अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०४. प्राणयोग Print

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२
या चराचरात प्राणशक्ती ओतप्रोत भरून राहिली आहे. आपल्या शरीरातील प्राणाची स्पष्ट जाणीव आपल्याला होते ती श्वासोच्छवासातून. हा श्वास थांबला की शरीराच्या सर्व क्रियाही थांबतील! तेव्हा या श्वासोच्छवासावर नियंत्रण, त्याचे नियमन म्हणजे प्राणायाम असे आपण सहजपणे मानतो. प्राणायामाची म्हणून जी काही कृती आहे तिचे आपल्याला जाणवणारे बाह्य़रूप तेच असते.

प्रत्यक्षात प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासाचे नियंत्रण वा नियमन एवढेच नव्हे तर शरीरातील समस्त प्राणशक्तीवरच ताबा मिळविणे! स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘प्राणायामाचा खरा अर्थ आहे फुप्फुसांच्या क्रियेवर ताबा मिळविणे. श्वासोच्छवासामुळे फुप्फुसांची क्रिया होते असे नव्हे तर फुप्फुसांच्या क्रियेमुळेच श्वासोच्छवास चालतो. त्यामुळे प्राणायामाचा श्वासोच्छवासाशी काही संबंध नाही, तर प्राणायाम म्हणजे जिच्यामुळे फुप्फुसांची क्रिया चालते त्या स्नायुशक्तीवर ताबा मिळविणे. जी शक्ती मंजातंतूंद्वारे स्नायुंकडे जाते आणि तेथून फुप्फुसांकडे जाऊन त्यांच्यात विशिष्ट क्रिया निर्माण करते ती शक्ती म्हणजेच प्राण होय. प्राणायाम साधनेने त्या प्राणशक्तीला जिंकायचे असते. प्राणावर ताबा मिळताच या प्राणाच्या आपल्या शरीरातील इतरही सर्व क्रिया आपल्या ताब्यात येत असल्याचे प्रत्ययास येईल.’’ थोडक्यात प्राणायामाची दृश्य क्रिया ही श्वासोच्छवासाच्या नियमनासारखी भासत असली तरी प्राणायामाचा खरा व्यापक हेतू हा शरीरातील प्राणशक्तीवर पूर्ण ताबा मिळविणे, हाच आहे. आता खरा हेतू याहीपेक्षा व्यापक आहे. शरीरातील प्राणशक्तीवर ताबा आला की समस्त शारीरिक, मानसिक शक्तींवरही ताबा येतो. आता एका शरीरात जी प्राणशक्ती आहे तीच चराचरातदेखील आहे. त्यामुळे आपल्या देहातील प्राणशक्तीवर ताबा आला की चराचरातील प्राणशक्तीवरही ताबा मिळविता येतो आणि ज्याला असा ताबा मिळविता येतो त्याला योगी म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जाते! तेव्हा प्राणायामाचा खरा व्यापक हेतू अथवा प्राणायामाने जे खरे व्यापकत्वाने साधले जाते ते असे विराट आहे. आता प्राणशक्तीवर ताबा आणायचा तर आधी प्राण नामक मूलभूत शक्तीपर्यंत पोहोचता तर आले पाहिजे! आणि हे पोहोचण्याची क्रिया प्राणायामातूनच सुरू होते. वरकरणी पाहता प्राणायाम ही स्थूल क्रिया भासत असली आणि तिने सूक्ष्म अशा शारीरिक, मानसिक व प्राणिक शक्तींवर ताबा येत असला तरी योगशास्त्रानुसार ही प्रक्रिया फार सखोल आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘आपल्या शरीरात तीन मुख्य नाडय़ा आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या नाडय़ा आपल्या पाठीच्या कण्यात अर्थात मेरुदंडात असतात. यातील इडा व पिंगला या नाडय़ा म्हणजे ज्ञानतंतूंचे प्रवाह असून मेरुदंडात मज्जेच्या मध्यातून जाणारा सुषुम्ना हा पोकळ मार्ग आहे.’’ आता या तीन नाडय़ांमध्ये प्राणायामाने काय प्रक्रिया घडते?     
चैतन्य प्रेम