अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २११. धोका Print

शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
माणूस स्थूल भौतिकातील नश्वर अशा गोष्टींतही एकाग्रतेमुळे मिळणाऱ्या नश्वर आनंदाची झलक अनुभवतो. त्याच्या अंतरंगात स्थूल भावतरंगही उमटतात आणि ते आतूनच प्रसन्नतेचा अनुभवही देतात. जर तो सूक्ष्म भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होईल तर त्याचे अंतरंग परमभावाने भरून जाईल. अष्टसात्त्विक भाव ही त्या परमभावाची सुरुवात आहे.

थोडक्यात शाश्वताशी एकाग्र होण्यात शाश्वत आनंदाची शाश्वती आहे. अशाश्वताशी एकाग्र होणं म्हणजे अशाश्वत आनंद अर्थात शाश्वत असमाधानाची शाश्वती आहे! म्हणूनच मन आणि इंद्रियांना शाश्वताशी एकाग्र करायला पाहिजे. प्रत्याहाराचा तो पाया आहे. मन आणि इंद्रियं दोन्ही एकाग्र झाल्याशिवाय काही उपयोग नाही. आपली अडचण अशी की उपासनेपासून प्रत्यक्ष आचरणापर्यंत आपण इंद्रियांचा संयम करीत रहातो पण मनाला मोकळं सोडतो! भगवंतांनी याला मिथ्याचार म्हंटलं आहे. गीतेत प्रभू सांगतात, ‘‘कर्मेद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्। इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते।।’’ (अध्याय ३/ श्लोक ६) म्हणजे जो कमेंद्रिये संयमित करतो (अर्थात डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहाण्याचं टाळतो, हातानं पापकर्म करण्याचं टाळतो, मुखानं पापसंभाषण टाळतो, पायांनी पापाचारपूर्तीसाठी गमन करणे टाळतो आदि) पण ज्याचं मन विषयांचंच सतत स्मरण करीत असतं तो मूढबुद्धीचा आहे. तो स्वतचीच फसवणूक करणारा आहे. त्याचं हे वर्तन म्हणजे मिथ्याचार आहे. आता काहीजण संतवचनांचे दाखले देत सांगतात की, मनात पाप आलं तरी एकवेळ चालेल पण शरीरानं तशी कृती होऊ देऊ नये. प्रत्यक्षात मनातही विषयांचंच चिंतन अखंड होत राहील तर ते कृतीला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. भगवंत सांगतात, ‘‘ध्यायतो विषयान् पुंस: सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते।।’’ (अध्याय २/ श्लोक ६२). विषयांचंच चिंतन झालं तर त्या विषयाच्या पूर्तीची ओढ उत्पन्न होते. विषयोपभोगाची आसक्ती उत्पन्न होते. त्या ओढीमुळे, आसक्तीमुळे माणसाचं मन कामानं, कामनेनं, वासनेनं असं आंदोलित होतं की मन तर वासनापूर्तीच्या इच्छेनं भारलं आहे पण शरीरानं कृती रोखली जात आहे, तर मग चित्तात क्रोध उत्पन्न होतो. असंतुलन उत्पन्न होतं. विसंगति उत्पन्न होते. त्या क्रोधानं काय होतं? ‘‘क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: । स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।’’ (अ. २/ श्लो. ६३). क्रोधापासून संमोह होतो. संमोहाने स्मृति विभ्रमित होते. स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीनाश झाला की पतन अटळ आहे! इथेसुद्धा प्रत्येक शब्दाची पेरणी कशी चपखल आहे पहा. नुसता मोह म्हंटलं नाही सम्मोह म्हंटलं आहे, नुसता भ्रम म्हंटलेलं नाही विभ्रम म्हंटलेलं आहे. मन वासनेनं भारलेलं आहे आणि शरीर ती रोखण्याच्या धडपडीत आहे तर चित्तात उत्पन्न होणारा क्रोध माणसाला पतनापर्यंत नेऊ शकतो!
चैतन्य प्रेम