अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०६. प्राणायाम Print

चैतन्य प्रेम, शनिवार २२ सप्टेंबर २०१२
प्राणायामाची जी साधी क्रिया आहे ती काय आहे? प्राणायामाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत आणि त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच अंमलात आणायच्या असतात, हे खरे.

पण त्यातील प्राणायामाचा मुख्य, सर्वमान्य आणि साधनेसाठी सर्वगत असा जो प्रकार आहे तो पाहू. प्राणायामाची पूरक, कुंभक आणि रेचक अशी तीन अंगे आहेत. प्राणायाम करताना उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठय़ाने दाब देऊन बंद करावी. मग उजव्या हाताच्या उरलेल्या चार बोटांपैकी मध्यमा आणि अनामिका या मधल्या दोन बोटांनी डाव्या नाकपुडीला हलका स्पर्श करावा. उजव्या नाकपुडीला उजव्या हाताच्या अंगठय़ाने दाब देऊन ती बंद केल्याने उजव्या नाकपुडीने श्वास रोखून धरावा आणि यथाशक्ति विशिष्ट संख्येत जप करीत डाव्या नाकपुडीने श्वास हळुहळू आत घ्यावा. मग उजवी नाकपुडी बंद असतानाच उजव्या हाताच्या ज्या मधल्या दोन बोटांनी डाव्या नाकपुडीला स्पर्श केला होता त्यांचा दाब वाढवून डावी नाकपुडीही बंद करावी. याचाच अर्थ उजवी आणि डावी या दोन्ही नाकपुडय़ा बंद राहून श्वास आत घेतला जाणार नाही, मगाशी आत घेतलेला श्वास आतच कोंडला असेल. यावेळीही अर्थात श्वास रोखल्यावरही मनात मंत्रजप करतात. श्वास आत घेताना जितका मंत्रजप केला त्याच्या चौपट मंत्रजप यावेळी करतात. मग हा चौपट मंत्रजप झाला की उजव्या नाकपुडीवरील उजव्या अंगठय़ाचा दाब काढून टाकतात मात्र डावी नाकपुडी बंदच असते. मग आत कोंडलेला श्वास उजव्या नाकपुडीने हलकेच बाहेर सोडतात. यावेळी श्वास आत घेताना केलेल्या मंत्रजपाच्या दुप्पट आणि श्वास आत कोंडला असताना केलेल्या मंत्रजपाच्या निम्म्या संख्येने मंत्रजप करतात. आता जपाचे ही संख्या श्वासनियमनासाठी आहे. काहीजण समान संख्येनेही म्हणजेच श्वास आत घेताना जेवढा जप तेवढाच जप श्वास कोंडल्यावर आणि तेवढाच जप दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडताना करतात. आता हा झाला एक प्राणायाम. श्वास आत घेणे याला म्हणतात पूरक, तो आत कोंडणे याला म्हणतात कुंभक आणि दुसऱ्या नाकपुडीने तो सोडणे याला म्हणतात रेचक. नंतर दुसऱ्या बाजूने याच तऱ्हेने प्राणायाम पूर्ण करतात. अर्थात ज्या नाकपुडीने रेचक झाला त्या उजव्या नाकपुडीने श्वास आत खेचून घ्यायचा मग दोन्ही नाकपुडय़ा बंद करून श्वास आत कोंडायचा आणि मग डाव्या नाकपुडीने तो सोडायचा, हा झाला पूर्ण प्राणायाम. आता वाचताना ही क्रिया गुंतागुंतीची वाटली तरी जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली यथायोग्य साधली की ती फार सोपी क्रिया वाटेल. अर्थात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की, श्वास आत घेण्याच्या, कोंडण्याच्या आणि बाहेर सोडण्याच्या कालावधीची व्याप्ती अर्थात तेव्हाची जपसंख्या आणि प्राणायामाचे प्रमाण हे सद्गुरू किंवा जाणकाराच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतहून ठरवू नका. तोवर समान संख्येने, दोन किंवा चार मणी जप करीत प्राणायामाचा अल्पाभ्यास करता येईल.