रवास यांचे अप्रूप संपले. अनेकांच्या दोन गाडय़ा आहेत. जेवणाखाण्याची तर ददात नाही, तरी समाधान मात्र कमी होत चालले आहे.
असे होण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत असे ईस्टरलीन सांगतात. पहिले कारण म्हणजे आर्थिक विकासामुळे वाढणाऱ्या जनतेच्या आशा-आकांक्षा. पैसा हाती आला की माणसांच्या इच्छांची संख्या व तीव्रता दोन्ही एकाच वेळी वाढते. याचा थेट परिणाम मन:स्थितीवर होतो. आर्थिक विकासामुळे माणसाच्या हातातील पैसा वस्तुत: वाढलेला असतो, पण त्याच वेळी पूर्ण न झालेल्या इच्छांची संख्याही वाढलेली असते. पूर्ण झालेल्या इच्छांपेक्षा पूर्ण न झालेल्या इच्छांची संख्या बरीच वाढल्यामुळे वस्तुत: आनंदी होण्यासारखी स्थिती असूनही माणूस असमाधानी राहतो.
चीनमध्ये ग्रामीण व शहरी भागांतील उत्पन्नात तिपटीहून अधिक फरक आहे.  शहरात आलेल्याचे उत्पन्न तिपटीने वाढते, परंतु तरीही गावातील चिनी माणूस शहरी चिनी माणसापेक्षा समाधानी आढळतो. उत्पन्नासह शहरी माणसाच्या समस्याही वाढतात. त्या समाधान हिरावून घेतात.
लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्या’त मांडलेल्या गणिती समीकरणाची इथे आठवण येते. जर्मन तत्त्वज्ञ शौपेनहावर याचा दाखला यासंदर्भात लोकमान्यांनी दिला आहे. माणसाच्या मनातील एकूण इच्छांपैकी (सुखेच्छा) जितक्या सफल होतील (सुखोपभोग) तितका तो सुखी आणि जितक्या अपूर्ण राहतील तितका तो दु:खी असे मानले जाते. म्हणजे पूर्ण झालेल्या इच्छांना (सुखोपभोगाला) मूळ इच्छांच्या संख्येने (सुखेच्छांनी) भागले की माणसाच्या सुखाचा अपूर्णाक काढता येईल, परंतु हा अपूर्णाक असा काही विलक्षण आहे की त्याचा छेद म्हणजे सुखेच्छा ही त्याचा अंश म्हणजे सुखोपभोग याच्यापेक्षा नेहमीच अधिक प्रमाणाने वाढते. म्हणजे हा अपूर्णाक प्रथम १/२ असा असला तर थोडय़ाच दिवसांत तो ३/१० असा होतो आणि पुढे अधिकाधिक अपूर्णच होत जातो, असे लोकमान्य सांगतात. आर्थिक विकासामुळे पगार वाढतो, पण त्याबरोबर, सुखेच्छा, म्हणजे छेद कित्येक पटीनी वाढला आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. ईस्टरलीनचे संशोधन ते लक्षात आणून देते.
अर्थात याचा अर्थ गरिबीचे गोडवे गात बसावे असा नाही. धट्टीकट्टी गरिबी हे भ्रामक समाधान असते आणि  लोकमान्यांनीही त्याबद्दल स्पष्ट शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. ऐश्वर्य व ज्ञान याबाबत माणसाने कायम असमाधानी असावे असे लोकमान्य सांगतात. मात्र समाधानाचा वर उल्लेख केलेला अपूर्णाक मर्यादेत कसा राहील याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे व त्यासाठी बुद्धी स्थिर करावी, असे त्यांनी गीतारहस्यात सुचविले आहे.
मात्र ईस्टरलीनने दिलेले दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे. माणसाचे समाधान फक्त पैशामध्ये नसते, तर समाधानाच्या जागा अनेक ठिकाणी विखुरलेल्या असतात. नोकरीची शाश्वती, निवृत्तिवेतनाची हमी, कुटुंबातील स्थैर्य, स्वस्त आरोग्यसेवा, मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय, परवडणारी घरे, मित्रमंडळींसह घालविण्यासाठी मोकळा वेळ अशा प्रमुख घटकांमध्ये माणसाचे समाधान विखुरलेले असते. आर्थिक सुधारणांमुळे पैसा मिळतो, पण समाधान देणारे हे सर्व घटक काढून घेतले जातात. चीनमधील कामगारांना पूर्वी पैसा खूप कमी मिळत होता, पण नोकरीची शाश्वती होती. मोफत आरोग्यसेवा होती. मुलांसाठी स्वस्त शिक्षण होते. कुटुंबात एकत्र राहता येत होते. जागा स्वस्त होत्या. आता पगार खूप वाढले, पण नोकरीची शाश्वती राहिली नाही. निवृत्तिवेतनाची सोय बचतीतून करावी लागली. घरांसाठी कर्ज घेणे व ते वेळेत फेडणे आवश्यक झाले. चिनी कामगारासाठी हा सांस्कृतिक धक्का होता. त्याला आपली मानसिकताच बदलावी लागली. पैशासाठी कष्ट करण्याची मानसिकता कम्युनिस्ट पक्ष शिकवत नव्हता. यामुळे चिनी माणूस गोंधळला. याचा थेट परिणाम चिनी माणसाच्या आरोग्यावर झाला. आपली प्रकृती आताशा ठीक नाही, असे सांगणाऱ्या चिनी माणसांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. १९९०पूर्वी चिनी माणूस खूप गरीब होता, तर अमेरिका अतोनात श्रीमंत होती. पण तरीही त्या वेळी अमेरिकीपेक्षा चिनी काकणभर अधिक समाधानी होता. आताचा चिनी पैशात अमेरिकेला टक्कर देत आहे, पण समाधानात मागे पडला आहे.
आर्थिक सुधारणांमुळे ‘सेफ्टी नेट’ तोडले जाते आणि त्यामुळे समाधान घटते असा ईस्टरलीन यांचा निष्कर्ष आहे. याचा अर्थ साम्यवादी रचना पुन्हा उभारा असा होत नाही, असेही ते निक्षून सांगतात. सामाजिक सुरक्षेचे जाळे घट्ट विणत आर्थिक विकास कसा साधता येईल इकडे लक्ष द्या, असे त्यांचे सांगणे आहे. अमेरिकेने तसे केले. तेथील जीवन कमालीचे स्पर्धात्मक आहे, परंतु तेथे जनतेसाठी सेफ्टी नेट तयार झाले आहे. युरोपीय देशातही अशीच सामाजिक सुरक्षा आहे. अर्थात ही सुरक्षा टिकविण्यासाठी बराच पैसा लागतो व तो कष्टाविना मिळत नाही, म्हणून स्पर्धा व किमान स्थिरता याचा मेळ घालावा लागतो. चीनने तसे करावे म्हणून चीन कम्युनिस्ट पार्टीच्या १८व्या काँग्रेसच्या निमित्ताने ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ईस्टरलीन यांनी लेख लिहून तसे आवाहन चीनला केले आहे.
आपणही त्याच मार्गावरून चाललो आहोत, त्याच अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. आर्थिक विकास व सामाजिक सुरक्षा यांचा समतोल साधणाऱ्या धोरणांची आपल्याला गरज पडणार आहे. सुरक्षा हवीच, पण सामाजिक सुरक्षेसाठी पैसा लागतो व तो आर्थिक सुधारणांशिवाय मिळत नाही हे समजून आपल्याला मानसिकता बदलावी लागेल.
‘आजूबाजूची घरे सारखीच असतील तर कोणतेच घर लहान वाटत नाही, पण शेजारी वाडा उभा राहिला की पूर्वीचे लहान घर आताची झोपडी ठरते,’ असे अत्यंत सारगर्भ विधान कार्ल मार्क्‍स यांनी केले होते. चीन, भारतासह अनेक देशांतील मध्यमवर्गाला हाच अनुभव येतो. कारण बदलत्या जगानुसार त्याने आपला दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. झोपडीचे कौतुक करण्यापेक्षा वाडा उभारण्याची ईर्षां त्याला जागवावी लागेल.