अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२९. ओळखण Print

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
नामदेव तेरढोकीला गेले होते आणि तिथे अवघा संतमेळा जमला होता. गोरोबाकाका मडकी तयार करीत म्हणून हसून ज्ञानदेव म्हणाले, काका आमची मडकी पहा हो पक्की आहेत की कच्ची? काकांनीही थापटी उचलली आणि एकेकाच्या डोईवर ती मारून ते सांगू लागले, मडकं पक्कं आहे. मग नामदेवांची पाळी आली. थापटी मारून ते म्हणाले, अरे, याचं मडकं मात्र कच्चं आहे! सगळे हसले तशी नामदेवांचा राग अनावर झाला.

तेथून ते तिरीमिरीतच बाहेर पडले. कधी एकदा विठोबाला जाऊन भेटतो असं त्यांना झालं. विठूच्या मूर्तीसमोर ते आले आणि हाका मारू लागले. विठोबा प्रकटले. नामदेवांना जवळ घेऊन म्हणाले, काय झालं? नामदेवांनी घडलं ते सांगितलं आणि ते रडू लागले. विठोबा म्हणाले, अरे तुला सद्गुरू नाही ना, म्हणून गोरोबा तसं म्हणाले. नामदेव उसळून म्हणाले, ‘‘तुला प्रत्यक्ष मी पाहातो, तुझ्याशी बोलतो, खेळतो. आता आणखी गुरू कशाला हवा?’’ प्रभू हसून म्हणाले, ‘जाऊ दे तो विषय. चल आपण फिरायला जाऊ’. दोघं बाहेर पडले. बरंच अंतर चालून गेले. पण कडाक्याचं ऊन पडलं होतं. नामदेवांना वाटलं, आता चालणं फार झालं. कुठेतरी विसावा हवा. तोच लांबवर एक मोठा वटवृक्ष दिसला. ती सावली पाहून ते सुखावले. प्रभूही म्हणाले, चल त्या झाडाखाली थांबू थोडा वेळ. ते जसजसे झाडाजवळ जाऊ लागले तसतसं नामदेवांना दिसलं एक भिकारी जोडपं आणि त्यांची मुलं बसली होती आणि एका कळकट्ट भांडय़ातील अन्न खाण्यासाठी भांडत होती. नामदेवांना शिसारी आली. पण प्रभू वेगानं झाडापाशी गेले. त्या भिकाऱ्यांनी हसून प्रभूंकडे ते भांडं दिलं. प्रभू म्हणाले, ‘नाम्या, भूकही फार लागली आहे. तू खाणार का?’ नामदेवांचं मन शहारलं. ते नाही म्हणाले. प्रभू प्रेमानं खाऊ लागले. खाणं झाल्यावर निघाले. नामदेव पावलं ओढत त्यांच्या मागून जात होते. प्रभू म्हणाले, ‘नाम्या. तुझं मडकं पक्कं व्हायचं असेल तर तुला गुरू लाभलाच पाहिजे.’ नामदेवांनी चिडूनच विचारलं, ‘‘तो शेवटी ज्याचं दर्शन करवणार त्याला तर मी लहानपणापासून पाहातोच आहे ना?’’ प्रभू हसून म्हणाले, ‘तू मला पाहातोस खरं पण मला खरं ओळखू शकत नाहीस. माझं खरं स्वरूप सद्गुरूशिवाय कोण सांगणार?’ नामदेव म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ओळखू शकत नाही?’’ प्रभू हसून म्हणाले, ‘अरे ते भिकारी जोडपं म्हणजे मी आणि रुक्मिणी होतो. ती मुलं म्हणजे गोपगोपी होते. आम्ही यमुनेच्या तिरी दुपारी जो गोपाळकाला करून खात असू तो गोपाळकाला त्या भांडय़ात होता. तूही तो खाल्ला असतास तर किती दिव्य प्रसाद लाभला असता तुला! पण तू मला आणि त्यांना भिकाऱ्याच्या रूपात ओळखू शकला नाहीस. झालं ते झालं. आता सद्गुरूशिवाय तू मला ओळखूच काय भेटूही शकणार नाहीस!’ क्षणार्धात प्रभू अदृश्य झाले. नामदेव थिजून उभे होते. काहीतरी मोठं गमावल्याचं दुखं सोबतीला होतं.
चैतन्य प्रेम