अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०५ . ताबा Print

चैतन्य प्रेम, शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२
प्राणायामाबद्दल स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन आपण जाणून घेत आहोत. स्वामीजी सांगतात, ‘‘योग्यांच्या मतानुसार मुख्य नाडय़ा तीन आहेत. इडा, पिंगला आणि या दोहोंमधील तिसरीचे नाव सुषुम्ना. तिन्ही नाडय़ा मेरुदंडात असतात.

डावीकडील इडा आणि उजवीकडील पिंगला या दोन्ही नाडय़ा ज्ञानतंतुमय असून मध्यवर्ती सुषुम्ना नाडी ही पोकळ आहे. ती ज्ञानतंतुमय नाही. सुषुम्ना ही बंद असून सर्वसामान्य माणसाला तिचा काही उपयोग नाही, कारण  त्याचे सर्व कार्य हे इडा आणि पिंगला यांच्या द्वारे चालते. या नाडय़ांमधून संवेदनांची सारखी ये जा चालू असते व सर्व शरीरभर पसरलेल्या ज्ञानतंतूंच्या सहाय्याने निरनिराळ्या इंद्रियांकडे आदेश पोहोचविले जातात.’’ आता त्यापुढे या नाडय़ांचा प्राणायामाशी काय संबंध आहे किंवा प्राणायामाने या नाडय़ांमध्ये नेमकी काय प्रक्रिया घडते, ते स्वामीजी सांगतात. ते म्हणतात, ‘‘इडा व पिंगला यांचे योग्य निमयन करून त्यांच्यामध्ये नियमित गति निर्माण करणे हा प्राणायामाचा फार मोठा हेतु आहे. परंतु तसे म्हटले तर तो काहीच नव्हे. काही विशिष्ट प्रमाणात हवा आत घेणे एवढाच त्याचा अर्थ आहे. रक्त शुद्ध करण्याव्यतिरिक्त त्याचा अधिक काहीच उपयोग नाही. प्राणायामाबरोबरच आपण जी हवा आत घेतो आणि रक्तशुद्धीसाठी जी वापरली जाते त्या हवेमध्ये ‘गूढ’ असे काहीच नाही. ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे. प्राणायामाने जेव्हा इडा व पिंगला यांची गति नियमित होऊन अत्यंत सूक्ष्म होते तेव्हा आपण ‘प्राण’ नामक मूलभूत शक्तीपर्यंत पोहोचतो. विश्वात सर्व ठिकाणी दिसून येणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिया या प्राणाचीच निरनिराळी रूपे आहेत. हा प्राणच विद्युतशक्ति आहे, हा प्राणच चुंबकशक्ति आहे. विचारांच्या रूपाने आपल्या मेंदूतील प्राणच बाहेर पडतो. विश्वातील सर्व वस्तु प्राणमय आहेत.’’ थोडक्यात प्राणायामाच्या क्रियेने विशिष्ट प्रमाणात हवा श्वसनावाटे आत घेतली जाते. ती शुद्ध हवा असते. तिच्यामुळे रक्त शुद्ध होते. इडा आणि पिंगला या नाडय़ांची गती नियमित होते आणि ती इतकी सूक्ष्म होते की प्राण या मूलभूत व अत्यंत सूक्ष्म शक्तीपर्यंत ती पोहोचते. या प्राणशक्तीवरच माझं चलनवलन होत असतं आणि या जगाच्या चलनवलनालाही तीच आधार आहे. प्राणायामाने योगी जेव्हा प्राणशक्तीपर्यंत पोहोचतो तेव्हा त्या तिच्यावर ताबा आल्याने शरीरावरही त्याचा पूर्ण ताबा येतो. त्याच्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक स्थितीगतिवर त्याचा ताबा येतो. ही प्राणशक्ती सर्व जगात भरून आहे आणि चराचरातील प्राणशक्तीच योग्याच्या आवाक्यात आल्याने त्याचा समस्त वस्तुमात्रावरही ताबा येतो! तर प्राणायामाने जे साधते ते किती व्यापक असते, याची झलक आपण पाहिली. आपण योगी नाही आणि होऊ की नाही, हे माहीतही नाही. आपण साधनेच्या मार्गावर पाऊल टाकत आहोत आणि म्हणून सर्वसामान्य साधकाच्या दृष्टीने प्राणायामाचा विचार करू.