अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९२. चित्त आणि वित्त Print

चैतन्य प्रेम, बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
प्रारब्धानुसार जे संचित माझ्या वाटय़ाला आलं आहे त्याचाही नाश आहे आणि तो हरिकृपेनं आहे, तेव्हा ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मी आवडीनं आणि भावपूर्वक उपासना करावी, असं नाथ सांगतात. शंकराचार्यही सांगतात, ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्! आता हे अजस्त्र रूप काय आहे?

तर साधना करीत असताना भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव इतकी वाढत जाईल की त्या जाणिवेवाचून एकही क्षण सरणार नाही. मग ते खरंखुरं व्यापक रूप तेव्हाच रसमय अनुभवाचा विषय होईल. आज उपासना करीत असताना आपल्याला केवळ एका भगवंताची आवड नाही आणि सर्व भाव त्याच्या ठायीं केंद्रित नाही. त्यामुळेच उपासनेवरही आपली पूर्ण भिस्त नाही. मग अशावेळी, तसं व्हावं म्हणून काय करावं? याच श्लोकाच्या अखेरीस शंकराचार्य सांगतात - ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्।। ’ म्हणजे सज्जनांच्या संगतीकडे, सत्संगाकडे चित्त दे आणि वित्त दीनजनांकडे दे! इथे सज्जन आणि दीनजन असे दोन शब्द आहेत आणि तितकेच महत्त्वाचे दोन शब्द आहेत चित्त आणि वित्त! चित्त म्हणजे अंतरंगातील सर्व साठा आणि वित्त म्हणजे भौतिकाचा साठा. चित्तातला साठा दुनियादारीचा आहे आणि भौतिकातला साठा हा दुनियादारीची आस सदोदित जोपासणाराच आहे. चित्तातली हांव संपत नाही आणि त्यामुळे बाहेरची धांवही संपत नाही. बाहेरची जी धांव आहे तिचा उगम चित्तातच आहे. त्यामुळे प्रथम चित्ताला वळण लावावं लागेल. त्यासाठीच या चित्ताला सज्जनाच्या संगतीकडे चिकटवायला सांगितलं आहे. आता हा सज्जन म्हणजे भगवंताचा निजभक्त. ज्याचं जगणं भगवंतमय झालं आहे असा. समर्थ रामदासही सांगतात, ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावे।।’ हे मना सज्जनांचा जो भक्तिपंथ आहे त्या मार्गानं गेलास तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. आता त्या मार्गानं जाणं म्हणजे त्यांचा संग करणं. जेव्हा मी त्यांच्या मार्गानं जाऊ लागेन तेव्हा रामदास सांगतात, ‘जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।।’ तेव्हा त्याचा अर्थ या भक्तजनांना जे िनद्य वाटतं त्याचा त्याग कर आणि त्यांना जे आवडतं ते सर्व भाव ओतून कर. समान विचार आणि समान आवड असेल तरच एकत्र वाटचाल होऊ शकते. संग होऊ शकतो. ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं’ साधायचं तर मग त्या निजजनांना जे आवडतं ते मलाही आवडायला हवं. त्या निजजनांना जे नावडतं आहे ते मलाही आवडता कामा नये. त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही? त्यांना केवळ परमात्मा आवडतो आणि तो सोडून जे जे काही आहे, ते त्यांना आवडत नाही. अरे बापरे! एवढी मोठी आवड आणि एवढी मोठी नावड मला या घडीला पेलवत नाही. पण म्हणूनच तर चित्ताला वळवायला सांगितलं आहे. गुराढोरांना जसं चुचकारून, मारून रस्त्यावर चालवावं लागतं तसं या चित्ताला सत्संगाकडे वळवायचं आहे.