अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१३. चार मार्ग Print

चैतन्य प्रेम, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात नाहीत, आपल्या स्वाधीन नाहीत आणि म्हणूनच दुनियादारीत आपली फरपट सुरू आहे. ही वृत्ती ताब्यात आणण्याचा अभ्यास म्हणजे प्रत्याहार. पू. बाबा बेलसरे यांनी वृत्ती ताब्यात आणण्याचे चार मार्ग सांगितले आहेत. ‘अध्यात्मदर्शन’ या ग्रंथात त्यांचे विवरण आहे.

बाबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, वासनांचा समूळ त्याग, हा वृत्ती ताब्यात आणण्याचा पहिला मार्ग आहे. पण वासनांचा समूळ त्याग हा सोपा नाहीच. फारच थोडय़ांना तो साधतो. वृत्ती ताब्यात आणण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे योग. योगात वृत्तीचा निरोध करायचा असतो. अर्थात वृत्ती थोपवायच्या असतात. रोखायच्या असतात. बाबा त्याला शेतातले सापाचे बीळ बुजविण्याची उपमा देतात! यात मोठा धोका असा की वासना आत दबून राहाते पण संधी मिळताच ती बाहेर पडते. वृत्तीनिरोधाने माणसाची वासना दिसत नाही पण वृत्तीवरील हे नियंत्रण कमजोर झाले किंवा भोग देणाऱ्या वस्तुंचा सहवास लाभला की वासना प्रकटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वृत्ती ताब्यात आणण्याचा हा दुसरा मार्गदेखील सर्वसामान्यांसाठी कठीणच आहे. तिसरा मार्ग म्हणजे स्वत: साक्षीत्वाने बाजूला सरून प्रथम वृत्तींच्या मागे जाण्याचे थांबवावे. नंतर हळुहळू वृत्ती उत्पन्न झाली की तिला तेथेच दाबून टाकण्याचा प्रयत्न करावा. यात विवेक अखंड जागृत ठेवावा लागतो. सामान्यपणे वृत्ती उत्पन्न झाली की तिच्याशी तद्रूप होऊन तिच्याबरोबर वहात जाण्याची सवय आपल्याला असते. या मार्गात ही सवय मोडायला प्रथम बुद्धीला कष्ट पडतात. बुद्धी जिवाचाच भाग असली तरी वेगळेपणाने जिवाकडे पाहू शकते. वृत्तीहून आपण निराळे आहोत, हे समजून वेगळे राहाण्याचा प्रयत्न करू लागलो असता आजपर्यंतच्या सवयीमुळे बुद्धी नकळत वृत्तीशी तन्मय होऊन जाते. वृत्तीपासून वेगळे राहाता येऊ लागले तरी खाली दडलेल्या वासनेतून झऱ्याप्रमाणे अखंड उफाळणाऱ्या वृत्ती एकदम आवरता येत नाहीत. यासाठी प्रज्वलित अग्नीप्रमाणे विवेक जागृत ठेवावा लागतो. हा ज्ञानमार्ग आहे. अर्थात तोदेखील सर्वाना साधणारा नाही. वृत्तीवर ताबा मिळविण्याचा चौथा मार्ग बाबांच्या मते सोपा उपाय आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, वृत्तीमध्ये बुद्धीबरोबरच कर्मप्रवृत्तीचाही अंश आहे. सामान्य माणसाला कर्माचे साह्य़ घेऊन वासना व तिच्यातून निर्माण होणारी वृत्ती नाहीशी करणे सोपे जाते. कर्माचे मूळ ऊर्मीमध्ये, ऊर्मीचे मूळ वृत्तीमध्ये असते. अर्थात वृत्तीचे स्वरूप जर बदलले तर कर्म तेच राहूनदेखील ऊर्मीचे स्वरूप बदलू शकते. आपला हेतू बदलून प्रपंच केला तर प्रपंच आहे तोच राहून अंतरंगात बदल घडून येईल. हेतु बदलण्यास वृत्तीचे वळण बदलले पाहिजे. सध्या ‘माझ्याकरिता मी’ हा वृत्तीचा ओघ आहे. त्या जागी ‘भगवंताकरिता मी’ असा ओघ लागला तर त्यातून निर्माण होणारे हेतु हे भगवंतव्याप्तच होतील आणि आपला प्रपंचही भगवंतासाठीच घडेल.