अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२४. अनुसंधान Print

चैतन्य प्रेम, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या ‘नियमा’च्या तीन उपांगांना ‘क्रियायोग’ म्हणतात. अर्थात ज्या क्रियेने परमात्म्याचा योग घडून येतो ती क्रिया! थोडक्यात जे काही ‘तप’ मी करीत असेन त्याचा एकमेव हेतू परमात्मयोग असला पाहिजे.

जो काही ‘स्वाध्याय’ मी करीत असेन त्याचा हेतू परमात्मयोग हाच असला पाहिजे आणि ‘ईश्वरप्रणिधान’ म्हणजे तर परमात्म्याचा पदोपदी संयोगच आहे! आता गीतेतही कायिक, वाचिक, मानसिक तप सांगितले आहेच. शरीरसुखाच्या आसक्तीची सवय मोडून शरीराला परमात्मप्राप्तीच्या मार्गात झोकून देणे हे कायिक तप झालं. आत्मस्तुती आणि परनिंदा, या चाकोरीत अडकलेल्या वाणीला परमात्मस्मरणात गोवून टाकणे, हे वाचिक तप झालं आणि मनाच्या सर्व सवयी, आवडीनिवडी मोडून मनाला परमात्ममननातच गोवून टाकणे, हे मानसिक तप झालं. हाच एकमेव स्वाध्याय झाला. हेच ईश्वरप्रणिधान होणं झालं. आपल्या चित्तात परमात्म्याचा निवास आहे. त्यामुळे ते चित्त शुद्ध करण्याचे प्रयत्न हेच ‘तप’ झालं. त्या प्रयत्नांतील सातत्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्यासाठी दररोज वेळ देणं, हा स्वाध्याय झाला. रोज ठराविक स्तोत्र वाचणं, पूजाअर्चा करणं, पोथी वाचणं, ठराविक संख्येने जप करणं, ठराविक वेळी आणि ठराविक काळ डोळे मिटून शांत बसणं आणि परमात्म्याचं स्मरण करणं, असा सर्व अभ्यास हा स्वाध्याय मानला जातो. थोडक्यात मनाची शुद्धी साधत असतानाच त्याच्यावर परमात्मचिंतनाचे संस्कार करणं या मार्गाने तप आणि स्वाध्याय सुरू राहातो. या दोन्हींच्या योगानं हळूहळू चित्त शुद्ध होत जाईल आणि परमात्म्याचं स्मरण इतकं वाढेल की माझं प्रत्येक कर्मही त्याच्याच चिंतनात होईल. हे ‘ईश्वरप्रणिधान’ होणं झालं. ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराचं अनुसंधान. ईश्वराशी सततचं जोडलं जाणं. आज माझं जगणं नश्वरप्रणिधान आहे. नश्वराचं अनुसंधान आहे. अशाश्वताचं अनुसंधान आहे. त्यामुळे पदोपदी अशाश्वताची चिंता मनात आहे. त्या अशाश्वताच्या शाश्वतीसाठी फक्त ईश्वराचं स्मरण आहे! मुलाचं लग्न एकदाचं होऊ दे बाकी ईश्वराकडे काही मागणं नाही.. झालं एकदाचं लग्न. आता दोघांचं भांडण होऊ नको दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. आता नातू होऊ दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही..  नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळू दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. तेव्हा ईश्वराचं स्मरण आहे पण ते नश्वरातलंच काही तरी मागत राहाण्यासाठी आहे. जेव्हा जे नश्वर आहे त्याची आसक्ती ओसरेल तेव्हाच ईश्वराकडे खरं लक्ष जाईल. तेव्हा जाणवेल की सुखाची चिंता हेच दुखाचं अमृत आहे. ती चिंता जोवर आहे तोवर दुख मरता मरत नाही. सुख आणि दुख यांच्याशी झुंजण्यातच कितीतरी शक्ती जाते. त्यापेक्षा सुखातीत आणि दुखातीत अशा शाश्वताशी संग साधला तर? त्या संगाची प्रक्रिया त्याच्या स्मरणातून सुरू होते. अनुसंधान ही पुढची पायरी झाली.