अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३१. जशी तुझी इच्छा! Print

चैतन्य प्रेम, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
भगवद्गीतेत साधनेच्या सर्वच मार्गाचं वर्णन आहे. पण परमात्म्याशी खरा योग साधणारा जो मार्ग आहे तो अठराव्या अध्यायाच्या शेवटी अवघ्या दोन श्लोकांत प्रभूने सांगितला आहे. काय आहे तो दिव्य योग? तो जाणण्यासाठी अठराव्या अध्यायातील काही श्लोकांच्या प्रचलित अर्थापलीकडे जाऊन त्याच्या गूढार्थातही बुडी मारावी लागेल.

गीतेचा समारोप होत आहे. अर्जुनाला सर्व मार्ग, सर्व ज्ञान सांगून झालं. स्वतचं विराट रूपदर्शनही भगवंतानं घडविलं. ते अर्जुनाला साहवेना. तू पूर्वीच्याच रूपात ये, असं अर्जुनानं विनवलं तेव्हा त्या रूपात प्रभू परतले. मग खरं तर सांगायचं काय उरलं होतं? ज्याला मी सखा मानून त्याच्याशी मनाला येईल त्याप्रमाणे वागत होतो तोच सर्व चराचराचा नियंता आहे, हे समजल्यावर आता तो जसं सांगेल तेवढंच करायचं, यापलीकडे काय करणं शेष होतं? पण दिव्यदर्शन ओसरलं तरी ज्ञानचर्चा सुरूच राहिली. याचाच अर्थ दिव्यत्व लखलखीतपणे दिसूनही त्याच्या सांगण्यानुसार तात्काळ आचरण सुरू झालं नाही! मग अखेर प्रभू जणू अलीप्त झाले. ‘मीच ईश्वर’ हे सत्य सांगणं थांबवून ते म्हणाले, ‘‘हे अर्जुना ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जिवासाठी तो जणू ताटकळत आहे. तरी मायेच्या प्रभावाने जीव यंत्रवत् भरकटत आहे! (ईश्वर: सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति। भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया।। अध्याय १८/ श्लोक ६१) यावर उपाय एकच हे अर्जुना जिवानं मायेला शरण न जाता परमेश्वराला शरण जावं. त्याच्याच कृपेने दिव्य शांती लाभेल. (तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत्प्रसादात्परं शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।। अ. १८ / श्लो. ६२) जो प्रभू साक्षात पुढे उभा होता, इतकावेळ मीच सर्वत्र आहे, सर्वामध्ये स्थित आहे, माझ्यावर सर्व भार सोपव आणि तू तुझे विहित कर्म कर, असे सांगत होता तो लगेच ‘श्रीकृष्ण’ या आवरणाआड लपला आणि अर्जुनाला कुणा ईश्वराकडे जायला, मायाशरणता सोडायला सांगू लागला, यामागे रहस्य आहे. अर्जुना परमेश्वराला शरण जा आणि शांती मिळव, असं सांगून प्रभू बाजूला सरले. इतकं बोलून ते थांबले नाहीत. पुढे म्हणाले, ‘‘इति ते ज्ञानमाख्यातं गुह्य़ाद् गुह्य़तरं मया। विमृश्यैतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरू।।’’ (अ. १८ / श्लो. ६३) बाबारे, गुह्य़ात गुह्य़ असं ज्ञान मी सांगितलं. त्याचा पूर्णपणे (अशेषेण) विचार कर, विमर्श कर आणि मग? मग तुझ्या मनाला येईल तसं कर, तुझी इच्छा असेल तसं कर! आपणही बहुदा इथपर्यंतच गीता वाचतो आणि लगेच आपल्या मनाच्या कलानुसार प्रभूंनी सांगितलेल्या ज्ञानाचे लचके तोडून तो लचका म्हणजेच पूर्णज्ञान आहे, या अविर्भावात उच्चरवानं सांगू लागतो की, गीतेत हठयोगच सांगितला आहे, गीतेत कर्मयोगच सांगितला आहे, गीतेत ज्ञानयोगच सांगितला आहे! यथेच्छसि तथा कुरू! ६३ व्या नंतर ६४ वा श्लोक येतो पण त्यादरम्यान निश्चित काहीतरी घडले आहे खास!