अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०१. एक प्रसंग Print

 

शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
मागील काही दिवस हे ‘पुत्रादपि धनभाजां भीति’वरून आपलं जे चिंतन चालू आहे, ते कुणाला विषयांतरासारखंही वाटेल पण साधनेच्या मोठय़ा टप्प्याकडे वळण्याआधीच साधकाच्या मनातील उरलासुरला भ्रमही दूर करण्याचा आणि त्याला सावध करण्याचा आचार्याचा हेतू आहे.  कुणाला हा अर्थ ओढूनताणून आणलेला वाटेल.

पण साधनेचा मार्ग सांगताना एकदम ‘पैसा हा अनर्थाचं मूळ आहे आणि श्रीमंताला पुत्राकडूनही भीती आहे’, हे सांगायचे तात्पर्य काय? तर अध्यात्मात साधलेल्या प्रगतीचा मोहदेखील मनात साठवू नकोस कारण कोणत्याही प्राप्तीचा मोह हा अनर्थालाच कारणीभूत होतो, एकवेळ तू त्याच्या प्रभावापासून दूर राहशील पण तुझ्या निकटस्थांच्या मनात (इथे निकटस्थ म्हणजे केवळ नात्यातील अभिप्रेत नाहीत) मोह निर्माण होऊ शकतो आणि त्यातून तूदेखील भौतिकाकडे खेचला जाऊ शकतोस, असा इशारा आचार्य देतात, असं वाटतं. भौतिकापुरतं बोलायचं तरी साक्षात्कारी किती कमालीचा दक्ष असतो, याचा प्रत्यय गाडगेबाबांच्या चरित्रातून मिळतो. त्यांनी आजन्म स्वतसाठी एक छदामही घेतला नाही. जे मिळालं ते समाजाकडेच अनंत हस्ते परत केलं. ते काहीच घेत नसत तेव्हा लोक त्यांच्या एकुलत्या एका मुलीला काही भेटी देत असत. संस्थेतील एक खोली रिकामी करून ती तेथे राहू लागली आणि कुणालाच त्यात काही गैर वाटले नाही. गाडगेबाबांना हे समजताच त्यांनी तिच्या नावे एक जाहीर पत्रच जारी केले. त्यात ते म्हणाले, ‘‘तुम्ही गाडगेबोवाचे घरातील माणसे. गाडगेबोवाजवळ बारा आण त्याग तर तुमचेजवळ एक रुपया त्याग असायला हवा. कदाचित गाडगेबोवाने घरात काही आणले तर तुम्ही खरं तर म्हणावं की आम्हाला हे नको. घेऊन जा. पण तुला पैशाचे पक्के भूत लागले. करिता गाडगेबोवांची मुलगी म्हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाराने काही देऊ नये, असा सर्व जनतेला जाहीर निरोप आहे!’’ आजच्या पाश्र्वभूमीवर हा प्रसंग कसा दिसतो? आज साधनेच्या नावावर मोठमोठे भौतिक डोलारे उभे राहतात आणि ज्यांनी ते उभारले त्यांच्यानंतर ते वारसाहक्काने त्यांच्या पुढील पिढीत हस्तांतरित होतात. अध्यात्म हे भौतिक नाकारणारे नसले तरी पोसणारे नसतेच. त्यामुळे स्थावर मालमत्तेसारखे पुढील पिढीकडे काही वारसाहक्काने हस्तांतरित व्हावे, असे अध्यात्माचे स्वरूप नसते. आध्यात्मिक प्रेरणा, इच्छा, भगवंताविषयीचं प्रेम दुसऱ्याच्या मनात रुजवता येऊ शकतं आणि त्याआधी ते रुजवणारा स्वत: त्यात आकंठ बुडालेला असावा लागतो. ‘अर्थमर्नथ भावय नित्यं..’चा श्लोक हीच प्रेरणा देतो. आता या सावध सूचनेनंतर, साधकाला कृतीशील मार्गदर्शन करणाऱ्या आपण निवडलेल्या सात श्लोकातील शेवटचा आणि साधनेचा पूर्ण नकाशा मांडणारा श्लोक आहे- ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्वधानम्।।’
चैतन्य प्रेम