अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४०. कबीर आणि आपण Print

 

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
कबीर महाराजांच्या दोह्य़ांकडे वळण्याआधी एकागंभीर मुद्दय़ाचा आपण विचार केला पाहिजे. तो मुद्दा म्हणजे खरचं कबीर आपल्याला जाणून घ्यायचा आहे का आणि असला तर का? आज कबीर झेपणारा, पचणारा आहे का? आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर हा प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही. याचं कारण मध्ययुगात मोघलांची सत्ता असतानाही आणि ती सत्ता इथे त्यांचा धर्म प्रस्थापित करण्यासाठी बळाचा वापर करीत असतानाही कबीरांनी मुस्लिमांच्या पाखंडावर बेदिक्कत ताशेरे ओढले.

हा देश हिंदुबहुल असतानाही आणि काशी या धार्मिक राजधानीला खेटून राहात असतानाही कबीरांनी हिंदूच्या पाखंडावर सडेतोड ताशेरे ओढले. आजही ती पाखंडं तशीच आहेत पण मुघल सत्ता असतानाही आणि हिंदूच्या संख्याबळाचा जोर असतानाही प्राणांची पर्वा न करता कबीरांनी जे सत्य लखलखीत शब्दांत सांगितलं ते आजच्या सर्वात बलाढय़ लोकशाही असलेल्या देशाला पचवणं जड जाणारंच आहे. त्या काळी कबीरांना सुलतानाकरवी मारण्याचे प्रयत्न झाले आणि आजही तसे झाले असतेच. अर्थात कबीरांनी त्याची पर्वा केली नसतीच. कारण ते कुणा धर्मियाला जागं करू पाहात नव्हते तर माणसाला जागं करू पाहात होते. माणूस आधी जन्मला. धर्म नंतर चिकटला. त्यामुळे माणसाचा खरा धर्म ते त्याला सांगू पाहात होते. आज काळ बदलला आहे. जग सुधारलं आहे. लोकशाहीही आहे. पण तरी विचारांची परिपक्वता आणि स्वतंत्रता आली आहे का? उलट प्राचीन काळी अत्यंत प्रतिकूल वातावरणातसुद्धा जे विचार स्वातंत्र्य होतं ते आज बलाढय़ लोकशाही पाठिशी असताना संकुचित होत चाललं आहे. पाखंड तर आहेच पण ढोंगसुद्धा वाढत आहे. अशा समाजाला आज कबीर परवडणारा आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अशा वातावरणात कबीराचं म्हणणं खरं काय आहे, त्यांचा खरा भाव काय आहे, हे वैचारिक दुराग्रह आणि भावनांचं सोयीचं दुखावरंपण बाजूला ठेवून जाणून घ्यायची खरी कळकळ कुणाला आहे का, हा गंभीर प्रश्न आहे. श्रीमहाराज एकदा रेल्वेस्थानकात उभे होते. सकाळची गर्दीची वेळ. त्यामुळे लोकांची गाडी पकडण्यासाठी नुसती धावाधाव सुरू होती. जो तो घाईगडबडीतच होता! त्यांना बघूनच महाराज हसून म्हणाले, सतत धावणाऱ्या या लोकांना क्षणभर थांबून माझं काही ऐकायला वेळ तरी असेल का? हसून एक शिष्य म्हणाले, हे धावून धावून दमतील ना तेव्हा केवळ तुमचंच ऐकून यांचं मन खऱ्या अर्थानं शांत होईल! आज आपण असेच धावतो आहोत. त्यात डोक्यावर धर्माची, वैचारिक दुराग्रहाची, मतांची ओझीही आहेतच. त्यामुळे वेगानं धावता धावता कबीर वाचणं आणि मग तो पचणं सोपं नाहीच. पण धावून धावून दमून जाऊ तेव्हा कबीरांसारख्या सत्यमार्गदर्शकाच्या शब्दांशिवाय दुसरा अस्सल आधारही नसेल. धावणारं हे जग काय म्हणतंय तिथपासूनच सुरुवात करू!
चैतन्य प्रेम