अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १८९. व्यापकाचे दर्शन Print

चैतन्य प्रेम, शनिवार, १ सप्टेंबर २०१२
भगवंताचं जे व्यापक, विराट रूप अर्जुनानं पाहिलं तेच भावभक्तीनं भक्ताच्या आवाक्यात येतं. त्या अनंताला जाणणाराच मग अनंत होऊन जातो. अनेकानेक संतांनी त्याचे दाखले दिले आहेत.

चांगदेव आणि मुक्ताबाईच्या संवादाचे जे अभंग आहेत त्यापैकी एकात चांगदेव म्हणतात, ‘‘अवघीया डोळा पाहू गेलीये। तंव अवघा अवघेंचि जालिये।।’’ अवघीया डोळा! संपूर्ण लक्ष त्या परमात्म्याकडे दिलं तरच हे शक्य आहे. अर्धअधिक लक्ष दुनियेकडे आणि कसंतरी भगवंताकडे, अशानं ते साधणार नाही. जेव्हा पूर्ण लक्ष अवघ्या एका भगवंताकडे एकवटेल तेव्हा त्या अवघ्याला पाहताना मीच अवघा एकरूप होऊन गेलो! आणखी एका अभंगात मुक्ताबाईचा अनुभव चांगदेव सांगतात, ‘‘आकार पूजिता निराकार जालें। शून्यी बुडालें बाईयानो।। शून्याचा अंकुर शून्य फळलें। व्योमाकार जालें मन तेथें।। तेथें फळ ना डाळ जाति ना कुळ। वटेश्वर चांगा जाला निर्मूळ।।’’ आकारात सामावलेल्या व्यापकाची पूजा करताना जेव्हा मी पूज्य म्हणजे शून्य झाले तेव्हा मीच निराकार झाले. सर्व आवरणांची बंधने तटातटा तुटली. मन जणू शून्यवत झालं. त्या शून्याच्या बिजातून शून्यच फळाला आलं मन व्यापक होऊन गेलं. तेथे कर्माचं फळस्वरूप प्रारब्ध उरलं नाही, इच्छांच्या फांद्या फुटल्या नाहीत, जन्मानुसार चिकटलेली जाती, कुळाचार तर कधीच संपले. मी निर्मूळ होऊन गेलो. जन्माचं जे मूळ जी वासना तीच नष्ट झाली. गेल्या भागात अर्जुनानं वर्णन केलं ना? ‘नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामे विश्वेश्वर विश्वरूप’ मुक्ताबाई तोच अनुभव मांडतात- ‘‘आदि मध्य अंतु न कळोनि प्रांतु। असे जो सततु निजतत्त्वे।।’’ हा परमात्मा सतत आहे. अखंडपणे आहेच. तो या विश्वापूर्वीही होता आणि नंतरही राहील. त्याला आदि नाही, मध्य नाही, अंत नाही. या अनंताला पहायचा उपाय काय? ‘‘कैसेनि तत्त्वतां तत्त्व पैं अनंता। एकतत्त्वें समता आपेंआप।। आप जंव नाही पर पाहासी काई। विश्वपणें होई निजतत्त्वी।। माजि मजवटा चित्त नेत तटा। परब्रह्म वैकुंठा चित्तानुसारें।।’’ अनंताशी एकत्वानं समता साधली तर आपोआप तो आकळतो. पण जिथे आत्मस्वरूपाला तू पूर्णपणे जाणलं नाहीस तिथे त्या परमात्म्याला तू काय पाहाणार? मी माझेपणामध्ये चित्त अडकलं तर ते भवसागर पार काय करणार? वै म्हणजे नाश, कुंठ म्हणजे कुंठीतपणा. चित्ताच्या कुंठीतपणाचा नाश जसा होईल त्यानुसारच परब्रह्माचं दर्शन होईल. त्यासाठी मी काय करावं? मुक्ताबाई सांगतात, ‘‘मुक्ताई सांगती मुक्तनामपंक्ति। हरिनामें शांति प्रपंचाची।।’’ मुक्तीचा मार्ग मुक्ताबाई सांगत आहेत.. हरि म्हणजे हरण करणारा. त्या हरिच्या नामस्मरणाने प्रपंचाची शांती होईल. प्रपंच हा पाचांचा असतो. पंच महाभूते, पंच ज्ञानेंद्रियं, पंच कर्मेद्रियं यांनी जगाकडे असलेली माझी ओढ हाच प्रपंच आहे. ती ओढ केवळ हरिनामस्मरणाने ओसरेल. तगमग शांत होईल आणि मुक्तीचा मार्ग खुला होईल.