अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४३. गफलत (पूर्वार्ध) Print

चैतन्य प्रेम, सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२
माणसाच्या जन्माला येऊन शाश्वताच्या प्राप्तीसाठीच जगलं पाहिजे, असं कबीरही सांगतात. काहीजणांना वाटेल हा शब्दांचा खेळ आहे झालं. प्रत्यक्षात आपण जर सूक्ष्मपणे विचार केला तर जाणवेल की आपल्यालाही खरी ओढ शाश्वताचीच असते. आपण जे काही मिळवतो ते कायमचं टिकावं, अशीच आपलीही इच्छा असते.

त्यात वाढ व्हावी, एकवेळ वाढ झाली नाही तरी चालेल पण घट होऊ नये, ही आपली अपेक्षा असतेच. आपण घर घेतो ते तात्पुरतं म्हणून घेत नाही. घराचा बंगला झाला तर चालेल पण आहे त्या घरातून रस्त्यावर यावं लागू नये, अशीच आपली इच्छा असते. आपण नाती निर्माण करतो त्या नात्यातलं प्रेम शाश्वत टिकावं, अशीच आपली इच्छा असते. आपली संपत्ती, आपली माणसं, आपल्या आवडत्या गोष्टी या साऱ्या शाश्वत टिकाव्यात, हीच आपली खरी इच्छा असते. याचाच अर्थ माणसाला जन्मापासून शाश्वताचीच ओढ आहे! माणसाच्या जन्माला येऊन जे खरं अक्षय सुख आहे ते प्राप्त करून घ्या, असंच कबीरही सांगतात. आपणही सूक्ष्म विचार केलात तर जाणवेल की जन्मापासून आपली सारी धडपड ही सुखासाठीच तर सुरू आहे. तान्हं मूलदेखील रडतं त्यामागे ‘दुख’ असतंच आणि ते रडायचं थांबून हसतं तेव्हा कोणत्या ना कोणत्या ‘सुखा’चा अनुभव त्याला होतो म्हणूनच. लहानपणचे आपले हट्ट, आपली रडारड, भांडणं सारंकाही ‘दुखा’च्या विरोधातून आणि ‘सुखा’च्या आग्रहातूनच तर होतं. वय वाढतं तसं ‘सुखा’ची व्याख्या, व्याप्ती आणि दृष्टिकोन बदलत जातात पण ‘सुखा’ची आस कधीच संपत नाही. सुख कायमचं टिकावं, ते कधीच संपू नये, हीच माणसाची जन्मजात आस असते. याचाच अर्थ माणसाला जन्मापासून शाश्वत सुखाचीच ओढ आहे! माणसाच्या जन्माला यायचं तर आत्मशक्तीचा साक्षात्कार करून घ्या, असंच कबीरही सांगतात. आपणही सूक्ष्मपणे विचार केलात तर जाणवेल, शक्तीचं आकर्षण आपल्याला प्रथमपासून आहे आणि आपल्यातील शक्तीच्या मर्यादांवर मात करण्यासाठीच आपली सारी धडपड असते. माणसाचे सारे प्रयत्न त्याच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठीच सुरू असतात. याचाच अर्थ माणसाला जन्मापासूनच शाश्वत शक्तीचीच ओढ आहे. माणसाला शाश्वताची, शाश्वत सुखाची, शाश्वत शक्तीची ओढ आहे याचं कारण मुळात शाश्वत सुख, शाश्वत शक्तीचं परमनिधान अशा शाश्वत परमतत्त्वातूनच हे चराचर उत्पन्न झालं आहे आणि त्या चराचराचा अंश असलेला जीव त्यामुळेच त्याच्या जीवगत मर्यादांनी बेचैन होतो. आपल्या जीवनातच तो शाश्वताचा, परमसुखाचा, परमशक्तीचा शोध सुरू करतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी धडपडतच असतो. फक्त शाश्वत नेमकं काय आहे, याबाबतच्या त्याच्या आकलनातच गफलत असते त्यामुळे त्याच्या शोधाची बैठक, शोधाची दिशा आणि शोधाचे प्रयत्न यात गफलत निर्माण होते.