प्रसारभान : फिक्का कागद आणि झळाळता पडदा! Print

विश्राम ढोले ,शुक्रवार २३ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासक व शास्त्रज्ञ-प्रज्ञावंत यांच्या सामूहिक प्रयत्नांतून छापील कोश निर्माण होत गेले. विकिपीडियाने त्याला तत्त्वत:च छेद दिला. अशा वेळी ब्रिटानिकाच्या छापील आवृत्तीने घेतलेला अखेरचा श्वास, ही ज्ञाननिर्मितीच्या प्रमाणीकरणातील अभिजनवादी भूमिकेच्या अस्तपर्वाचीही सूचक घटना ठरते..

गेल्या आठवडय़ात इनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाने त्यांची छापील आवृत्ती बंद करीत असल्याची घोषणा केली. खरे तर ब्रिटानिकाच कशाला इतरही विश्वकोशांच्या वापराला (आणि खपालाही) गुगल आणि विकिपीडियामुळे घरघर लागलेली आहेच. ब्रिटानिकाचा जागतिक खप १९९०च्या सुमाराला १ लाख २० हजार संच इतका उच्चांकी झाला होता; पण नंतर इंटरनेटच्या प्रसाराबरोबर मागणी इतकी घसरत गेली की, २०१० साली फक्त बारा हजार संच छापण्यात आले आणि त्यातील साडेतीन हजार संच अजूनही गोदामात पडून आहेत. ब्रिटानिकाच्या एकूण उत्पन्नात छापील आवृत्तीच्या खपाचा वाटाही १ टक्के इतका नगण्य झाला होता. त्यामुळे छापील आवृत्तीच्या मृत्यूची बातमी तशी धक्कादायक नव्हती, तरीही यानिमित्ताने एक पर्व संपत आल्याची जाणीव प्रखर झाली आहे.
ही पर्वसमाप्ती अनेक अर्थाने आहे. एक तर ब्रिटानिकाच्या छापील आवृत्तीला थोडाथोडका नव्हे तर तब्बल २४४ वर्षांचा इतिहास आहे आणि हा सारा काळ केवळ सामाजिक, राजकीयच नव्हे तर ज्ञाननिर्मिती, शिक्षण आणि प्रबोधनाच्या दृष्टीनेही मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. वैज्ञानिक प्रगती, औद्योगिकीकरण, विविध विषयांचा आणि विचारसरणींचा उदयास्त, सामाजिक- राजकीय चळवळी, क्रांत्या, महायुद्धे अशा अनेकानेक गोष्टी या काळात घडल्या. या आणि त्याआधीच्या माहिती आणि ज्ञानाला शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे, समर्पकपणे आणि बिनचूकपणे कवेत घेण्याच्या एका खास प्रबोधनकारी मानिसकतेतून ब्रिटानिकाची निर्मिती होत राहिली. इनसायक्लोपीडिया या लॅटिनीकरण झालेल्या शब्दाचा अर्थच मुळात ‘मानवी ज्ञान आणि शिक्षण कवेत घेणारे वर्तुळ’ असा आहे. या अर्थापासून प्रेरणा घेऊन, ‘विचार करण्यास योग्य अशा विषयाचेच ज्ञान देण्याचे’ धोरण ठेवून आणि तज्ज्ञांचे ज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ- अचूक ज्ञान असे प्रमाण मानून ब्रिटानिकासह अनेक विश्वकोशांची या काळात निर्मिती होत राहिली. अशाच प्रेरणा, धोरणे आणि प्रामाण्यासह मराठीतही श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांपर्यंत अनेक विद्वानांनी कोशनिर्मितीचे शिवधनुष्य पेलले. त्यामुळे असे कोश निर्माण करणे, त्यांचा वापर करणे हे विद्वत्तेचे- निदान अभ्यासू वृत्तीचे तरी- एक लक्षण बनले. शाळा- महाविद्यालयेच नव्हे तर उच्चाकांक्षी- उच्चभ्रू घरांमधूनही विश्वकोशांच्या जाडजाड पुस्तकांचे संच ओळीने मांडलेले दिसू लागले. मधल्या एका काळात तर ब्रिटानिकाचे लाल-करडय़ा रंगांतील पक्क्या बांधणीचे संच आणि अब्राहम िलकनचे हेडमास्तरास पत्र या दोन गोष्टी शाळा- कॉलेजच्या ग्रंथालयांच्या किंवा मुख्याध्यापकांच्या केबिनच्या (निदान) इंटीरियर डेकोरेशनचा महत्त्वाचा भाग बनले होते. आपल्याकडेही शहरी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांनी ब्रिटानिकाचे जाडजाड खंड शिक्षकांच्या दट्टय़ामुळे का होईना हाताळले तरी आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या संदर्भावर या खंडांमध्ये अचूक माहिती मिळेल हा विश्वास बाळगला आहे. फिकट पांढऱ्या रंगाच्या कागदावर छोटय़ामोठय़ा नोंदी शोधल्या आहेत. ब्रिटानिकाच्या छापील आवृत्तीचा मृत्यू हे औपचारिक छापील ज्ञाननिर्मिती- वितरणाच्या एका सांस्कृतिक पर्वाचा अस्त होत असल्याचे संकेतचिन्ह आहे.
ब्रिटानिकाची सीडीरॉम आणि इंटरनेट आवृत्ती सुरूच राहणार आहेत, पण तिथे  राज्य आहे विकिपीडियाचे. आज केवळ बारा वर्षांत विकिपीडिया इंटरनेटवरील शोधयात्रेचे सर्वात महत्त्वाचे तीर्थस्थळ बनला आहे. छापील विश्वकोशांप्रमाणेच विकिपीडियामागची ही प्रेरणा जगातील शक्य तितके ज्ञान जमवाव, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावे हीच आहे; पण ब्रिटानिकासारखे छापील विश्वकोश आणि विकिपीडियासारखे संगणकाच्या झळाळत्या पडद्यावरील विश्वकोश यांच्यातील साम्य इथेच संपते. ज्ञाननिर्मिती आणि वितरणाचे माध्यम बदलणे ही साधी गोष्ट नाही. एका माध्यमातले ज्ञान फक्त दुसऱ्या माध्यमात नेऊन टाकले असे इथे होत नसते. प्रत्येक माध्यमाची तत्त्वे वेगळी असतात, शक्यता वेगळ्या असतात आणि क्षमताही. म्हणून माध्यमांतर होणे हा एक खूप मोठा आणि दूरगामी असा सांस्कृतिक- सामाजिक बदल असतो. मार्शल मॅकल्यूहन त्याचे वर्णन ‘मीडियम इज दी मेसेज’ अशा सूत्रबद्ध पण चमत्कारिक वाक्यात करतात. छापील ब्रिटानिका ते विकिपीडिया हा असाच एक मोठा बदल आहे.
त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल आहे ते ज्ञान कोण देणार या मुद्दय़ाबाबतचा. प्रबोधनाच्या, वस्तुनिष्ठतेच्या आणि सामाजिक-राजकीय उतरंडीच्या काळात निर्माण झालेल्या छापील विश्वकोशांनी लोकांना ज्ञान देण्याचा अधिकार तज्ज्ञांना दिला. ब्रिटानिकाने तर अगदी आइनस्टाईनपासून ट्रोटस्कीपर्यंत अनेकांना त्यांच्या खंडांमध्ये लिहायला लावले होते. अभ्यासक ते शास्त्रज्ञ-प्रज्ञावंत अशी विविध पातळीवरची तज्ज्ञता लाभलेल्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून छापील कोश निर्माण होत गेले. विकिपीडियाने त्याला तत्त्वत:च छेद दिला! विकिपीडियात कोणीही माहिती लिहू शकतो, लिहिलेली माहिती संपादित करू शकतो, बदलवू शकतो, गाळू शकतो आणि नव्याने आणू शकतो. हे बदल कसे करावेत, ते करताना काय पथ्ये पाळावीत याचे काही ढोबळ संकेत आणि सूचना विकिपीडियामध्येही आहेत, पण तिथे ते मार्गदर्शक संकेत म्हणून आहेत. काटेकोर नियम म्हणून नाहीत, पण छापील ब्रिटानियासारख्या छापील विश्वकोशांनी अशा अतिशय बारीकसारीक तपशिलांचा, नियमांचा, संदर्भाचा, तज्ज्ञपुरस्कृत अचूकतेचा नेहमी काटेकोर आग्रह धरला होता. माहितीची अचूकता आणि ज्ञानाची विश्वासार्हता ही तज्ज्ञांच्या सामूहिक शहाणपणात आणि पद्धतींच्या काटेकोरपणात दडलेली आहे असा ब्रिटानिकाचा विश्वास तर ती वापरकर्त्यां समाजाच्या सामूहिक शहाणपणात, संवादशक्यतांच्या मुक्त वापरात दडलेली आहे यावर विकिपीडियाचा भरवसा. ब्रिटानिकाचा हा विश्वास आणि छापील माध्यमांचा त्यांनी केलेला वापर या एकमेकांस पूरक बाबी आहेत तर विकिपीडियाचा परस्पर मुक्त संवादावरील भरवसा आणि इंटरनेटवरील संपर्कशक्यता यांच्यात एक गहिरे नाते आहे. छापील ब्रिटानिकावरील ज्ञान हे तज्ज्ञांचे स्वगत आहे तर विकिपीडियावरील ज्ञान हा मुक्त लोकसंवाद.
कागदांच्या भौतिक मर्यादेमुळे असेल, प्रबोधनवादी मानसिकतेमुळे असेल वा कदाचित दोन्हीमुळे.. ब्रिटानिकामध्ये महत्त्वाच्या, शिष्टसमंत, समाजोपोयोगी व विचारार्ह (त्यांच्याच शब्दात सांगायचे तर- वर्दी ऑफ कन्टेम्प्लेशन!) विषयांवरच नोंदी असतात. अर्थात ही सारी विशेषणे कोणत्या विषयांना, नोंदींना लागू करायची हा निर्णय तज्ज्ञ मंडळाचा. विकिपीडियात तसे नाही. तिथे अणुबॉम्ब ते टाचणीपर्यंत आणि महात्मा गांधींपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या नोंदी असू शकतात. नसल्या तर सहजगत्या टाकता येऊ शकतात. त्या टाकाव्यात वा टाकू नये इथपासून ते टाकल्यास त्या कशा असाव्यात इथपर्यंतचे सारे निर्णय वापरकर्त्यांच्या सामूहिक शहाणपणावर वा संमतीवर, तंत्रज्ञानाच्या शक्यतांवर अवलंबून. एका अर्थाने ज्ञाननिर्मिती, त्याचे प्रमाणीकरण, त्याची वैधता याबाबत छापील कोश काहीशी अभिजनवादी, प्रबोधनवादी भूमिका घेतात तर विकिपीडियाची याबाबतची भूमिका बहुजनवादी (खरे तर तंत्रसमृद्ध बहुजनवादी), उपयुक्ततावादी  आहे. माहिती वा ज्ञानातील शाश्वतता नसली तरी निदान स्थर्य सांगण्याकडे छापील कोशांचा कल तर त्यातील गतिमान बदल व अस्थर्य सांगण्यावर विकिपीडियाचा भर. माहिती व ज्ञानाचा एकसंध- एकरेषीय- सलग अनुभव देणे हे छापील कोशांचे सूत्र तर नेटवìकगच्या तत्त्वातून बहुरेषीय, बहुमाध्यमी आणि विलग-विखुरला अनुभव देण्यात विकिपीडियाचा हातखंडा.
म्हणूनच  इनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाची छापील आवृत्ती जेव्हा अखेरचा श्वास घेते तेव्हा ती साधी घटना राहात नाही. ती फिक्क्या कागदावरील ज्ञानापासून ते झळाळत्या पडद्यावरील ज्ञानापर्यंतच्या एका मोठय़ा पर्वातराची सूचक बनते.