अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०९. मनशक्ती Print

चैतन्य प्रेम, बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
मन आणि इंद्रिये एकाग्र करणे याला आद्य शंकराचार्य यांनी महातप म्हटले आहे. ‘उपदेशसहस्त्री’ या ग्रंथात (अनुवाद सिताराम महादेव फडके, रसिकरंजनग्रंथप्रसारक मंडळी, १९११) शंकराचार्य सांगतात, ‘मनसश्चेंद्रियाणांच ह्य़ैकाग्य््रां परमं तप:। तज्ज्याय: सर्वधर्मेभ्य: स धर्म: पर उच्यते।।’ म्हणजे, ‘‘मन आणि इंद्रिये ज्या योगाने एकाग्र होतील, स्वाधीन रहातील, त्याला उत्तम तप म्हणावे. सर्व विहित गोष्टींमध्ये तप हे श्रेष्ठ होय. तप आद्यकर्तव्य समजावे.’’ थोडक्यात मन आणि इंद्रियांना स्वाधीन करणे, आपल्या ताब्यात राखणे हेच उत्तम तप आहे. सर्व गोष्टींत हेच तप श्रेष्ठ. तोच परमधर्म आहे. आद्यकर्तव्य आहे. मन आणि इंद्रियं स्वाधीन राहाणं, हाच प्रत्याहार आहे. पण या मनावर ताबा मिळविणे काय सोपे आहे? स्वामीजी या मनाची माकडाशी तुलना करून सांगतात की, ‘‘माकड मुळात चंचल त्यात त्याला एकाने यथेच्छ दारू पाजली. त्यामुळे त्याच्या चंचलपणाला आणखीनच ऊत आला. त्यात त्याला विंचू चावला. त्यामुळे ते माकड तडातडा उडय़ा मारू लागलं. त्यानंतर त्याला भूतबाधा झाली. मानवी मनाची स्थितीही त्या माकडासारखीच आहे. ते स्वभावतच चंचल असतं. वासनेच्या मद्याचा कैफ चढून ते आणखीनच क्षुब्ध होते. वासनेचा अंमल बसल्यावर त्याला मत्सराचा विंचू नांग्या मारू लागतो. या सर्वावर कडी म्हणजे गर्वरुपी पिशाच्च त्याला झपाटते आणि मग आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असं त्याला वाटू लागते. या मनाचा संयम करणे किती कठीण गोष्ट आहे!’’ हा मनसंयम कसा करावा? स्वामीजी सांगतात की त्याची पहिली पायरी म्हणजे या मनाला हवे तसे भरकटू देणे. चंचल मनरूपी माकडाला हव्या तितक्या उडय़ा मारू द्या. तुम्ही फक्त स्थिर बसा आणि त्याच्या चेष्टा साक्षीभावाने शांतपणे पहात राहा, असे स्वामीजी सांगतात. हे जे शांतपणे पहात राहाणे आहे ते कशासाठी आहे? आपण मनाकडे, मनाच्या ओढीकडे, मनाच्या हालचालींकडे, मनाच्या क्रिया-प्रतिक्रियांच्या साखळीकडे कधीच त्रयस्थपणे, अलीप्तपणे पाहात नाही. त्यामुळे मनाबरोबर आपण फरपटत जातो, वाहवत जातो. एकदा शांतपणे मनाच्या या हालचालींकडे पाहिलं की मनाची खरी ओढ कुठे आहे, ते समजेल. त्या ओढीपायी मन अर्थात मी कसा वाहावत जातो, कसा फरपटत जातो, त्याचीही स्पष्ट जाणीव होईल. स्वामीजी म्हणतात, ‘‘ज्ञान ही शक्ती आहे, अशा अर्थाची एक म्हण आहे. ती अगदी खरी आहे. मन काय करीत असते ह्य़ाचं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा संयम करू शकत नाही.’’ ज्ञान ही शक्ती आहे, म्हणजे काय? तर ज्ञान होताच योग्य त्या कृतीसाठी आवश्यक शक्ती प्रथम ज्ञानच पुरवते. आगीने मी पोळला जातो, हे ज्ञान असते तेव्हाच त्या आगीकडे खेचला जाणारा स्वतच्या बचावासाठी प्रयत्न सुरू करतो. त्यासाठीची शक्ती त्याच्या आतूनच उसळून येते.