अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४१. क्षेमकुशल Print

 

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
जग धावत आहे. त्या धावपळीतच कुणी ओळखीचं भेटलं की तोंडदेखलं हसण्याचं आदानप्रदान होतं. ‘कसं काय? ठीक ना?’ कुणीतरी प्रथम विचारतो आणि दुसरा उत्तर देतो, ‘सगळं ठीक. तुम्ही कसे आहात?’ पहिला सांगतो, ‘मजेत आहे.’ एवढी प्रश्नोत्तरं आटोपून दोघे पुन्हा धावायला मोकळे! मुळात दोघंही दोघांचंही सगळं काही ठीक चाललेलं नाही. पण रीत आहे, सगळं ठीक आहे असं म्हणण्याची.

‘कसं काय सगळं ठीक ना?’ या प्रश्नावर ‘सगळं ठीक’ हे उत्तर न देता सगळं कसं ठीक नाही, हे जर दुसरा सांगायला लागला तर विचारण्याकडे ऐकण्याएवढा वेळ नसतो! त्यामुळे सगळं काही बेठीक असताना जो तो ठीक आहे, असं म्हणून मोकळा होतो. कबीरदास म्हणतात, ‘‘कुसल कुसल ही पुछते, जग में रहा न कोय। जरा मुई ना भय मुआ, कूसल कहाँ से होय।।’’ सगळं ठीक ना, असं विचारणारे आणि सगळं ठीक, असं उत्तर देणारे.. त्यांच्यापैकी या जगात कुणीही मागे रहात नाही. अहो वृद्धत्व थोपवता येत नाही आणि मृत्यू थोपवता येत नाही मग कुशल कसं काय असणार? आता आपल्याला वाटेल वृद्धत्व आणि मृत्यू टाळता येणं म्हणजे खरी ख्यालीखुशाली आहे का? तर कबीरांचा तो रोख नाही. परमार्थाच्या मार्गावर परमात्म्याशी ऐक्य साधणं हाच खरा मोठा लाभ आहे. त्यानंच सगळं काही ठीक नव्हे उत्तम होऊन जातं. ती खरी ख्यालीखुशाली आहे. मग वृद्धत्व आणि मृत्यूचा उल्लेख कबीर करतात तो कशासाठी? या उल्लेखातून ते केवळ दाखवतात की जन्माला आल्यापासून माणसाची मृत्युकडेच वाटचाल चालू आहे. हे आयुष्य ज्या परमात्मऐक्यासाठी लाभलं आहे ते साधण्यासाठी मात्र धावपळीत माणसाला उसंतच नाही. ते काय नंतर करू, अध्यात्मबिध्यात्म या म्हातारपणच्या गोष्टी आहेत, असंही तो मानतो. बालपण, तारुण्य, प्रौढपण झपाटय़ानं ओसरतं आणि म्हातारपण येतंदेखील. शरीराच्या सर्व क्षमता घटत जातात. हाती म्हटलं तर वेळच वेळ असतो पण परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी मनाची आणि शरीराची पूर्ण क्षमतेनिशी साथ असतेच असं नाही.  ना ते वृद्धत्व थोपवता येतं ना मृत्यू थोपवता येतो. वृद्धत्व झपाटय़ानं शरीरावर ताबा मिळवतं आणि मग मनही हळवंदुखरं करून टाकतं. आणि मृत्यू? तो तर कोणत्या क्षणी येईल, याचा भरवंसाच नसतो. मग खरं हित साधायला वेळ कुठला? जोवर वेळ होता तोवर त्याचं भान नव्हतं. आता भान आलं पण वेळ हाताशी नाही! जोवर वेळ होता तोवर जे नश्वर आहे त्याच्यासाठी धावाधाव केली. त्यातलं काहीच बरोबर नेता येणार नाही. कबीरदास धावणाऱ्याला सावध करीत म्हणतात, ‘‘कबीर यह तनु जातु है, सकै तो राखु बहोर। खाली हाथों वे गये, जिनके लाख करोर।।’’ अडवण्याचा कितीही प्रयत्न करा तरी हे शरीर जाणारच, बरोबर तर काहीच जाणार नाही. अहो ज्यांच्याकडे लाखो-करोडो रुपये होते तेही रिकाम्या हातानंच तर गेले..
चैतन्य प्रेम