अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०३. प्राणाधार Print

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘ज्याप्रमाणे ‘आकाश’ हा या विश्वाचा कारणभूत, अनंत, सर्वव्यापी मूलपदार्थ आहे, त्याचप्रमाणे ‘प्राण’ ही या विश्वाचा विकास करणारी अनंत, सर्वव्यापी, कारणभूत अशी शक्ती होय. कल्पाच्या प्रारंभी आणि अखेर सारे काही आकाशात विलीन होऊन जाते आणि विश्वात जेवढय़ा म्हणून शक्ती आहेत त्या सर्व प्राणात लय पावतात;

पुढील कल्पात समस्त शक्ती या प्राणातूनच विकसित होतात. हा प्राणच गतीच्या रूपाने व्यक्त होत आहे, प्राणच गुरुत्वाकर्षणाच्या, चुंबकत्वाच्या रुपांनी व्यक्त होत आहे. हा प्राणच शारीरिक क्रियांच्या रूपांनी, ज्ञानतंतूंतील शक्तिप्रवाहाच्या रूपांनी व विचाररूपी शक्तीच्या रूपाने व्यक्त होत आहे. विचारापासून तो अगदी मामुली शारीरिक क्रियांपर्यंत सर्वत्र आढळणारी शक्ती म्हणजे या प्राणांचीच निरनिराळी रूपे होत. बाह्य़ व अंतर्जगतातील सर्व शक्ती ज्या वेळी आपल्या मूल अवस्थेप्रत जातात त्या वेळी त्यांच्या त्या अवस्थेलाच प्राण म्हणतात.’’ आता इथे सनातन धर्माचा एक कल्पसिद्धांत स्वामीजी मांडतात. विष्णूपुराणात, महाभारतात या कल्पाचे विवरण आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे मिळून एक महायुग होते आणि अशा एक हजार महायुगांचा मिळून ब्रह्माचा एक दिवस अर्थात कल्प होतो. हा माणसाच्या वर्षगणनेनुसार सुमारे चार अब्ज वर्षांचा होतो. कल्पाच्या अखेरीस सर्व सृष्टी लय पावते आणि पुढील कल्पाच्या प्रारंभी ती पुन्हा साकारते. आता ती विलीन पावते अर्थात सर्व स्थूल, सूक्ष्म आकाशरूप होऊन जाते आणि पुढील कल्पात ही सृष्टी, हे चराचर अर्थात चर आणि अचर हे या आकाशरूपातूनच व्यक्त होत जाते. आता ही सारी प्रक्रिया शक्तीच्याच जोरावर होते आणि ही या विश्वाची मूलभूत शक्ती जी आहे ती प्राणशक्ती आहे, असे स्वामीजी सांगतात. जेव्हा ही सृष्टी विलीन होते तेव्हा या सृष्टीतील समस्त शक्ती या प्राणशक्तीत विलीन होतात आणि पुढील कल्पात या शक्ती प्राणातूनच, प्राणशक्तीतूनच उगम पावतात, विकसित होतात. या चराचरातील समस्त हालचाल, समस्त विकास हा या प्राणशक्तीच्याच पायावर सुरू आहे. इतकेच नव्हे तर ही दृश्यातील हालचाल, हा दृश्यातला विकास ज्या सूक्ष्म विचारातून प्रथम उत्पन्न होतो ती विचारशक्तीदेखील प्राणातूनच उगम पावली आहे. थोडक्यात स्थूल आणि सूक्ष्म म्हणून जी काही शक्ती आहे ती प्राणशक्तीचीच रूपे आहेत. साधं उदाहरण घ्या. आपण आजारी पडतो म्हणजे काय तर आपली प्राणशक्ती कमी होते तेव्हा आपले विचार मंदावतात, विचार करण्याची शक्ती ओसरते, शारीरिक क्रिया मंदावतात, मनाचा उत्साह अर्थात मनाची शक्ती मंदावते. तर अशी प्राणशक्ती समस्त जीवनाला व्यापून आहे आणि ती शक्ती संपते तेव्हाच जीवनही संपते. शरीरात प्राण आहे तोवर त्या शरीरात चैतन्य आहे. तोवर त्या शरीराला किंमत आहे. प्राण हा असा जगण्याचा मुख्य आधार आहे.
चैतन्य प्रेम