अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २०८. यंत्र Print

मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
प्रत्याहार म्हणजे मन ताब्यात येणे. कारण बाह्य़ स्थूल इंद्रिये आणि मेंदूतील केंद्राशी जोडलेली त्यांची अंतर्गत सूक्ष्म इंद्रिये यांच्या योगे मनच बाह्य़ गोष्टींशी संयोग पावून दुनियादारीत जखडते. तेव्हा बाहेर भटकणाऱ्या, बाहेर विखुरलेल्या या मनाला स्थिर केल्याशिवाय, गोळा केल्याशिवाय, एकाग्र केल्याशिवाय खरी उपासना होऊ शकणार नाही.

या बाह्य़ात विखुरलेल्या मनाला बाह्य़ातून काढून अंतरंगात एकाग्र करणे म्हणजे प्रत्याहार. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘आपले मन आपल्या इच्छेनुसार केंद्रांशी संयुक्त करणे किंवा आपल्या इच्छेनुसार केंद्रांवरून काढून घेणे ज्याला जमले आहे त्याला प्रत्याहार साधला आहे, असे म्हणता येईल.’’ आता इथे जी केंद्रे सांगितली आहेत ती म्हणजे स्थूल, बाह्य़ केंद्रे आहेत. थोडक्यात दुनियेत माझं मन मला हवं तेथे चिकटवता आलं आणि हवं तेथून काढून घेता आलं, तर प्रत्याहार साधला. आपलं असं होत नाही. दुनियादारीतून आपलीच होणारी परवड आपल्याला समजत असते त्यामुळे एखाद्या व्यक्तिशी असलेले संबंध तोडून टाकण्याची गरज आपल्याला जाणवते तरी मन आड येते आणि आपण हतबल होत त्या संबंधांच्या गर्तेत पडूनच राहातो. बरं शरीरानं तुम्ही दूर होऊ शकत नाही पण मनानं तरी व्हाल? छे! आपलं मन नको तितकं बाह्य़ परिस्थितीत अडकून राहातं. त्या अडकण्याचे आघात अनेकदा वाटय़ाला येऊनही आपलं अडकणं सुटत नाही. याचं कारण बाह्य़ात चिकटणे वा न चिकटणे, हे आपल्या आवाक्यातले नाही. ते आवाक्यात येणे म्हणजे प्रत्याहार साधणे. ‘ज्ञानेश्वरी’तलं ते उदाहरण आहे ना? मोठमोठी लाकडं पोखरून टाकणारा भुंगा कमलपुष्प मिटलं की त्यात अडकून राहातो. त्या पाकळ्या चिरणं त्याला जमत नाही. तसं होतं आपलं. काही नाती, काही व्यक्ती यांच्यात आपण इतके गुंतून जातो की आपल्या जीवनाच्या ध्येयपूर्तीकडेही आपलं दुर्लक्ष होतं. याचं कारण स्थूल इंद्रियं आणि मेंदूशी जोडलेली त्यांची आंतरिक सूक्ष्म इंद्रिये यांच्या योगे मन त्या व्यक्तिमात्राशी संयोग पावून सुखाच्या आशेने गुंतून रहात असतं, हेच आहे. स्वामीजी सांगतात, ‘‘प्रत्याहार म्हणजे ‘एकीकडे गोळा करणे’, ‘आपल्याकडे ओढून घेणे’- मनाची बहिर्गामी गती रुद्ध करून, इंद्रियांच्या गुलामीतून त्याला सोडवून आत खेचून घेणे. हे साधेल तरच आपण मुक्तीचा मार्ग बराचसा आक्रमिला आहे, असे होईल. तोपर्यंत यंत्रात आणि आपल्यात काय बरे फरक?’’ आज आपण जगाकडे यंत्रवत् खेचले जात आहोत! जगाकडची ही ओढ, ही खेच थांबवून त्याला आत वळवले पाहिजे. त्याला स्थिर केले पाहिजे. इंद्रियांच्या गुलामीत जोवर हे मन आहे किंवा इंद्रियांना गुलाम बनवून त्यांच्यायोगे बाह्य़ विषयात जोवर हे मन विखुरले आहे तोवर ते एकत्र होणार नाही. तोवर त्याचं बाह्य़ावरचं भावनिक अवलंबन संपणार नाही. तोवर ते स्वतंत्र, मुक्त राहणार नाही.
चैतन्य प्रेम