प्रसार-भान : आक्रमकतेला अंत नाही.. Print

विश्राम ढोले ,शुक्रवार, ६ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

लहान मुलांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या माध्यमातील हिंसा रोखणाऱ्या वा निदान बोथट करणाऱ्या यंत्रणा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. त्याबाबत सातत्याने आवाज उठवणारे प्रामाणिक हेतूंच्या प्रेक्षकांचे दबावगटही नाहीत.. तोवर टीव्हीतल्या आणि एकूण जगण्यातल्या हिंसाचारापासून मुलांना रोखणे कौटुंबिक पातळीवरच राहणार..

‘प्रसारभान’सारख्या सदरात हा विषय कधीतरी आला असताच. पण पुण्यातील शुभम शिर्के या शाळकरी मुलाच्या निर्घृण खुनाच्या घटनेने त्याला हे दुर्दैवी निमित्त पुरविले इतकेच. गेल्या शनिवारी शुभमच्याच शाळकरी मित्रांनी त्याचा खून केला. पंधरा-सोळा वर्षांच्या या दोन मुलांना कायद्याच्या भाषेत प्रौढ झालेल्या तिसऱ्या मुलाचीही साथ होती. चनीसाठी पसे मिळविण्याकरिता या तिघांनी योजनाबद्ध पद्धतीने आखणी करून आधी शुभमचे अपहरण केले आणि नंतर क्रूरपणे त्याची हत्याही केली. पोलिसांना दिलेल्या जवाबामध्ये त्यांनी टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक कार्यक्रम पाहून असे काही करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले आणि प्रसारमाध्यमातील विशेषत: टीव्ही-सिनेमातील वाढत्या हिंसेच्या दुष्परिणामांची चर्चा पुन्हा सुरू झाली. अर्थात कबुलीजवाबात त्या मुलांनी असा स्पष्ट उल्लेख केला नसता तरी ही चर्चा व्हायचे काही थांबले नसते. कारण मुलांच्या वर्तनशैलीवर माध्यमांचा खूप परिणाम होत असल्याची जाणीव सर्वानाच झालेली आहे.
शुभमचा खून असो वा फेब्रुवारीमध्ये चेन्नईत एका शाळकरी विद्यार्थ्यांने केलेला शिक्षिकेचा खून असो. अशा धक्कादायक घटनांनी जनमन हादरते. माध्यमांमधील हिंसेच्या परिणामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतो, पण अशा टोकाच्या घटना घडल्या नाहीत तरी माध्यमातून होणारे हिंसेचे चित्रण आणि त्याचे परिणाम हा एक सतत चिंतेचा विषय राहिला आहे आणि माध्यमांच्या तसेच मानसशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधनाचाही. प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या हिंसेमुळे प्रत्यक्ष जगण्यातील हिंसा वाढते का किंवा निदान वाढायला चिथावणी तरी मिळते का, हा यामागचा खरा कळीचा प्रश्न आहे. सामान्य निरीक्षणाच्या पातळीवर आपण त्याचे होय असे सरळसोट उत्तर देऊन मोकळे होऊ शकतो; पण संशोधनामध्ये असे चालत नाही. तिथे अनेक घटक विचारात घ्यावे लागतात, वेगवेगळी परिस्थिती आणि संदर्भ लक्षात ठेवावे लागतात; पण असे अनेक घटक आणि संदर्भ लक्षात घेऊन आणि संशोधनपद्धतीच्या शिस्तीत राहूनही गेल्या अनेक वर्षांतील संशोधनांनी माध्यमांमधील हिंसेमुळे प्रत्यक्ष जगण्यातील आक्रमकतेला चिथावणी मिळू शकते, असेच वारंवार सांगितले आहे.
आपल्याकडे या संदर्भात काही प्रमाणात संशोधन झाले आहे आणि तेही बरेचसे या उत्तराला पुष्टी देणारे असले तरी यात खूप मोठय़ा प्रमाणावर संशोधन झाले आहे ते अमेरिकेत. एकतर टीव्ही आणि सिनेमाच्या सार्वत्रिकतेचा तिथला इतिहास अधिक जुना आणि अशा घटना घडण्याचे प्रमाणही तिथे अधिक. त्यामुळे माध्यमातील हिंसा आणि जगण्यात येणारी आक्रमकता यांच्यातील संबंध शोधण्याचे, विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत शोधण्याचे प्रयत्न तिथे गेली सुमारे पन्नास वष्रे सुरू आहेत. या प्रदीर्घ कालावधीतील विविध संशोधनांचे नुकतेच बृहद् विश्लेषण (मेटा अनॅलिसिस) करण्यात आले, तेव्हा त्यातही हे पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले की, माध्यमांमधील हिंसा दीर्घकाळ बघितल्याने मुलांमधील वृत्ती आणि कृती यांतील आक्रमकता वाढते. आक्रमकतेतील ही वाढ अल्प आणि दीर्घकाळ राहू शकते. एखाद्या मुलामध्ये ती किती आणि कशी वाढावी यावर त्याच्या मेंदूतील जैवरासायनिक क्रिया-प्रक्रियांचा प्रभाव असतो हे जरी खरे असले तरी ती वाढण्याच्या प्रक्रियेला माध्यमातील हिंसेच्या नाटय़मय चित्रणामुळे खतपाणी मिळते ही बाब सत्य आणि पुरेशी स्पष्ट आहे असे या विश्लेषणामध्ये दिसून आले आहे. दुसऱ्या एका दीर्घकालीन संशोधनामध्ये काही मुलांचे टीव्हीवर्तन आणि प्रत्यक्ष जगण्यातले वर्तन यांचा सतत १५ वष्रे अभ्यास करण्यात आला. त्यामध्येही ज्यांनी लहानपणी खूप टीव्ही पाहिला आणि त्यातील हिंसा पाहिली त्यांचे मोठेपणीचे वर्तन इतरांपेक्षा तीन ते चार पटीने अधिक आक्रमक होते असे दिसून आले आणि हे वर्णन मुलांइतकेच मुलींनाही लागू आहे असेही त्यात दिसून आले.
टीव्हीवरील नाटय़मय हिंसा एक सर्वसाधारण प्रेक्षक किती बघतो हाही एक मुद्दा आहे. अमेरिकेत १९९९ साली प्रसिद्ध झालेले एक संशोधन असे सांगते की, अमेरिकेतील सर्वसाधारण मुलाने वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत टीव्हीवर नाटय़मय हिंसेचे दोन लाख आणि हत्येचे चाळीस हजार प्रसंग पाहिलेले असतात. हे मोजमाप जवळजवळ एक तपापूर्वीचे आहे. त्यात वाढ झाली असण्याचीच शक्यता अधिक. भारतीय संदर्भात इतक्या मोठय़ा प्रमाणावर मोजमाप झालेले नसले तरी हिंसात्मक प्रसंगांची संख्या फार प्रमाणात कमी असेल असे वाटत नाही. खासगी वाहिन्या, २४ तासांचे प्रक्षेपण आणि सतत वाढत्या व्यापारी स्पर्धात्मकतेने भरलेल्या आणि भारलेल्या टीव्हीचा आपल्याकडील इतिहास गेल्या पंधरा-अठरा वर्षांतला. बरोबर याच काळात जन्माला आलेली आणि टीव्हीसोबत वाढलेली मुलांची पिढी आता शाळेची शेवटची वष्रे ते महाविद्यालयाची सुरुवातीची वष्रे अशा अडनिडय़ा वयामध्ये आहे. म्हणूनच त्यांच्यातील वेगळी वर्तनशैली, वाढती आक्रमकता आणि काही प्रसंगांमधून दिसून येणारी क्रूरता यांचा संबंध जनमानस त्यांच्या भवतीच्या टीव्हीतील हिंसेशी लावू पाहत असेल तर ते चूक नाही, आणि शास्त्रीय कसोटय़ाही त्यातील सत्यांश नाकारत नाही.
पण शास्त्रीय संशोधन आणि कसोटय़ा फक्त हा सत्यांश सांगून थांबत नाही. अशी आक्रमकता नियंत्रणात कशी आणता येईल याचेही मार्गदर्शन या संशोधनांमधून होत असते आणि त्याबाबतही खूप साऱ्या संशोधनांमध्ये एकवाक्यता आहे. कौटुंबिक स्थर्य आणि कमी ताणाचे बालपण ज्यांच्या वाटय़ाला येते अशा मुलांमध्ये टीव्हीतल्या हिंसेचा दुप्षरिणाम पचविण्याची, हिंसेबाबत आणि तिच्या परिणामांबाबत सकारात्मक संवेदनशीलता बाळगण्याची क्षमताही जास्त असते असेही अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, जिथे कुटुंबात मुलांशी पुरेसा संवाद असतो, मुलांच्या टीव्ही बघण्याच्या सवयींवर पालक लक्ष ठेवून असतात आणि त्यावरील कार्यक्रमांबाबत चर्चा करीत असतात तिथे हिंसेचे उदात्तीकरण वा दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते. उपमाच वापरायची झाली तर असे म्हणता येईल की, टीव्हीवरील हिंसेची रेषा आपल्याला पुसून टाकता येत नसेल तर आपल्या कौटुंबिक संवादाची रेषा वाढवून आपण ती निदान छोटी तरी करू शकतो आणि ती तशी करण्याचे आपले प्रमाण घटत चालले आहे हे खरे आजच्या निदान शहरी जगण्याचे दुखणे आहे.
अर्थात हे करीत असताना टीव्हीवरील गल्लाभरू, टीआरपीशरण आणि दर्जाहीन कार्यक्रमांना विशेषत: हिंसेच्या संवेदनाहीन चित्रणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे उघड आहे; पण दुर्दैवाने नेमके तेच आज होत आहे. कार्टूनवरील कार्यक्रमांपासून ते व्हिडीओ गेमपर्यंत आणि सहज उपलब्ध होणाऱ्या मारधाड चित्रपटांपासून ते इंटरनेटवरील व्हिडीओपर्यंत अनेकानेक दृश्यांतून हिंसात्मकता आज लहान मुलांपर्यंत धो धो प्रमाणात पोहोचत आहे. अधिकाधिक ग्लॅमरस स्वरूपात पोहोचत आहे; पण निदान लहान मुलांपर्यंत तरी ते पोहोचू नये याची काळजी ना माध्यम उद्योग घेत आहे ना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था. माध्यमांतील चित्रणामुळे प्राण्यावर अन्याय होऊ नये यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यासंबंधी कायदे झाले आहेत, पण लहान मुलांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या माध्यमातील हिंसा रोखणाऱ्या वा निदान बोथट करणाऱ्या यंत्रणा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. त्याबाबत सातत्याने आवाज उठवून दबाव राखू शकणारे प्रामाणिक हेतूंच्या प्रेक्षकांचे दबावगटही नाहीत. त्यामुळे कौटुंबिक आणि माध्यमांच्या पातळीवर असे प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत शुभमच्या हत्येसारख्या दुर्दैवी घटना घडण्याचे थांबणार नाही आणि एकूण जगण्यातील वाढते भय आणि आक्रमकताही.