अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४२. कहत कबीर Print

चैतन्य प्रेम, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
जिवाची भटकंती ८४ लक्ष योनींतून सुरू असते. मनुष्यजन्म त्या योनींत नाही. याचाच अर्थ अन्य ८४ लक्ष योनी ज्या आहेत त्यात जन्म-मृत्यूचं चक्र भेदण्याचा कोणताच उपाय नाही. मनुष्यजन्मात मात्र ते शक्य आहे.

त्यामुळेच मनुष्य जन्माला येऊनही शाश्वताऐवजी अशाश्वतामागे धावण्याच्या वृत्तीबाबत सर्वच संतांनी सजग केलं आहे. अशाश्वताचा पसारा वाढविण्याला कोणीच प्रोत्साहन दिलेलं नाही. कबीरांचा एक रजपूत राजा शिष्य होता. त्याचं नाव राणा वीरसिंह. त्यानं मोठा प्रासाद उभारला. तो पाहण्यासाठी त्यानं कबीरांना अगत्यानं नेलं. महाल पाहून कबीर निघाले तेव्हा राणानं विचारलं, कसा वाटला महाल? कबीर म्हणाले, महाल चांगला आहे पण त्यात दोन दोष आहेत. राणानं विचारलं, कोणते? कबीरजी उत्तरले, एकतर हा कायमचा टिकणारा नाही. कधी ना कधी जमीनदोस्त होणार. दुसरं म्हणजे त्याचा मालकही कायमचा नाही. तोही कधीतरी महालच काय हे जगही सोडून जाणार! कबीरांचं एक भजन आहे. त्यात ते म्हणतात-
केते दिन को उठाये ठाट।। धृ.।।
जौन यतन तुम देही पाली, सो देही मिली माटी खाक।।१।।
मर मर जइहो फिर फिर अइहो, करलो सौदा येही हाट।।२।।
प्राण पखेरू नगर है काया, ना जानो जाये किहि बाट।।३।।
कहँ कबीर सुनो भाई साधो, तब का करि हो कागज़्‍ा फाट।।४।।
केते दिन! किती दिवस हा तुमचा थाटमाट राहणार? या देहाला राखण्याचा, जपण्याचा कितीही प्रयत्न करा तो मातीत मिळणार, खाक होणारच. कितीवेळा तुम्ही असे मेलात आणि कितीदा जन्मलात. निदान आता या खेपेस दुनियेच्या चोरबाजारात वेळ घालवण्याऐवजी परमार्थाचा जो खरा हाट भरला आहे त्याचा लाभ घ्या. अहो मानवी देह ही नगरी आहे आणि प्राण पक्षी आहे. तो कधी आणि कोणत्या वाटेनं उडून जाईल, याचा पत्ताही लागणार नाही. तुमच्या जीवनाचा कागद फाटून जाईल तेव्हा काय उरणार? जीवनाचा कागद! परमात्म्याशी जणू करार करून आपण या जगात आलो आहोत. त्या करारात परमार्थ साधण्याची हमी आपण दिली आहे आणि किती दिवस आपण इथे राहाणार, याची हमी त्यानं दिली आहे. जन्मापासून प्रत्येक क्षणाचा त्याचा हिशेब सुरू आहे. शेवटचा क्षण संपला की तो करारनामा नष्ट होतो. मग तोवर जर परमार्थ साधला नसेल आणि हाती कराराचा तुकडाही नसेल, तर जिवाला कुठला अधिकार! मग जो वेळ मिळाला आहे तो नश्वराच्या थाटमाट जोपासण्यात कशाला घालवता? हातपाय पसरून दुनियादारीत पहुडलेल्या जिवाला कबीर जाग करीत म्हणतात, ‘‘कबीर सोता क्या करै, उठि कै जपो दयार। एक दिना है सोवना, लम्बे पाँव पसार।।’’ मोहनिद्रेत सुस्तावण्यापेक्षा दयाळू परमात्म्याचं स्मरण कर. देह सोडताना तर पाय लांब करून शेवटचं झोपायचंच आहे!