अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३०. दिव्ययोग Print

 

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
नामदेवांना एकच तळमळ लागली ती सद्गुरू शोधण्याची. मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना औंढय़ा नागनाथला तुझा गुरू मिळेल, असं सांगितलं. नामदेव वाट तुडवीत गेले. शंकराच्या मंदिरात त्यांना पिंडीवर पाय टाकून पहुडलेले विसोबा खेचर दिसले. त्यांना त्या तऱ्हेने पहुडलेले पाहून नामदेव संतप्त झाले. रागातच म्हणाले, अहो असं देवावर पाय ठेवून झोपणं तुम्हाला शोभतं का? विसोबा हसून म्हणाले, ‘बाबा रे मी फार थकलो आहे.

तूच जिथे शिवलिंग नाही तिथे माझे पाय ठेवं.’ नामदेवांनी वेगाने पुढं होत त्यांचे पाय पिंडीवरून उचलले आणि जमिनीवर ठेवू जाताच तिथे शिवलिंग प्रकटले. प्रत्येकवेळी हेच घडले आणि अवघे मंदिरच शिवलिंगाने भरून गेले. सद्गुरूंच्या चरणीं शिवलिंग असतं, या गोष्टीचा साक्षात्कार नामदेवांना झाला आणि त्यांना आपला गुरू मिळाला! आनंदून ते म्हणाले, मला सद्गुरूचा लाभ झाला हे प्रथम मी जाऊन माझ्या विठ्ठलाला सांगतो. धावतच ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि आनंदाने सांगू लागले. विठोबा प्रकटले नाहीत पण आवाज घुमला, तू गुरूला न ओळखता त्यांच्यावर रागावून बोललास. या तुझ्या पापामुळे मी अजून तुझ्यासमोर प्रकटणार नाही. नामदेव खजील होऊन परतले. विसोबांनी विचारले, काय झालं? नामदेवांनी सांगताच विसोबा हसले आणि जमिनीवर त्यांनी रामनाम लिहिले. म्हणाले यावर लोळण घे. नामदेवांनी तशी लोळण घेतली. विसोबा म्हणाले, झालं नामात तू लोळण घेतलीस आता कसले पाप नी कसले काय? सद्गुरूंनी असं नामदेवांना नामात बुडवून टाकलं. नाम आणि देव यांचा दिव्य योग त्यांच्या जीवनात साकारला. तर हा विषय कुठून सुरू झाला? परमात्म्याचा योग साधायचा तर त्याचा सहवास तरी लाभला पाहिजे किंवा त्याच्याशी एकरूप झालेल्याचा सहवास लाभला पाहिजे, इथून! पण असा सहवास लाभणे आणि लाभला तरी त्याला ओळखणे कठीण हे स्वत: प्रभूंनीच गीतेत सांगितलं, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्। परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्।।’’ अर्जुनालाही भगवंतानं किती तऱ्हेने स्पष्टपणे सांगितलं की या सर्व सृष्टीचा अधिष्ठाता मीच आहे, तरी त्याच्या मनातल्या शंका फिटल्या नाहीत. मग ज्ञान, कर्म, योग असे सारे मार्ग सांगितले. कोणकोणत्या प्रकाराने लोक माझ्याकडे यायचा प्रयत्न करतात, ते सांगितलं. तरी अर्जुनाच्या मनातली दिव्यत्वाच्या दर्शनाची ओढ शमेना तेव्हा विभूतीवर्णन केलं. सारं सांगून झाल्यावर म्हणाले, ‘अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन। विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्’ हे अर्जुना, इतक्या ज्ञानाच्या चर्चेची काय गरज आहे? माझ्या एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून आणि ते धारण करून आहे. तरी अर्जुनाची  भूक शमेना तेव्हा विश्वरूपदर्शन धडवावे लागले! यानंतरही ज्ञानचर्चा संपली नाही आणि अखेरच्या अध्यायात मग एकमेव योग प्रभूंनी सांगितला. काय आहे तो योग?
चैतन्य प्रेम