अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१०. एकाग्र Print

चैतन्य प्रेम, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
मन आणि इंद्रिये एकाग्र करणे, त्यांना स्वाधीन करणे, आपल्या ताब्यात राखणे हेच परम तप आहे. तोच परम धर्म आहे. तेच आद्यकर्तव्य आहे. तोच प्रत्याहार आहे. यातील प्रत्येक शब्द हा व्यापक आहे, अर्थगंभीर आहे. मन आणि इंद्रियांना ‘एकाग्र’ करायचं.

एक अधिक अग्र म्हणजे एकाग्र. एकाच टोकावर, एकाच अग्रावर त्यांना केंद्रित करायचं. अग्र हा शब्द सर्वोच्च उंचीही दाखवतो. सर्वश्रेष्ठत्वही सूचित करतो. हे उच्च केंद्र अर्थातच भगवंत आहे. आज मन आणि इंद्रिये दुनियेतदेखील ‘एकाग्र’ नाहीत! दुनियेतही ती अनेक ठिकाणी विखुरलेली आणि अनेक ठिकाणी चिकटलेली आहेत. दुनियेतील एकाच व्यक्तिवर, एकाच स्थितीवर, एकाच वस्तुमात्रावर माझं मन आणि इंद्रियं विसंबून रहात नाहीत. ज्या ज्या व्यक्तिकडून, स्थितीकडून, वस्तुमात्राकडून ‘सुख’ मिळेल, असा आभास आणि आशा मला वाटते तिथे तिथे माझं मन धावत रहातं. तरीही ‘एकाग्र’तेची अल्पशी झलक जरी मिळाली तरी मनाला विश्रांति मिळते, हा आपलाही अनुभव आहे. आपल्या आवडीचं एखादं पुस्तक वाचताना, एखादा चित्रपट वा नाटक पाहताना, एखादं गाणं ऐकताना, एखादं वाद्य ऐकताना वा एखादा छंद जोपासताना आपण स्वतलाही क्षणभर विसरून त्या गोष्टीच्या आस्वादनात तन्मय होऊन जातो. हे स्वतला विसरणे म्हणजे मोठं ओझं उतरणंच आहे. जोवर स्वतच्या ‘मी’पणाचं ओझं आपण वागवत असतो तोवर क्षणोक्षणी आपलं जगणं किती सापेक्षतेनं जखडलं असतं! जेव्हा स्वतलाही आपण विसरून तन्मय होतो तेव्हा कधी कधी आपल्या आंतूनही अंतस्फूर्ती जागी होते, प्रतिभाशक्ती जागी होते, सर्जनशील असे भावतरंग उमटतात. परवीन सुल्ताना किंवा कुमार गंधर्व अशासारख्या तपस्व्यांचं गायन ऐकताना त्यातील सूरप्रवाहात आपण जेव्हा डुबून जातो तेव्हा आपल्या अंतरंगात असे प्रातिभ भावतरंग उमटतात की ज्यामुळे अत्युच्च अशा आनंदस्पंदनांनी आपण भारून जातो. त्या स्पंदनांचे वर्णन शब्दात करता येत नाही. त्या क्षणी देहभान हरपलं असतं. हीच ‘एकाग्र’तेची झलक असते. मागे कामवासनेच्या चर्चेतही आपण पाहिलं की कामवासनापूर्तीच्या क्षणी माणसाची सर्व इंद्रियं आणि मन हे एकाच कामविषयात इतकं एकाग्र होतं की माणूस स्वतलाही विसरतो, काळाचं भान हरपतं, देहभान हरपतं. त्या विस्मरणातच खरं तर शांतीचा अनुभव तो घेतो. हीदेखील ‘एकाग्र’तेची स्थूलातील झलक आहे. भौतिक हे काळाच्या पकडीत असतं. त्यात बदल होत असतात. ते नश्वर असतं. त्यामुळे या भौतिकावर अवलंबिलेल्या ‘एकाग्र’तेचा अनुभवही क्षणिक असतो. परिस्थितीनुरूप असतो. नश्वर असतो. तरीही त्या क्षणापुरता ‘एकाग्र’तेचा आनंद माणूस अनुभवतो मग कालातीत असल्यानेच अखंड असलेल्या भगवंताच्या ठिकाणी माणूस जर एकाग्र होऊ शकला तर अखंड शांती आणि समाधान त्याला लाभणार नाही का?