अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २००. वारसा Print

 

शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२
साधनेचा पायादेखील स्थिर झाला नसताना ज्याला आपण कुणीतरी झालो आहोत, असं वाटू लागतो आणि त्याच्या भवतालच्यांनाही तसा भ्रम होतो, तेव्हा काय घडतं? अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाला आणि त्याच्या अत्यंत जवळच्यांना वारसामोहाची भीती असते. आजूबाजूच्या जगात काय दिसते? आचार्याच्या शब्दांत विचारायचे तर, ‘सर्वत्रेषा विहिता रीति’ काय आहे?

तर जिथे भगवंताच्या कार्याच्या नावाने साधनेइतकाच किंवा साधनेहून अधिक भौतिकाचा डोलारा उभा रहातो तो आपल्यानंतर आपल्या घरात किंवा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तिकडेच रहावा, असा मोह एकतर तथाकथित स्वयंसिद्धाच्या मनात रुजू शकतो किंवा त्यांचा हा वारसा त्यांच्यानंतर आपल्याकडे यावा, अशी ओढ त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तिंच्या मनात निर्माण होऊ शकते. मानवी स्वभावानुसार यात गैर काहीच नाही पण आध्यात्मिक सत्याला हे पूर्णपणे विसंगत आहे. प्रत्यक्षात ‘मी’ नष्ट करणं, यावाचून या जगात भगवंताचं म्हणून काहीच कार्य नाही आणि त्या कार्यासाठी एक रुपयाही साठवावा लागत नाही, उलट असलेला सोडावा लागतो! त्यामुळे भगवंताच्या कार्याच्या नावावर जो भौतिकाचा डोलारा उभा राहातो तो कालौघात आणखी वाढेल किंवा नष्टही होईल. भगवंताला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्या डोलाऱ्याने समाजाचे भले होईल, काही लोक भगवंताच्या मार्गाकडे वळतील, या साऱ्या परिस्थितीनुरूप गोष्टी झाल्या. भौतिकाचा असा वारसा पुढच्या पिढीत सोपवला जाऊ शकतो आणि जगभर हे दिसतेच. पण अध्यात्माचा वारसा असा सहज संक्रमित होणारा नसतो. मुळात अध्यात्माचा वारसा म्हणजे काय, हेच आपण नीटपणे जाणत नाही. सिद्धपदाचा वारसा केवळ श्रीसद्गुरू निव्वळ इच्छामात्रेण कुणाहीकडे संक्रमित करू शकतात. पण साधनेचा असा वारसा साधकाला पुढल्या पिढीकडे सोपवता येत नाही. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की हे सारे चिंतन साधकापुरते आहे आणि साधकालाच लागू आहे. सिद्ध अथवा साक्षात्कारी, अवतारी संतांना नव्हे. तर तपस्या ज्याची त्याला करावी लागते. साधना ही व्यक्तीची अत्यंत आत्मिक बाब असते. तपस्येचा म्हणून काही वारसा नसतो. तपस्यागत शक्ती दुसऱ्याला देता येत नाही. ती ज्याची त्याला कमवावी लागते. आध्यात्मिक जाणिवेचा वारसा केवळ संक्रमित करता येतो. ज्या मार्गानं मी इथवर पोहोचलो त्या मार्गानं तुम्हीही वाटचाल कराल तर आपण सारेच वास्तविक सत्यापर्यंत पोहोचू, ही जाणीव संक्रमित करता येते. त्यासाठी प्रेरणाही देता येते, मानसिक आधार देता येतो. अन्यथा आध्यात्मिक पायरी ही स्थावर मालमत्तेप्रमाणे दुसऱ्याला देता येत नाही. प्रत्यक्षात जगात काय दिसते? सर्वत्रेषा विहिता रीति, काय आहे? तर वारसाहक्काने कुणीकुणी त्या आध्यात्मिक पायरीवर हिरिरीने आरूढ होतात आणि तेथून मग घसरतातही!
चैतन्य प्रेम