अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २१२. अल्पस्मृतीचा रोग Print

शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
मनात वासना उसळी मारत आहे आणि शरीर त्या रोखत आहे तर चित्तात क्रोध उत्पन्न होतो. त्या क्रोधानं संमोह म्हणजे मोहाची परिसीमा गाठली जाते. मन त्या वासनापूर्तीसाठी अधिकच मोहित होतं. त्यातून स्मृती विभ्रमित होते. इथे जी ‘स्मृती’ आहे ती कोणती? तर मानवी जीवनाचं मूळ ध्येय, आपल्याला मानवी जन्म लाभला आहे त्याचा खरा हेतू भगवंताची प्राप्ती आणि त्यायोगे जीवन्मुक्ती साधमे हाच आहे, या वास्तवाचं विस्मरण होतं.

त्या वास्तविक हेतूच्या स्मृतीबद्दल मनात विभ्रम उत्पन्न होतात. जीवनाच्या मूळ हेतूची स्मृती नष्ट झाली, स्मृतीभ्रंश झाला की बुद्धी ताळ्यावर राहात नाही. वासनांध ‘मी’च्या वकिलीसाठी ती राबविली जाते. असा बुद्धीनाश जेव्हा होतो तेव्हा पतन हे अटळ आहे. तेव्हा जीवनाच्या मूळ हेतूच्या पूर्तीसाठीच्या मार्गावरचं पतन रोखायचं तर बुद्धी ताळ्यावर पाहिजे. ती स्मृती टिकायची असेल तर मनात वासनांचं चिंतन, त्यांच्या पूर्तीचा मोह आणि अपूर्तीचे तणाव ही साखळी तोडावीच लागेल. त्यासाठी मन आणि इंद्रियं यांची एकाग्रता अनिवार्य आहे. मन आणि इंद्रियांनी एकाग्र व्हायचं तर मनात वासनांच्या चिंतनाच्या जागी भगवंताचं चिंतन रुजावं लागेल. दुनियेत वावरत असताना, दुनियेतली कर्तव्यं करीत असताना माझ्या जन्माचा जो खरा हेतू भगवद्प्राप्ती त्याचं स्मरण ठेवावं आणि वाढवावं लागेल. मन वेळोवेळी दुनियादारीत भ्रमित होईल. त्याला अभ्यासपूर्वक भगवंताच्या स्मरणात जोडावं लागेल. तुम्ही ‘गझनी’ चित्रपट पाहिला का? त्यातील नायकाला शॉर्टटर्म मेमरी म्हणजे अल्पस्मृतीचा विकार जडला असतो. त्यामुळे आपण कशासाठी, कोणत्या ध्येयाच्या पूर्तीसाठी जगत आहोत, हे तो वारंवार विसरत असतो. त्या विस्मरणावर तोडगा म्हणून तो त्या ध्येयाची आठवण करून देणारे संदेश लिहून ठेवत असतो, त्या ध्येयाची आठवण करून देणारी छायाचित्रे भिंतीवर चिकटवत असतो. भगवंतप्राप्ती या एकमेव हेतूसाठी जन्मलेल्या माणसालासुद्धा असा अल्पस्मृतीचाच विकार तर जडला आहे! त्यावर उपाय म्हणून, त्या हेतूचं स्मरण करून देण्याचा उपाय म्हणून तर भगवंताच्या मूर्ती, तसबिरी आणि  संतवचनं आपल्या अवतीभवती असतात.. त्या पाहून आपली स्मृती जाग होते. ‘दिन गेले भजनावीण सारे’ अशी खंतही मनात उसळते आणि ध्येयपूर्तीसाठी आपण प्रयत्न करू लागतो. साधकाच्या प्राथमिक अवस्थेत असा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य़ जग आणि मन’ असा संघर्ष सुरू असतो. बाह्य़ जग आणि अंतर्मनातला त्याचा प्रभाव, बाह्य़ जगातील सुख उपभोगण्याची आस आणि अंतर्मनात त्यासाठी निर्माण होणारा झंझावात या दोन्हींमध्ये आपण झुंजत असतो. हे द्वंद्व संपवायचं तर आंतबाहेरची विसंगति संपवावी लागेल, अशाश्वताच्या जागी शाश्वताचीच ओढ रुजावी लागेल, त्यासाठी प्रत्याहारच हवा, हे आपल्याला उमगत असतं पण प्रत्याहाराचा अभ्यास कृतीत उतरवणं आव्हानात्मकच असतं.
चैतन्य प्रेम