अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९६. दीन Print

चैतन्य प्रेम, सोमवार, १० सप्टेंबर २०१२
सद्ग्रंथ, पोथी, चरित्र, लीलाप्रसंग हे सर्व साहित्य म्हणजे शब्दच असले तरी त्यांचं वाचन आणि मनन जर समरसून झालं तर त्यातूनही मनावर, चित्तावर संस्कार उमटतात. आपल्या आंतरिक धारणांचा प्रवाहदेखील बदलण्याची शक्ती त्यात असते. भावनेचं पुष्टीकरण आणि भगवंताविषयीची ओढदेखील हे साहित्य निर्माण करतं.

अर्थात निव्वळ वाचनानं काहीच होत नाही. त्याला उपासनेची जोड असावीच लागते, मनन म्हणजे अंतर्मुख होत जे वाचलं त्याचा आचरणाच्या हेतूनं विचार करावाच लागतो. थोडं वाचावं आणि कृतीत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करावा, हादेखील सत्संगच आहे. तिसरा सत्संग आहे नामाचा. नाम आणि ते ज्याचं आहे तो, यांच्यात भेद नाही. रस्त्यानं जाताना तुमच्या नावानं कुणी हाक मारली तर तुम्ही लगेच वळून पाहाता. हे नाव काय जगात हजारोजणांचं आहे, असं मानून दुर्लक्ष करीत नाही. मग जर त्या भगवंताचंच नाव, त्याचंच स्मरण करून आर्तपणे घेतलं तर तो लक्ष देणार नाही? त्या नामात तो आहेच. शिवाय ज्या सद्गुरूंनी ते दिलं आहे त्यांची शक्तीही त्यात व्याप्त आहे. त्यामुळे नाम घेणं म्हणजे भगवंताशी, सद्गुरुंशी संग साधणंच आहे. तर ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं’. अनेकानेक उपायांनी, अनेकानेक मार्गानी या चित्ताला सज्जनांच्या संगाकडे, सत्संगाकडे वळव, असं शंकराचार्य सांगतात. त्याचबरोबर ते सांगतात, ‘देयं दीनजनाय च वित्तम्’. जे दीनजन आहेत त्यांच्याकडे वित्त दे. आपण पाहिलं की वित्त म्हणजे निव्वळ पैसा नव्हे तर जे जे काही माझं आहे, ते सारं वित्त आहे. आता आधीच्या श्लोकात सज्जन सांगितलं आणि या श्लोकात दीनजन सांगितलं. खरा ‘दीन’ या जगात कोण आहे? खरा दीन तोच ज्याच्या अंतरंगात ‘मी’पणाचा किंचितही लवलेश नाही. ज्याच्यात थोडादेखील अहं आहे तो दीन नव्हे. अनंतकोटीब्रह्माण्डनायक असूनही ज्यांना शिवायचं धाडस अहंकार करू धजत नाही, सर्वसमर्थ असूनही जे हीनदीनपणे या जगात वावरतात आणि जगाला भगवंताच्या मार्गाकडे वळवत राहतात ते अखंड एकरसमग्न सद्गुरू हेच दीनजन आहेत! आता जो अनंतकोटीब्रह्माण्डनायक आहे, असं मी म्हणतो त्याला मी कसलं वित्त देणार! हे वित्त म्हणजे माझ्या क्षमता, माझ्यातील कर्तृत्वशक्ती. चित्ताला सद्विचाराच्या संगात ठेवून शरीर सद्गुरूसेवेत जुंपणं, म्हणजे ‘देयं दीनजनाय च वित्तं’. एका मंदिराचे पुजारी त्रासून म्हणाले, ‘‘दानाची पेटी बघा. फाटक्यातुटक्या नोटा, कळवटलेली नाणी टाकतात कित्येकजण. काही नाणी तर आता बादही झाली आहेत.’’ तर आपली दानत अशी असते! आणि सद्गुरुसेवेतही आपण अशा फाटक्यातुटक्या नोटाच टाकतो. म्हणजे, ज्या वेळी दुसरं काही करण्यासारखं नसतं तो वेळ आपण त्यांना देतो. त्यांच्यासाठी म्हणून दुनियादारीच्या धबडग्यातून वेळ काढत नाही. तर अग्रक्रम साधनेला देणं आणि दुनियादारी दुय्यम मानणं म्हणजे ‘देयं दीनजनाय च वित्तम्’!