अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९१. पति लक्ष्मीचा! Print

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
श्रीपतीच्या व्यापक रूपाचं ध्यान करायला शंकराचार्य ज्याला सांगत आहेत तो भौतिकाच्या प्रभावाखाली अडकलेला जीव आहे. ऐश्वर्यदाता म्हणूनच तो भगवंताला भजत आहे. माझ्यासारख्या संकुचित भक्ताला शंकराचार्य जसं जागं करतात तसंच नाथांनीही एका अभंगातून जागं केलं आहे.

तो अभंग असा आहे- ‘‘आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा। पति तो लक्ष्मीचा जाणतसे।। सकळ जीवांचा करतो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही।। जैशी स्थिती आहे तैशापरी राहे। कौतुक तूं पाहे संचिताचे।। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरिकृपे त्याचा नाश झाला।।’’ आवडीने भावे! मी उपासना करतो, साधना करतो, नाम घेतो पण त्यात नेमक्या या दोन गोष्टीच नसतात. आवड आणि भाव! माझ्या अंतरंगातली आवड जगाकडे असते, सर्व भावभावना जगाशीच जखडलेल्या असतात. नाथ सांगतात, बाबा रे वरकरणी तू उपासना करतोस, हरिनाम घेतोस आणि अंतरंगातून मात्र दुनियेचीच आवड जोपासतोस आणि त्यामुळेच भौतिकाचीच चिंता वाहातोस. जी आवड आणि जो भाव तू दुनियेकडे दिला आहेस तो या नामात दे, तो या उपासनेत गोळा कर. मग तुझी सर्व चिंता त्याला लागेल. सर्व म्हणजे समस्त. ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्ही. जगण्यातील चढउतारांचा मनावर परिणाम होऊ देऊ नकोस. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कर पण त्या प्रयत्नांत शरीराबरोबर मनाला जुंपू नकोस. कोणत्याही गोष्टीचा खेद धरू नकोस. इथे धरू हा शब्द फार मार्मिक आहे. एखादी चिंता आपण धरून ठेवतो. तुकाराममहाराजांचाही एक अभंग आहे. एका माणसानं एका झाडाला घट्ट मिठी मारली आणि ओरडू लागला, पाहा हो हे झाड मला काही सोडतंच नाही. तर असं माणसानंच चिंतेला घट्ट मिठी मारून ठेवली आहे आणि काही केल्या चिंता सुटत नाही, असं दुखंही तो उगाळत आहे. तर खेद कर पण धरून ठेवू नकोस. का? कारण तू ज्या भगवंताचं स्मरण करीत आहेस ना, तो श्री-पती आहे. ऐहिक, आध्यात्मिक अशा समस्त वैभवाचा तो पती आहे. ते वैभव त्याच्या पायाशी आहे. त्याच्या चरणसेवेत रत आहे. या चराचराचा तो सांभाळ करतो, तू काय या चराचराबाहेरचा आहेस का? सर्वाना जो सांभाळतो तो तुला सांभाळणार नाही का? हा जो जन्म तुला लाभला आहे तो प्रारब्धानुसार आहे. त्यातली स्थिती-गती प्रारब्धानुसार साकारत आहे. संचिताचं हे कौतुक तू पहा. गंमत अशी की आयुष्यात कमी कष्टांत आणि काहीवेळा तर काही न करताच जेव्हा यश लाभतं तेव्हा माणूस संचिताचं कौतुक मनापासून पाहातो. त्याचा आनंद उपभोगतो. पण संकट आलं, दुखं आलं तर मात्र माझा काहीच दोष नाही, मी काहीच केलं नसताना माझ्या वाटय़ाला हे का यावं, असा सल जोपासतो. संचितापायी येणाऱ्या दुखाकडे तो कौतुकानं पाहू शकत नाही!
चैतन्य प्रेम