प्रसारभान : एक भानगड- टीआरपी नावाची.. Print

विश्राम ढोले ,शुक्रवार, १३ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘टीआरपी’ किंवा टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट हे चित्रवाणी वाहिन्या आणि जाहिरातदार यांच्यातील व्यवहाराचे चलन असू शकेल, पण या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग मोजण्याचे परिमाण म्हणून ते तोकडे आहे.. त्यावर उत्तर म्हणून ‘पीपलमीटर’ आले, तेही पुरेसे नाहीच..


‘टीआरपी’च्या गणितामुळे मालिकांची गळचेपी होत असल्याची तक्रार ‘उंच माझा झोका’च्या निर्माता-दिग्दर्शकांनी केल्याची बातमी गेल्या आठवडय़ात लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाली. खरं तर ‘उंच माझा झोका’च नव्हे, तर इतरही अनेक कार्यक्रमांचे स्वतंत्र निर्माते-दिग्दर्शक अशीच काहीशी तक्रार करतील. टीव्ही वाहिन्यांमध्ये या मालिकांचे ‘संगोपन’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचाराल तर तेही टीआरपीबद्दल बऱ्याच तक्रारी सांगतील. मनोरंजनपर वाहिन्याच कशाला, वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार-संपादकही त्यांच्या वाहिन्यांवरील अनेक दोषांबाबत ‘काय करणार..टीआरपीसाठी असे करावे लागते’ अशी कबुली तरी देतील किंवा ‘आमचे कार्यक्रम वाईट असतील तर मग त्याला इतका टीआरपी मिळाला नसता’ अशी भलामण तरी करतील. टीव्हीशी संबंधित कलाकार आणि अधिकारीच कशाला आताशा सामान्य प्रेक्षकांच्या बोलण्यातही ‘टीआरपी’संबंधी निंदाजनक उल्लेख येत राहतात. ‘‘टीआरपीसाठी चाललेय हे सगळं’’ अशी काहीशी हताशा व्यक्त करणारी वाक्ये आता संसदेपासून घरापर्यंतच्या चर्चामधून ऐकू येऊ लागलीय.        
सगळ्या टीव्ही कार्यक्रमांचे भवितव्य खरं तर त्यांना मिळणाऱ्या टीआरपीवर ठरतं. कार्यक्रमाला आणि पर्यायाने वाहिनीला जाहिराती मिळणार की नाही आणि मिळाल्या तर किती, कोणत्या आणि कुठवर मिळणार या प्रश्नांची उत्तरे त्यात दडलेली असतात. त्या अर्थाने पाहिल्यास भारतातील टीव्ही जाहिरातींची सुमारे ११ हजार कोटींची वार्षकि उलाढाल आकाराला येते ती मुख्यत्वे टीआरपीच्या गणितांवरून. त्यामुळे टीआरपीत जरा खालीवर झाले की, टीव्ही व्यावसायिकांच्या हृदयाचे ठोके वरखाली होतात.          
पण टीव्हीसंबंधी निर्णयांमध्ये आणि चर्चामध्ये इतकं महत्त्वाचं स्थान असूनही टीआरपी नावाच्या प्रकरणाबाबत टीव्ही व्यावसायिकांमध्ये संभ्रम आणि संशय सतत आहे आणि प्रेक्षकांमध्ये अज्ञान तरी किंवा गूढ. काय आहे हे टीआरपी प्रकरण? कसे ठरविले जातात हे टीआरपी? आणि इतके महत्त्वाचे असून त्याबाबत सर्वसाधारणपणे इतके अज्ञान दिसून येते?
टीआरपीचा म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. व्यावसायिक भाषेत त्याला अनेकदा टीव्हीआर (टेलिव्हिजन व्ह्यूअर रेटिंग) असेही म्हटले जाते. पण सगळ्याचा अर्थ एकच आणि सोपा आहे- टीव्ही कार्यक्रमाला लाभलेल्या प्रेक्षकांचा अंदाजित निर्देशांक. अंदाजित यासाठी म्हणायचे की नेमकी प्रेक्षकसंख्या किती हे कधी मोजले जात नाही आणि व्यावहारिकदृष्टय़ा कधी मोजले जाऊही शकणार नाही. म्हणूनच काही मर्यादित प्रेक्षकांच्या कार्यक्रम निवडीच्या सततच्या सर्वेक्षणातून हे अंदाज बांधले जातात आणि अंदाजित एकूण प्रेक्षकांच्या तुलनेत दिले जातात म्हणून त्यांना निर्देशांक म्हणायचे. भारतात हे सारे करते ही ती टेलिव्हिजन ऑडियन्स मेझरमेंट (टॅम) नावाची संशोधन संस्था. भारतात खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू झाल्यानंतर त्यांच्यात जाहिरातींसाठी स्पर्धा सुरू झाली. जाहिरातदारांनाही नेमक्या कोणत्या कार्यक्रमासाठी, कोणत्या वेळी, कोणत्या वाहिनीवर जाहिरात द्यावी याचा निर्णय घेणे कठीण होऊ लागले. त्यावेळी कार्यक्रमाला मिळणारी प्रेक्षकसंख्या ठरविणे आणि ते एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत ठरविणे गरजेचे झाले. या पाश्र्वभूमीवर १९९५ साली टॅमचा भारतीय टीव्ही बाजारपेठेत प्रवेश झाला आणि त्यांच्यामार्फत होणारे विविध प्रकारचे प्रेक्षकमापन टीव्ही उद्योगाची अपरिहार्य आणि मूलभूत गरज होऊन बसले. कार्यक्रमाचे निर्माते, वाहिन्यांचे व्यवस्थापन आणि जाहिरातदार यांच्यातील आर्थिक व्यवहारासाठी टीआरपी एक चलन (करन्सी) होऊन बसले.
वरवर हे सगळे ठीक वाटत असले तरी त्यात खूप गुंतागुंत आणि व्यावहारिक अडचणी आहेत. एक तर माध्यमांचे ग्राहक मोजणे मुळातच कठीण. त्यात टीव्हीचे प्रेक्षक मोजणे तर फारच कठीण. कारण इथे कार्यक्रमांची संख्या खूप. वाहिन्यांचीही संख्या खूप. प्रक्षेपण २४ तासांचे आणि रिमोटमुळे पटापट वाहिन्या बदलण्याची संधीही खूप. एका घरातील सदस्यांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी मोजणेदेखील कठीण. त्यात इथे आव्हान भारतासारख्या खंडप्राय देशातील भाषिक, सामाजिक आणि आर्थिक वैविध्याचे. अर्थात तंत्रज्ञानाने हे काम काही प्रमाणात आवाक्यात आणले आहे. हे सारे प्रेक्षकवर्तन मोजण्यासाठी पीपलमीटर नावाच्या यंत्राचा वापर करण्यात येतो. टीव्हीवरच्या सेटटॉप बॉक्ससारखे दिसणारे एक उपकरण टीव्हीला जोडून, त्याचा रिमोट घरातील सदस्यसंख्येशी जुळवून घेऊन, घरात टीव्ही बघणाऱ्यांनी त्या रिमोटची बटणे दाबून आपल्या टीव्हीसमोर येण्याजाण्याची नोंद करावी लागते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या नमुना (सॅम्पल) घरातून येणाऱ्या पीपलमीटरच्या नोंदी एकत्र केल्या जातात आणि त्याद्वारे टीआरपी आणि इतर गोष्टी मोजल्या जातात. त्यात पुरुष, स्त्री, वय, सामाजिक आर्थिक परिस्थिती आदी अनेक गोष्टींचा विचार करून या गोष्टींचे मोजमाप करता येते आणि त्याद्वारे कार्यक्रमांच्या कथित लोकप्रियतेवर भाष्य केले जाते.
अर्थात गुंतागुंत इथे संपत नाही. कारण आज भारतातील सुमारे २२ कोटी घरांमध्ये पाहिल्या जात असलेल्या टीव्हीचे मोजमाप करण्यासाठी टॅमची सॅम्पल किंवा नमुना संख्या आहे फक्त ८१०० घरांची. आणि त्यातही भर आहे मुख्यत्वे शहरी घरांची. जम्मू-काश्मीर, आसाम, आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तर एकही पीपलमीटर बसवलेले नाही. सर्वेक्षण संशोधनामध्ये लावण्यात येणाऱ्या नमुना संख्या (सॅम्पलसाईझ) आणि प्रतिनिधित्वाच्या (रिप्रेझेन्टेशन) निकषावर पाहिले तर हे चित्र फारच तोकडे आहे. टॅमवर घेण्यात येणारा हा फार मोठा आक्षेप आहे. याबाबत संसदेतही चर्चा झाली. दोन वर्षांपूर्वी त्यावर एक समितीही नेमण्यात आली. त्यांनी ही संख्या दोन वर्षांमध्ये ३० हजारांवर नेण्याचीही शिफारस करण्यात आली होती. पण अजूनही नमुनाघरांची संख्या तेवढीच आहे. त्याखेरीज या व्यवस्थेमध्ये व्यावहारिक पातळीवर काही त्रुटी असून त्याचा काही वेळा हितसंबंधी लोक त्याचा गरफायदा घेऊन त्यांच्या फायद्याचे बदल घडवून आणू शकतात असाही आरोप अनेकदा करण्यात येतो. टॅमने हे आरोप नाकारले असले तरी पीपलमीटर असलेल्या घरांबाबतची गुप्तता, प्रत्यक्ष पीपलमीटर लावल्यामुळे त्या घरातील प्रेक्षकांचे अपरिहार्यपणे होणारे अनैसर्गिक प्रेक्षकवर्तन, प्रत्येक भाषिक आणि सामाजिक गटांतर्गत अजून घटलेली नमुनासंख्या या आणि अशा अनेक प्रश्नांबाबत संशोधनात्मक आणि व्यावहारिक पातळीवर खूप प्रश्न अनुत्तरितच आहेत. काही प्रश्नांची तर उत्तरे मिळण्याची शक्यताही नाही आणि हे सारे सुरू असताना या साऱ्या व्यवस्थेबद्दलचे अज्ञान आणि गूढ दूर करण्याचे प्रयत्नही होत नाहीत. त्यामुळे इतकी मोठी, मूलभूत आणि प्रभावकारी व्यवस्था असूनही तिच्याभोवतीचे संशयाचे धुके हटत नाही.
आणि ही परिस्थिती फक्त भारतातच आहे असे नाही. अमेरिकेतही अशा ग्राहकमापनावर आणि त्याच्यातील त्रुटी आणि उणिवांबद्दल ओरड आणि चौकशा होतच असतात. माध्यमांच्या क्षेत्रातले एक अभ्यासक गिटलीन यांचे यासंबंधी एक मार्मिक विधान आहे. ते म्हणतात, ‘‘पीपलमीटरमुळे फक्त टीव्ही सुरू आहे की बंद एवढेच खात्रीने कळू शकते. त्यावरील कार्यक्रम  बघितले जातात की नाही, बघितले गेले तर ते आवडले जातात की नाही आणि आवडले तर त्यांचा खरा प्रभाव पडतो की नाही हे काही या आकडय़ांवरून कळू शकत नाही.’’
आणि आपण मात्र टीआरपी कार्यक्रमांच्या सौंदर्याचे, लोकप्रियतेचे आणि प्रभावाचे परिमाण धरून चालतो. टीव्हीशी संबंधित प्रेक्षकांसह साऱ्या घटकांना हे कळेल तेव्हा प्रसारभान येण्याची कोंडी काही प्रमाणात सुटू शकेल..