अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३२. बुडत्याचा मान Print

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
यथेच्छसि तथा कुरू! सत्य काय ते मी तुला सांगितलं. माझं खरं स्वरूप जे देवांनाही दुर्लभ आहे तेसुद्धा तुला दिव्यदृष्टी देऊन दाखवलं. आता तरीही काय करावं, हे तुला उमगत नसेल तर जशी तुझी इच्छा तसं कर! प्रभू असं उद्गारले मात्र अर्जुनाला त्यातला धोका लगेच जाणवला. ६३ आणि ६४ या श्लोकांत घडलं ते हे! अर्जुनाला जाणवलं, मनाच्या इच्छेनुसार वागूनच तर अनेक जन्म वाया गेलेत. त्या प्रत्येक जन्मात प्रभूंनी मला जागं करण्याचा प्रयत्न केला.

मी किती जन्मं या चक्रात आहे, हे मलाही माहीत नाही. पण प्रभूंना ते माहीत आहे. प्रभूच तर म्हणाले होते, ‘बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव अर्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप।। (अ. ४ / श्लो. ५)’ हे अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेत. तुला ते आठवत नाहीत पण मला आठवतात. याचाच अर्थ त्या प्रत्येक जन्मात मला या चक्रातून सोडविण्यासाठी प्रभू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझ्यापाशी आले आहेत आणि त्यांनी मला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जन्मात त्यांचा सहवास लाभला आहे. या जन्मात ते सखारूपाने आले. तरी गेले अनंत जन्म त्यांचा सहवास लाभूनही मी सत्याच्या मार्गाने, त्यांच्या सांगण्यानुरूप चाललो नाही. आता हा जन्मही असाच वाया गेला तर काय अर्थ आहे? या जन्मी इतका साक्षात संग लाभून, त्यांचं खरं स्वरूप जाणूनही जर मी भरकटत राहिलो तर काय उपयोग आहे? अर्जुनाच्या मनात हे विचार आलेच असावेत. एक फार मानी माणूस होता. तो नदीत पडला आणि बुडू लागला. त्याची धडपड पाहून एका उत्तम पोहोणाऱ्याने उडी मारली आणि त्याला धरले. तेवढय़ात एक लाकडाचा ओंडकाही वाहात आला, त्याला धरायला त्या बुडत्याला सांगितले. त्या पोहोणाऱ्यानं पकडलं आणि तो ओंडकाही मिळाला म्हणून हा बुडत नव्हता आणि बुडत नसल्यानं त्याच्यातला मानीपणा जागा झाला! पोहोणारा बुडणाऱ्याला म्हणाला, ‘‘घाबरू नकोस, मी आलोय ना? मी तुला काठावर नेतो.’’ हा म्हणतो, ‘‘काठावर माझा मी जाईन, फक्त कसं जाऊ ते एकदा सांग.’’ मग पोहोणाऱ्यानं पोहायला कसं शिकावं, ते सांगितलं. आजवर कोणकोण कसेकसे कुठवर पोहून गेले, ते सांगितलं. सगळी शाब्दिक ज्ञानचर्चा! मग बुडणारा म्हणाला, तुम्हाला चांगलं पोहोता येतं, यावर मी विश्वास कसा ठेवावा? मग त्या पोहोणाऱ्यानं कित्येक क्षणासाठी खोल बुडी मारून दाखवली, पोहोण्यातलं नैपुण्य दाखवलं. मग म्हणाला, ‘‘बाबारे चल आता. माझ्यावर सगळा भार टाक. मी नेतो तुला.’’ बुडता म्हणतो, ‘‘नको माझा मी येईन. हा ओंडकासुद्धा आहेच की!’’ पोहोणारा म्हणाला, ‘‘कुणी सांगावं, प्रवाहाबरोबर हा वाहू लागेल आणि तुला पुन्हा नदीच्या मध्यात नेईल.’’ तरी बुडत्याचं म्हणणं एकच, माझा मी येईन. मग पोहोणारा काठाकडे जात म्हणाला, ‘‘यथेच्छसि तथा कुरू!’’ अर्जुनानं हा धोका ओळखला.
चैतन्य प्रेम