अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९०. श्रीपति Print

 

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२
शंकराचार्य जेव्हा सांगतात ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम् तेव्हा त्या ध्येयं शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्या अजस्त्र रूपाचं मी ध्यान करावं, हा एक अर्थ आणि भगवंताच्या व्यापक रूपाचं दर्शन हे मी ध्येय मानावं, हा दुसरा अर्थ. इथे दुसरा अर्थ आपल्यासाठी चपखल आहे. तेव्हा भगवंताचं जे व्यापक रूप आहे त्याच्या दर्शनाचं ध्येय बाळगायला शंकराचार्य सांगतात आणि त्यासाठीचा उपाय म्हणजे गेयंगीतानामसहस्त्रम् आहे, हेही सांगतात.

ते अजस्त्र रूप काय आणि ते संतांनाही भक्तिभावानं कसं आकळलं, ते आपण त्रोटकपणे जाणलं. अर्थात जे व्यापक रूप आपण गीतेच्या आधारे जाणलं तेही मर्यादितच आहे! कारण ते शब्दांत व्यक्त आहे आणि शब्दांना मर्यादा असते. जे व्यापक, अनादि, अनंत, अजर, अमर आहे त्याला शब्दांत कसं बांधता येणार? तर आपण गीतानामसहस्त्रम् अर्थात बोधाचं वाचन, मनन करू लागतो. नामस्मरणानं भगवंताशी जोडून घ्यायचाही आपण प्रयत्न करतो. विश्वेश्वराची आपण उपासना करीत असलो तरी या विश्वात भरलेल्या भगवंताला आपल्याला पाहाता मात्र येत नाही. विश्व वेगळं आणि भगवंत वेगळा, असाच आपला सहज व्यवहार आणि वर्गीकरण असतं. चराचरात भगवंत भरला आहे, असं आपण तोंडानं सहज म्हणतो पण मनानं मानत नाही. त्यामुळेच भगवंताच्या तसबिरीसमोर हात जोडणारे आपण जगाच्या व्यवहारात लांडय़ालबाडय़ाही करतो! माझ्या हाती सत्ता असेल तर चराचराला मी माझ्या तालावर नाचवू पाहातो आणि कंगाल असलो तर जगाच्या तालावर नाचत राहातो. सत्ता असली तर देवानं अशीच कृपा कायम ठेवावी, एवढीच माझी अपेक्षा असते आणि कंगाल असलो तर देवानं माझ्यावरच हा अन्याय का केला, इथपासून ते देवानं आतातरी कृपा करावी आणि आपल्या दयाळूपणाचा प्रत्यय द्यावा, इथपर्यंत मी विनवत राहातो. थोडक्यात भगवंतापेक्षाही जगाचा प्रभाव माझ्यावर फार मोठा असतो. मग हा तिढा संपणार कसा? श्रीपतिच्या अजस्त्र, व्यापक रूपाचं ध्यान मला साधणार कसं? इथे श्रीपति हा शब्दही सहज म्हणून वापरलेला नाही. भगवंताची हजारो नावे आहेत त्यातलंच कुठलंतरी वापरायचं म्हणून श्रीपती हे नाव आलेलं नाही. श्रीपती अर्थाला गहिरी छटा आहे आणि साधनेच्या मार्गावर वेडीवाकडी पावलं टाकणाऱ्याच्या मनोधारणेलाही स्पर्श करणारं हे नाव आहे. श्री म्हणजे वैभव. मी साधना सुरू करतो तेव्हा प्रथम ‘माझं भलं व्हावं’, ही प्रमुख अपेक्षा असते. हे भलं होणं म्हणजे आध्यात्मिक कल्याणाच्या अर्थानं मी मानत नसतो तर ऐहिक पातळीवरच मी सर्व चांगलं व्हावं, अशी अपेक्षा बाळगत असतो. ऐहिक, भौतिक स्थिती चांगली होणं हेच माझ्या दृष्टीने वैभव असतं. भगवंताची कृपा असते. तर या वैभवाची जी देवता, त्या ‘श्री’चा पती असा तो परमेश्वर आहे. मी त्याला वैभवाचा दाता, अशा संकुचित रूपात पाहात आहे त्याचं खरं अजस्त्र, विराट रूप पाहाण्याची आस मला लागली पाहिजे.
चैतन्य प्रेम