अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९३. चित्तोपासना Print

 

चैतन्य प्रेम, गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
माणसाचं चित्त कधीच ठिकाणावर नसतं! ते सतत दुनियादारीत अडकल्यानं  बाहेर धावत असतं. जगाबरोबर फरपटत असतं. हे चित्त सज्जनांकडे वळवायला शंकराचार्य सांगतात. गुरांना जसं वळवतात तसं हे वळवणं आहे. याचं कारण ते सहजासहजी सत्संगाकडे वळत नाही. बरं ते शांतही बसत नाही.

गीतेत म्हटल्याप्रमाणे बसल्या जागी हे चित्त, हे मन दाही दिशांना उंडारून येतं. थोडक्यात जीव क्षणभरही स्वस्थ रहात नाही. तो काही ना काही कृती करीत असतो किंवा भावी कृतीच्या कल्पनेत तरी मश्गुल असतो. त्याच्या मनातल्या या कल्पना केवळ दोनच प्रकारच्या असतात. चांगल्या कल्पना आणि वाईट कल्पना. सद्वासना आणि दुर्वासना. शुभ इच्छा आणि अशुभ इच्छा. सत्यसंकल्प आणि पापसंकल्प. हा काळा-पांढरा असा भेद नाही. माझ्या जन्माच्या मूळ हेतूला धरून जे जे काही आहे ते चांगलं. त्याची इच्छा ही शुभ इच्छा, सद्वासना. त्याच्या पूर्तीची इच्छा हाच सत्यसंकल्प  आणि त्या जन्माच्या दुरुपयोगाला उद्युक्त करणारं जे जे काही आहे ते वाईट. त्याची इच्छा ही अशुभ इच्छा. तीच दुर्वासना. त्याच्या पूर्तीची आस हाच पापसंकल्प. माणूस जे काही प्रयत्न करतो, कृती करतो ती त्याच्या अंतरंगातील इच्छेनुरूपच असते. माणसावर कोणत्या इच्छेचा प्रभाव आहे त्यानुरूप त्याच्या जगण्याची दिशा ठरते. आज आपल्या अंतरंगात परमात्म्याला विमुख अशाच इच्छांचा संचार आहे. त्यामुळेच परमात्म्यापासून दुरावलेल्या चित्ताला भगवंताकडे वळवण्याचा प्रयत्न, अभ्यास हट्टाग्रहाने करावा लागतो. त्यालाच साधना म्हणतात, उपासना म्हणतात. हा हट्टाग्रह करावा लागतो कारण मनाचा ओढा वाईटाकडेच असतो. पापाकडेच असतो. अशुभाकडेच असतो. मनावर जन्मोजन्मीचे संस्कार तसेच असतात. ‘रामगीते’त भगवान श्रीराम हनुमंतांना सांगतात, हे हनुमाना शुभ आणि अशुभ या दोन मार्गातून वासनेची नदी वाहात आहे. मनाचा ओढा अशुभाकडेच असल्याने अशुभाकडे वाहात असलेला चित्ताचा प्रवाह तू शुभाकडे वळव. कारण या मनाचा एक स्वभाव आहे की अशुभापासून हटवलं तरच ते शुभ मार्गाकडे वळतं आणि शुभापासून हटलं की ते अशुभाकडे वळतं. त्यामुळे माणसानं प्रयत्नपूर्वक चित्तरूपी बालकाला चुचकारून, समजावून शुभमार्गात वळवत राहीलं पाहिजे. आता मला सत्संगाची काय गरज आहे? तर अशुभ इच्छांनी चित्त गजबजलेलं असताना, चित्तात दुनियादारीचा कल्लोळ असताना वरकरणी मी उपासना करीत असतो. दुनिया खरीखुरी  भासत असते, पण भगवंत दिव्य असला तरी कल्पनेच्या पातळीवर असतो. जगणं भगवंतकेंद्रित झालं नसतं. किंबहुना भगवंतकेंद्रित जगणं शक्य आहे, असंही मनाला वाटत नसतं. त्यामुळेच ज्याचं जगणं भगवंतकेंद्रित आहे त्याचा सहवास माझे डोळे उघडू शकतो. माझ्यावर अमीट ठसा उमटवू शकतो. तसं जीवन जगण्याची प्रेरणा मनात उत्पन्न करू शकतो.