प्रसार-भान : इंटरनेटवरील साथीचे रोग.. ! Print

विश्राम ढोले, शुक्रवार, ९ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ईस्टोनियात पाचेक वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘डीएनएस चेंजर’ या इंटरनेट-विषाणूचा उच्छाद जगभर पोहोचणार, अशी भीती असल्याने अमेरिकेची ‘एफबीआय’ ही तपासयंत्रणाही कामाला लागली.. सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगाच्या साथीत ब्रिटिश सोजीर पुण्याच्या घराघरांत घुसत होते, तसाच हा प्रकार..

हा लेख लिहिता लिहिता इंटरनेटवरील एक गंडांतर उद्यावर ढकलले गेले आहे. कदाचित त्यामुळेही तुम्ही काल कोणतीही बाधा न येता इंटरनेट वापरू शकला असाल आणि ९ जुलपर्यंत तसेच वापरू शकालही. तोपर्यंत अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय आणि इतर काही महत्त्वाच्या कंपन्यांनी योग्य पावले उचलली तर ठीक; अन्यथा जवळजवळ शंभरेक देशांतील हजारो लोकांसाठी त्यांचा कोणताही दोष नसताना इंटरनेट बंद होऊन जाईल. दोष या लोकांमध्ये नसला तरी त्यांच्या संगणकामध्ये दडून बसलेल्या डीएनएस चेंजर नावाच्या संगणक विषाणूमध्ये- संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर मालवेअरमध्ये आहे. या मालवेअरची बाधा शंभरेक देशांतील लाखो संगणकांना झाली आहे. त्यात अमेरिकेतील फॉच्र्युन ५०० यादीतील कंपन्यांसह अमेरिकेतील काही सरकारी खात्यांच्या संगणक व सव्‍‌र्हरचाही समावेश आहे. हे दडून बसलेले मालवेअर तुमच्या संगणकावरून होणारी इंटरनेट वाहतूक वाचते आणि तुमच्या नकळत ती तुम्हाला नको असलेल्या आणि खोटय़ा साइट्सकडे वळविते. त्यात तुमच्या इंटरनेट प्रवासाची माहिती तर खासगी राहत नाहीच, शिवाय आíथक व्यवहारही असुरक्षित बनू शकतात आणि तुम्हाला ज्या खऱ्या साइट्सवर जायचे होते त्यांचेही नुकसान होते. हे सारे होत असताना या विषाणूमळे तुमच्या संगणकाची इतर प्रकारच्या विषाणूंना प्रतिकार करण्याची क्षमताही कमी होत असल्याने अशा अनेक विषाणूंच्या हल्ल्याला बळी पडण्याची भीतीही वाढते.
खरे तर हा सारा तसा तांत्रिकदृष्टय़ा गुंतागुंतीचा मामला आहे. ही गुंतागुंत इंटरनेटवरील वाहतूक हाताळणाऱ्या अमेरिकेतील काही सव्‍‌र्हपर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे केवळ एकटय़ादुकटय़ा संगणकावरून हा विषाणू काढण्यापुरते हे आव्हान मर्यादित नव्हते. पोलिओ किंवा देवीनिर्मूलनाची जशी मोठी व्यापक मोहीमच काढावी लागते, तशी या मालवेअरविरोधी मोहीम काढणे गरजेचे होते. त्यामुळे आणि या प्रकाराला मिळालेल्या गुन्हेगारीच्या वळणामुळे अमेरिकी सुरक्षा यंत्रणा एफबीआय या प्रकारात उतरली. त्यांनी इंटरनेटवरील वाहतूक योग्य त्याच पत्त्यावर पोहोचण्यासाठी स्वत:च्या ताब्यात काही तात्पुरते सव्‍‌र्हर तयार केले आणि गेली सुमारे चार महिने ही वाहतूक अंशत: याच सव्‍‌र्हरच्या मार्गाने वळविण्यात येत होती. हेतू हा की, या काळात बाधित सव्‍‌र्हर्सनी डीएनएस चेंजर हा विषाणू काढून टाकून पुन्हा निरोगी व्हावे. पण एफबीआयला वाहतुकीवर असा ताबा ठेवण्यासाठी अमेरिकी कोर्टाने काहीशा नाराजीने १२० दिवसांचीच परवानगी दिली होती. ती ८ मार्चला संपत होती. त्यानंतर एफबीआयचे तात्पुरते सव्‍‌र्हर बंद करावे लागणार असल्याने अजूनही बाधित राहिलेल्या संगणकांमुळे लाखो लोकांसाठी इंटरनेट बंद पडण्याचा धोका होता. गंडांतर ते हेच होते. अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी अजूनही डीएनएस चेंजरविरोधी डोस घेतलेला नव्हता. त्यामुळे धोका कायम होता. पण अमेरिकी न्यायालयाने एफबीआयला वाहतूक वळविण्याची मुदत ९ जुलपर्यंत वाढवून दिल्यामुळे आता गंडांतर पुढे ढकलले गेले आहे. दडून बसलेले मालवेअर संगणकांवरून काढण्याबाबत आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे आणि मुदत वाढवून मिळाल्यास हे काम पूर्ण करता येईल, असे एफबीआयने सांगितल्याने अखेर न्यायालयाने ते मान्य केले. त्यामुळे कदाचित ९ जुलपर्यंत इंटरनेट डीएनएस चेंजरमुक्त होईल आणि हे गंडांतर टळेल अशी आशा आहे.
तसे ते टळोच. पण तरीही या साऱ्या प्रकारातून खूप काही प्रश्न निर्माण होतात आणि इंटरनेट नावाच्या प्रसारव्यवस्थेचे गुंतागुंतीचे स्वरूप पुढे येते. खरे तर या प्रकाराची सुरुवात पूर्व युरोपातील इस्टोनिया या देशातून झाली. तीदेखील जवळजवळ पाचेक वर्षांपूर्वी. तिथल्या काही लोकांनी एका कंपनीच्या माध्यमातून पद्धतशीरपणे हा विषाणू महाजालात सोडला असा एफबीआयचा दावा आहे. त्यातून अनेक अमेरिकी इंटरनेट कंपन्यांचे नुकसान झाले, खासगीपणाचा भंग झाला वगरे कारणांमुळे एफबीआय त्यात उतरली आणि भरपूर पसा, वेळ खर्चून त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या इंटरनेट चाच्यांना पकडले. त्यांचे हस्तांतर, अटक वगरे सगळे प्रकार पार पडल्यावर एफबीआयने सगळ्या प्रकाराची सूत्रे हाती घेऊन इंटरनेट वाहतूक नव्याने वळविली आणि आता ९ जुलपर्यंत ती व्यवस्था तशीच राहील. म्हणजे गुन्हेगार इस्टोनियाचे, फटका अमेरिकी कंपन्यांना, तपास अमेरिकी तपास यंत्रणेचा, आदेश अमेरिकी न्यायालयाचा आणि त्यावर अवलंबून जगभरातील अनेक देशांमधील विषाणूबाधित लाखो संगणक. त्यांची संख्या किती आणि ते आहेत कुठे कुठे हे सांगणेही अवघड.
या साऱ्या प्रकारात एफबीआय वगरे तपास यंत्रणा उघडउघडपणे शिरल्यामुळे नेटकरांमध्ये नाराजी आहे. इंटरनेटला राष्ट्र, राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था यांच्या पलीकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्यांना त्यात खूप धोका दिसतो. मालवेअरचा धोका तर आहेच, पण त्यावर उपाय करण्याच्या निमित्ताने तपास आणि गुप्तचर यंत्रणा इंटरनेटच्या महत्त्वपूर्ण व्यवस्थेवर ताबा तर मिळविण्याचा प्रयत्न करीत नाही ना अशी नेटकरांमध्ये भीती आहे. संदर्भ खूप वेगळा आहे खरा, पण अशाच एका ऐतिहासिक प्रकाराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याच्या निमित्ताने ब्रिटिशांनी आमच्या घरांमध्ये धुडगूस घातला, बायकामुलांवर अत्याचार केले अशा खूप तक्रारी झाल्या होत्या. पुणे असो वा इंटरनेटचे जग, प्लेग असो वा संगणक व्हायरस आणि ब्रिटिश गोरे असो की अमेरिकी गोरे-काळे. साथीचा धोका, सरकारी हस्तक्षेप आणि त्याविषयी नाराजी हे मुद्दे सारखेच आहेत. इंटरनेटच्या क्रिटिकल व्यवस्था आजही बऱ्यापकी सरकारी वा राष्ट्रीय चौकटीच्या बाहेर आंतरराष्ट्रीय, संयुक्त वा व्यावसायिक देखरेख करणारांच्या नियंत्रणात आहेत. पण सरळ किंवा आडमार्गाने त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी सरकारी व्यवस्थांचे प्रयत्न सुरू असतातच. साथीचे नियंत्रण करण्याच्या निमित्ताने त्याला नवे वळण मिळतेय की काय अशी भीती इंटरनेटवर व्यक्त केली जात आहे.
इकडे हे होत असताना इंटरनेटवरील साथीच्या विषाणूंची संख्या काही कमी व्हायला तयार नाही. किंबहुना ती वाढतच आहे आणि त्याचे स्वरूपही अधिकाधिक आंतरराष्ट्रीय आणि जटिल होत चालले आहे. कितीही प्रयत्न केले तरी इंटरनेट अशा प्रकाराच्या गनिमी हल्ल्यांपासून कधीच पूर्णपणे सुरक्षित राहू शकत नाही असे या क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार सांगत असतात. त्यामुळे एकीकडे डीएनएस चेंजरचा धोका जरी आणखी काही दिवसांनी कमी झाला तरी नवे धोके येत राहणार आणि विषाणूंचा असो वा सरकारचा- हस्तक्षेपांपासून इंटरनेट काही पूर्णपणे मुक्त राहणार नाही हेच या निमित्ताने उघड होत चालले आहे.