अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०७. प्रत्याहार Print

चैतन्य प्रेम, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
प्राणायामाचे दृश्य स्वरूप काय, प्राणायाम कसा करतात, त्याने खरे व्यापक काय साधले जाते; याबद्दल आपण जाणून घेतलं. ज्यांना प्राणायामाबद्दल अधिक काही जाणायचे आहे त्यांच्यासाठी बरीच पुस्तके आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी ‘राजयोग’ (प्रकरणे तीन ते पाच : प्राण, प्राणाचे आध्यात्मिक रूप, अध्यात्म प्राणाचा संयम) आणि ‘आत्मसाक्षात्कार : साधना व सिद्धी’ या पुस्तकातील ‘साधनेसंबंधी काही सूचना’ या प्रकरणात प्राणायामाचा वेध घेतला आहे. स्वामी शिवानंद यांचे ‘ध्यानयोगरहस्य’ हे पुस्तकही बरेच अभ्यासिले जाते. तर ‘भज गोविंदम्’ स्तोत्रात आद्य शंकराचार्य साधनेचा जो नकाशा मांडतात त्या ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानम् कुर्ववधानं महदवधानम्।।’ या श्लोकातील प्राणायामाचा मर्यादित मागोवा आपण घेतला. त्यापुढे येतो प्रत्याहार! स्वामी शिवानंद सांगतात, ‘‘बहिर्मुख मन अंतर्मुख करणे अर्थात दहाही इंद्रियांना, अंती दुखद अशा नश्वर विषयभोगांपासून पुनपुन: मागे खेचून, त्यांना व मनाला ईश्वरस्वरूपात संलग्न करणे, याला प्रत्याहार म्हणतात. सारांश, प्रत्याहार म्हणजे वैराग्य किंवा सर्व विषयांपासून उपराम आणि मनात राम!’’ थोडक्यात आपले मन दहाही इंद्रियांद्वारे दुनियादारीचा जो आहार घेत असते तो आहार थांबविणे, म्हणजे प्रत्याहार! शिवानंद म्हणतात त्याप्रमाणे दहाही इंद्रियांना विषयभोगांपासून मागे खेचावे लागते. पण सूक्ष्म विचार केला की जाणवेल की, इंद्रिये ही विषयभोगांत रमण्याची निव्वळ साधने आहेत. रमणारं आहे ते मन! एखादी गोष्ट पाहण्याची ओढ आणि ती पाहिल्याचं समाधान डोळ्यांना होत नाही, ते मनाला होतं. माणूस मात्र त्याला नेत्रसुख असं गोंडस नाव देतो! अगदी त्याचप्रमाणे एखादा पदार्थ चाखण्याची ओढ आणि ती चाखल्याचं समाधान जिव्हेला होत नाही. ते मनाला होतं. एखादी गोष्ट ऐकण्याचं सुख कानांना होत नाही, ते मनाला होतं. एखादी गोष्ट स्पर्शिण्याचं सुख त्वचेला होत नाही ते मनाला होतं. थोडक्यात इंद्रिये ही निव्वळ साधने आहेत. मनच प्रत्यक्ष विषयभोगांत रमत, मनालाच विषयांची ओढ असते आणि त्याच्या पूर्तीचं सुख आणि अपूर्तीचं दुख मनालाच होतं. तेव्हा प्रत्याहार ही मनाचीच साधना आहे. मनाचीच मशागत आहे. थोडं खोलवर जाऊ. बाह्य़ विषयाचा अनुभव माणूस कसा घेतो? स्थूल इंद्रिये प्रथम अनुभव घेतात. मग त्या इंद्रियांच्या आंतील इंद्रिये, मेंदूतील केंद्रांच्या मदतीने त्या अनुभवाचा बोध करतात. या दोहोंशी जेव्हा मन संयोग पावतं तेव्हाच विषयानुभूती पूर्ण होते. उदाहरणार्थ डोळे एखादी गोष्ट पाहातात आणि त्यांचे मेंदूतील केंद्र ती गोष्ट काय आहे याचा बोध करते आणि मन त्याच्याशी संयोग पावून त्या गोष्टीची आवड वा नावड, ओढ अथवा तिरस्कार हे पक्केपणे बिंबवते. मग त्या गोष्टीचे महत्त्व ठरते आणि मन त्या इंद्रियांद्वारे त्या गोष्टींत जखडण्याचा वा सुटण्याचा प्रयत्न करते.