अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३९. कबीरांच्या वाटेवर Print

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
शिक्षणाच्या निमित्ताने हिंदी साहित्य हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. तेव्हा कबीर साहित्याचा प्रथम परिचय झाला. तरी ‘माटी कहै कुम्हार से तू क्या रूँदै मोहिं’ ही लक्ष्मीशंकर यांच्या शांतसात्त्विक स्वरातली रचना आणि नंतर कुमारांच्या स्वरातील निर्गुणी भजनं वगळता कबीरांच्या साहित्याची फारशी जाण नव्हती. कबीर, तुलसी, सूरदासांपेक्षा डाव्या विचारसरणीची कविता मनाला अधिक भिडत होती. अज्ञेयांची ‘कितनी नावों में कितनी बार’सारखी गूढ कविता आवडत असली तरी त्यातल्या रूपकांचे आध्यात्मिक अर्थ अज्ञातच होते.

पुरुष आणि प्रकृती या दोन प्रतिमांच्या पायांवर उभारलेल्या जयशंकर प्रसाद यांच्या ‘कामायनी’ची आध्यात्मिक भव्यताही अस्पर्शच होती. त्याऐवजी नागार्जुनांचे शब्द मनात रूतत होते. सर्वात आवडती होती ती हरिवंशराय बच्चन यांची ‘मधुशाला’. ‘‘धर्म-ग्रंथ सब जला चुकी है / जिसके अन्तर की ज्वाला / मंदिर, मस्जिद, गिरजे- सबको तोडम् चुका जो मतवाला / पंडित, मोमिन, पादरियों के फंदों को जो काट चुका / कर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला।’’ किंवा ‘‘मुसलमान औ’ हिन्दू हैं दो / एक, मगर, उनका प्याला, / एक मगर, उनका मदिरालय, एक मगर उनकी हाला; / दोनों रहते एक न जबतक मस्जिद-मन्दिर में जाते; / वैर बढमते मस्जिद-मंदिर, / मेल कराती मधुशाला।’’ अशा रुबाया थेट आत घुसायच्या. त्यातली रूपकांची भव्यता आणि दिव्यता बेहोष करायची. पण ‘या धरतीवर माणूस अवघा एक आहे. त्याच्या शरीराचा प्याला एकच आहे. त्यातली भगवंताच्या प्रेमाची हालाही एकच आहे. भगवत्प्रेमाची बेहोषी एकच आहे. पण जोवर तो एक होत नाही, ती हाला चाखत नाही तोवर बेहोषी नाही. भेदाभेदाचा होश आहे तोवर ते भगवत्प्रेम चाखता येत नाही. उलट त्या भगवंताचं प्रार्थनामंदिर म्हणून तो जे काही उभारतो त्याच्याच जोरावर तो वेगळेपणाचा भाव जोपासतो. जेव्हा भगवंताचं वेड लागेल तेव्हा हा वेगळेपणाही उरणार नाही’, हा हरिवंशरायांच्या शब्दांचा गहिरा भाव उमगत नव्हता. कबीरांचंही तसंच आहे. ‘कबीर’ तेव्हा तर उमगला नव्हताच आणि आज तो जितका वाचावा तितका अज्ञातही खूप उरतोच. पूर्ण कबीर वाचणं, समजणं आणि उकलणं हे फार कठीणच. त्यामुळे कबीरसाहेबांच्या शब्दांचं बोट धरून, त्या शब्दांचीच विनवणी करीत आपण त्यांच्या आंतरिक भावार्थाच्या वाटेवर पावलं टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे कबीरांचं समग्र दर्शन नाही. झलक आहे. त्याची कारणं दोन. पहिलं कारण म्हणजे आपल्या या सत्संगाचे शेवटचे जेमतेम दोन महिने उरले आहेत. इतक्या अल्पावधीत कबीरांचं यथायोग्य आकलन कठीण आहे आणि दुसरं खरं कारण म्हणजे त्या समग्र दर्शनासाठीचा माझाही आवाका नाही. त्यामुळे काही मोजक्या दोह्य़ांचा मागोवा घेत आपण कबीरांचा विचार जाणून घेणार आहोत.
चैतन्य प्रेम