अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३३. परम आदेश Print

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
जशी तुझी इच्छा असेल तसं कर, असं सांगून प्रभू दुरावत आहेत. आपण एकटे पडणार आहोत, बुडणार आहोत. हा धोका अर्जुनानं ओळखला आणि त्यानं अंतर्मनातून प्रभूंना विनवलं की, प्रभू सर्व ज्ञान ऐकलं, सर्व मार्ग ऐकले. पण मी नेमकं काय करू? माणूस खूप काही बोलल्यानंतर जाता जाता जे शेवटचं म्हणून सांगतो, त्यात अत्यंत महत्त्वाची अशीच गोष्ट असते.

इथे तर प्रभूच होते. शेवटचं महत्त्वाचं म्हणून जे सांगायचं ते त्यांनी असं सांगितलं नाही की, बाबा रे तू हठयोगच कर किंवा बाबारे तू ज्ञानयोगच कर. ‘नेमकं काय कर’ हे सांगताना प्रभूंनी अवघ्या दोन श्लोकांत एकच योग मांडला. तो मांडण्याआधी ते म्हणाले, ‘सर्वगुह्य़तमं भूय: श्रृणु मे परमं वच:।’ बाबारे सर्वात गुह्य़ अशी गोष्ट मी तुला पुन्हा सांगतो आहे, हा माझा जणू परम आदेश आहे, तो ऐक! आता इथे प्रभू पुन्हा का म्हणाले? याचाच अर्थ हा एकमेव गुह्य़ मार्ग आधीही सांगून झालेला आहे. या ‘पुन्हा’चा विचार नंतर करू त्याआधी तो परमआदेश ऐकू. पहिल्या श्लोकात प्रभू सांगतात : मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू। मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।। (अ. १८ / श्लो. ६५) माझं मन आणि तुझं मन एकच होईल असे कर, माझा भक्त होशील अर्थात माझ्यापासून कधीही विभक्त होणार नाहीस असे कर, माझी पूजा करून स्वतच पूज्य अर्थात शून्यवत होऊन जा, मलाच नमस्कार कर अर्थात निराकार अशा माझ्याशिवाय कोणत्याच आकाराची सूक्ष्मही ओढ उरू देऊ नकोस. पण एवढी मोठी गोष्ट साधणार कशी? त्यासाठी अखेर सांगतात, ‘‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।।’’ (अ. १८ / श्लो. ६६) सर्व धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू घाबरू नकोस. आता सर्व धर्माचा त्याग कर, याचा अर्थ काय? तर धर्म म्हणजे मनोधर्म! मनाच्या आवडी, मनाच्या ओढी, मनाचे धर्म. त्या सर्वाचा त्याग कर आणि त्यांना शरण न जाता मलाच शरण ये. पाप आणि पुण्य यामुळेच जन्ममृत्यूचा खेळ सुरू आहे. पापाचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पाप संपवावं लागतं. तसेच पुण्याचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पुण्य संपवावं लागतं. अर्थात पाप जसं गुंतवतं तसंच पुण्यही गुंतवतंच! पण मुळात माणसाचा ओढा पापाकडेच असल्यामुळे त्याला पुण्यकर्माकडे वळवावं लागतं. निदान एका माणसानं पापकर्मे सोडून दिली तर इतरांचंही दुख कमी होईल आणि त्याचाही दुखभोग कमी होईल, हा एकच हेतू. जो निष्पाप होतो त्याला मग निष्पुण्यही करावं लागतं! एखाद्याचं पाप स्वीकारून ते नष्ट करणं हे केवळ सत्पुरुषालाच साधतं अगदी त्याचप्रमाणे एखाद्याचं पुण्यही स्वीकारून त्यातून निर्माण होणारं प्रारब्ध नष्ट करायलाही ताकद लागते. म्हणूनच अत्यंत पुण्यवानाकडे परमात्मा जसा सहज जातो तसाच अत्यंत पाप्याकडेही तो सहज जातो!
चैतन्य प्रेम