अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४८. शोध! Print

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
आपण आतापर्यंत पाहिलं की परमात्मा हाच सर्वोच्च आहे, त्यानंच हे चराचर उत्पन्न केलं आहे आणि जीवही त्याचाच अंशमात्र आहे. या परमात्म्याला संपूर्ण समर्पण, संपूर्ण शरणागती साधण्यासाठीच मनुष्यजन्म लाभला आहे. हे संपूर्ण समर्पण, शरणागती यासाठीचा उपाय त्याचं स्मरण, त्याची भक्ती, हाच आहे. या स्मरणाचा सहजसोपा आणि प्रभावी उपाय त्याचं नाम हाच आहे. आता इथवर ठीक पण मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे ‘परमात्मा’  किंवा ‘परमतत्त्व’ म्हणजे नेमकं काय आणि त्याला समर्पण म्हणजे काय? मोक्ष-मुक्ती म्हणजे काय? आता परमात्मा थेट दाखवता येईल का? त्याचं ‘दर्शन’ कुणी कुणाला करवू शकेल का? कबीरांच्याच एका अत्यंत मार्मीक दोह्य़ाचं बोट पकडून थोडा खोलवर विचार करू. कबीरजी म्हणतात-
बृच्छ जो ढँूढम्े बीज को, बीज बृच्छ के माहिं।
जीव जो ढँूढम्े पीव को, पीव जीव के माहि।।
वृक्षानं जर बीचा शोध घ्यायचं ठरवलं तर ती बी त्या वृक्षातच असते. तसंच जीव जर ‘पीव को’ म्हणजे पियाला, भगवंताला शोधू लागला तर तो भगवंत त्याच्या आतच आहे, असा या दोह्य़ाचा सरळ अर्थ. आता पानं, फुलं, फळं, फांद्या यांनी वृक्ष डवरला आहे. त्या वृक्षाच्या मनात आलं की, एका बीपासूनच माझ्यासारखा वृक्ष निर्माण होतो, असं सांगतात. बी खरंतर केवढीशी असते. माझा विस्तार तो केवढा! इतक्या फांद्या, इतकी फुलं, इतकी पानं, इतकी फळं काय क्षुद्रशा बीपासून होणं शक्य तरी आहे का? मी मातीतून, पाण्यातून जीवनरस शोषून घेतो म्हणून तर हा विस्तार आहे. थंडी, ऊन, पाऊस, वादळातही केवळ मी धीरानं उभा राहातो म्हणूनच तर हा विस्तार टिकून आहे. एवढय़ाशा बीपासून काय हे साधणं शक्य आहे? तरी लोक म्हणतात, शास्त्रं सांगतात ना की बीपासूनच वृक्ष बनतो तर मीच त्या बीचा शोध घेऊन खऱ्याखोटय़ाचा फैसला करीन! मीच जर त्या बीपासून झालो असेन तर माझ्यात ती बी असलीच पाहिजे. तिचा शोध मी घेत राहीन.. आता वृक्ष बीपासूनच झाला असला तरी तो ज्या बीपासून झाला त्या बीचा शोध त्या वृक्षाला साधणं शक्य आहे का? शोध घेणारा हा ज्या वस्तुचा शोध घ्यायचा तिच्यापासून भिन्न असावा लागतो. बी आणि वृक्ष अभिन्न असताना त्या बापडय़ा वृक्षाला ती बी कशी शोधता येणार? तसाच जीव आणि परमात्मा अभिन्न असेल त्या परमात्म्याच्या अंशातूनच जीव उत्पन्न झाला असेल तर जीव परमात्म्याचा शोध कसा काय घेऊ शकणार?  दोहा असा प्रश्नही उत्पन्न करतो आणि तो शोध घेण्याचा मार्गही सूचित करून टाकतो! हा दोहा सांगतो की बी शोधायची तर वृक्षाला आपल्यात खोल शिरावं लागेल. तसंच परमात्मा शोधायचा तर जिवाला स्वततच खोल शिरावं लागेल. आता वृक्षानं अर्थात जिवानं स्वतत खोल शिरणं म्हणजे काय आणि या प्रक्रियेनं वृक्षाला बीचा आणि जिवाला परमात्म्याचा शोध लागतो का, याचा थोडा मागोवा घेऊ.
चैतन्य प्रेम