अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९९. आभास Print

 

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२
पुत्रादपि धनभाजां भीति:! श्रीमंताला पुत्राकडूनही भीती असते. अर्थात साधकाच्या तपस्यागत प्राप्तीला पुत्रमोहाचं नख लागण्याची आणि त्यातून आध्यात्मिक घसरण होण्याचीही भीती असते. आता या गोष्टीचा थोडा तपशिलात विचार आवश्यक आहे. कारण हा विषय फार नाजूक आहे आणि त्याचं गैरआकलन झालं तर मनाचा मोठा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.

आता आध्यात्मिक साधनेत माणूस स्वतला झोकून देतो तेव्हाही त्याच्यातला सत्त्वगुणाने व्यापलेला ‘मी’ नष्ट झाला नसतो. उलट सात्त्विक अहंकार वाढत जाण्याची मोठी भीती असते. त्या प्रक्रियेत हळूहळू त्याच्या मनात स्वतबद्दल एक प्रतिमा निर्माण होऊ लागते. त्याच्या विचारात, बोलण्यात, वागण्यात एकप्रकारचे पावित्र्य, साधेपणा, ठोसपणा येऊ लागतो आणि त्यामुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी विशेष आहोत, असा भावही त्याच्या मनात शिरू शकतो. एखादाच साधक या प्रतिमेलाही ओलांडून खऱ्या साधनेकडेच पावलं टाकतो. अन्यथा या प्रतिमाबंधनातून लोकेषणेचा मोह दृढ होण्याचीही भीती असते. मग साधनेचा पाया धड पक्का झाला नसतानाच, आपण कुणीतरी झाल्याचा भ्रम त्याच्या मनाला व्यापू शकतो. त्याच्या भवतालच्या समाजातही त्याची एक प्रतिमा आपसूक निर्माण होते. आपल्या मनातल्या आपल्या प्रतिमेला अनुकूलच मान्यता इतरांची असावी, अशी इच्छा मग साधकाच्या मनात उद्भवू लागते. भवतालच्या व्यक्तींमध्ये काही या प्रतिमेला नाकारणाऱ्या अर्थात या साधकावर टीका करणाऱ्या असतात तर काही या प्रतिमेला स्वीकारणाऱ्या व स्तुती करणाऱ्या असतात. टीका आवडत नसली तरी साधनेच्या जोरावर वरकरणी तरी ती पचवण्यात माणूस यशस्वी होऊ शकतो; पण स्तुती मनात शिरू न देण्याचे आव्हान त्याला सहसा पेलवत नाही. माणूस हा स्तुतिप्रियच असल्याने स्तुती त्याला आवडते. स्तुतीच्या या चिखलाची आवड अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाप्रमाणे त्याच्या भवतालच्या व अत्यंत जवळच्या लोकांच्या मनातही शिरू शकते. साधनेआधीचं जिवाचं जीवन आणि साधनारत झाल्यानंतरच जीवन, यातील तफावतीमुळेही अत्यंत जवळच्या माणसांना अशा साधकाचं कौतुक वाटू शकतं. यात भौतिक स्वार्थ वा भौतिक लाभाची ओढ एकवेळ दोन्ही बाजूंनी नसेलही पण कौतुकाच्या मोहाची तीव्रता दोन्ही वा एका बाजूने असू शकते. त्यात कृतार्थतेचाही आभास असतो. हे जे काही घडते ते मानवी स्वभावानुसारच घडते. त्यामुळेच ते स्वाभाविकही वाटते. यात जवळच्या लोकांचाही दोष नसतो पण अध्यात्माचा मार्ग खरा काय आहे, अध्यात्मसाधना कशासाठी करायची, याबाबतच्या आकलनाची उणीव मात्र त्यातून प्रकर्षांने जाणवते. भौतिकाने पोसला जाणारा ‘मी’ जितका वाईट तितकाच आध्यात्मिक आधारावर पोसला जाणारा ‘मी’देखील वाईटच, ही जाणीव इथे हरवली असते. मग अशा वेळी काय घडते?
चैतन्य प्रेम