प्रसारभान : एक परमसोहळा, एक स्थित्यंतर.. Print

विश्राम ढोले, शुक्रवार, २७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लंडन ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा बघण्यासाठी आज रात्री १ वाजता तुम्ही जेव्हा टीव्हीसमोर बसाल, तेव्हा तुम्ही एका परमसोहळ्यात सहभागी झालेले असाल. परम ही उपाधी खऱ्या अर्थाने आणि सर्वार्थाने लागू करता येईल असा हा एकमेव जागतिक सोहळा. केवळ खेळांची, खेळाडूंची आणि सहभागी देशांची संख्या यावरच नव्हे, तर माध्यमांचा सहभाग आणि त्याद्वारे अप्रत्यक्षरीत्या ऑलिम्पिकशी जोडल्या जाणाऱ्या लोकांची संख्या या निकषावरही ऑलिम्पिक परमसोहळाच ठरते. जगभरातील एकूण तीन अब्जांपेक्षा जास्त लोक लंडन ऑलिम्पिकच्या टीव्ही प्रक्षेपणाचा कोणता ना कोणता भाग पाहतील आणि उद् घाटनाचा सोहळा तर जगभरातील एक अब्ज लोक एकाच वेळी पाहतील, असा एक अंदाज आहे.

जगाची सध्याची लोकसंख्या सुमारे सात अब्ज. त्या अर्थाने पाहिले तर उद्घाटन सोहळा पाहताना तुम्ही एकाच वेळी एक सप्तमांश जगाशी जोडले गेले असणार. जगातल्या दर सातातल्या एकाला एकाच वेळी जोडणारा दुसरा मानवी सोहळा नाही.  
ऑलिम्पिकला खऱ्या अर्थाने जागतिक आणि परमसोहळा करण्यामध्ये माध्यमांचा विशेषत टीव्हीचा फार मोठा वाटा राहिला आहे. १९३६ सालच्या बíलन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा टीव्ही चित्रीकरण झाले. नंतर १९४८च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बीबीसीच्या रूपाने पहिल्यांदा टीव्ही वाहिनीने त्याचे नियमित प्रक्षेपण केले आणि १९६०च्या रोम ऑलिम्पिकपासून जागतिक ऑलिम्पिक समितीने (आयओसी) अधिकृत धोरण स्वीकारून टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क विकायला सुरुवात केली. तेव्हापासून टीव्ही उद्योगाचे तंत्रज्ञान, आíथक पाठबळ आणि प्रेक्षक वाढत गेले तसतसा ऑलिम्पिकवरचा टीव्हीचा प्रभावही वाढत गेला. अर्थात वृत्तपत्रे आणि रेडिओनेही ऑलिम्पिकच्या लोकप्रियतेत आणि ग्लॅमरमध्ये भर टाकलीच, पण टीव्हीचे योगदान सर्वात मोठे आणि परिणामकारक राहिले आहे.
ऑलिम्पिकच्या व्यापारीकरणालाही चालना मिळाली ती टीव्ही प्रक्षेपणाच्या व्यापकतेमुळे. १९८४च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकपासून ऑलिम्पिकला माध्यमांच्या मोठय़ा सहभागाचे, त्यातील व्यापारी हितसंबंधांचे आणि आíथक राजकारणाचेही प्रवाह बळकट होत गेले. बीजिंग ऑलिम्पिकदरम्यान फक्त चीनमधील ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी १२ कंपन्यांनी सहा अब्ज डॉलर्सची जाहिरातबाजी केली होती. अर्थात ऑलिम्पिकच्या निमित्ताने येणारा बहुतेक पसा अमेरिकी कंपन्यांचा असल्यामुळे त्या अर्थकारणावर आणि त्यातून ऑलिम्पिकच्या माध्यमीकरणावर अमेरिकेचा- खरंतर अमेरिकीशैलीच्या कॉर्पोरेट भांडवलशाहीचा- प्रभाव राहिला आहे. तसे नसते तर १९९६चे शताब्दी ऑलिम्पिक अथेन्सऐवजी कोकाकोलाचे मुख्यालय असलेल्या अटलांटामध्ये झाले नसते. गेल्या आठापकी चार हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा उत्तर अमेरिकी देशांमधील शहरांमध्ये भरविल्या गेल्या नसत्या. इतकेच नव्हे तर अमेरिकेपासून दूर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाचे वेळापत्रक अमेरिकी टीव्ही प्रेक्षकांना पाहण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून बनविले गेले नसते. टीव्हीसह इतर प्रसारमाध्यमांच्या अशा मोठय़ा प्रभावामुळे काही जण ऑलिम्पिकचे वर्णन माध्यमनिर्मित वास्तव असे करतात, तर काही जण त्याला सर्वात मोठा कमíशयल स्पॉट असे म्हणतात.
टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांचा प्रचंड सहभाग, करोडो डॉलर्सची उलाढाल आणि अब्जावधीची वाचक-प्रेक्षक संख्या या निकषांवर लंडन ऑलिम्पिकही आधीच्या स्पर्धाप्रमाणेच एक परमसोहळा ठरेल. पण हे होत असतानाच लंडन ऑलिम्पिकमध्ये एक मोठे स्थित्यंतरही घडून येत आहे. ते स्थित्यंतरही माध्यमांच्याच संदर्भातले आहे. मुख्यत्वे व्यापक प्रक्षेपणाच्या तत्त्वावर (ब्रॉडकास्ट डिस्ट्रिब्युशन) आधारलेल्या आणि एकतर्फी संवाद साधणाऱ्या टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांसारख्या प्रसारमाध्यमांच्या जोडीने या ऑलिम्पिकवर सहभागाच्या तत्त्वावर आधारलेल्या फेसबुक, ट्विटर, यू-टय़ुब यासारख्या समूहमाध्यमांचाही (सोशल मीडिया) प्रभाव राहणार आहे. त्याअर्थाने लंडन ऑलिम्पिक हे पहिले समूहमाध्यम ऑलिम्पिक असेल, असा दावाही अनेक जण करताहेत.
चार वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकच्या काळातही फेसबुक, ट्विटर, यू-टय़ुब होतेच. दोन वर्षांपूर्वी कॅनडातील व्हँकुव्हर येथे झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकदरम्यानही त्यांचा मोठा वापर झाला होता. पण आयओसीच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अलेक्स हाऊट यांच्या शब्दात सांगायचे झाले तर बीजिंग आणि व्हँक्युव्हरमध्ये फक्त हिमवर्षांव झाला, लंडनमध्ये (सोशल मीडियाच्या रूपाने) हीमप्रपात होणार आहे. आणि खरंही आहे ते. कारण बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी ट्विटरवर साठ लाख लोक होते आज ते चौदा कोटी झाले आहेत. तेव्हा फेसबुक्यांची संख्या दहा कोटी होती, आजमितीस फेसबुक ९० कोटींचा समूह आहे. बीजिंग ऑलिम्पिकच्या संपूर्ण काळात ऑलिम्पिकसंबंधी जेवढे ट्विट्स करण्यात आले तेवढे ट्विट्स गेल्या आठवडय़ात फक्त एका दिवसात करण्यात आले. २००० सालच्या सिडनी ऑलिम्पिकच्या वेळी वेगवान इंटरनेट कनेक्शन फारसे उपलब्ध नव्हते. २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकच्या वेळी बहुतेकांकडे स्मार्टफोन नव्हते आणि बीजिंगच्या वेळी समूहमाध्यमांवर फार लोक नव्हते. आता तसे नाही. इंटरनेटचा वेग, स्मार्टफोनची उपलब्धता आणि समूहमाध्यमांची लोकप्रियता आणि लवचिकता असा त्रिवेणी संगम यावेळी झाला आहे. म्हणूनच लंडन ऑलिम्पिकमध्ये जे अनुभवायला मिळेल तो फक्त बदल नसेल तर स्थित्यंतर असेल असे म्हटले जाते.
ऑलिम्पिक समितीनेही यावेळी खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष क्रीडानगरीतून या समूहमाध्यमांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात त्यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वेही  आहेत. दहा हजारांपेक्षा जास्त खेळाडू आणि पदाधिकारी आता थेट क्रीडानगरीतून, मदानातून त्यांच्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटच्या माध्यमाद्वारे थेट संवाद साधू शकणार आहेत. स्वत ऑलिम्पिक समितीने तिच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून खेळाडूंना लोकांशी संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.  
स्वत फेसबुकने ऑलिम्पिकसाठी खास दालन निर्माण केले आहे. खेळनिहाय, देशनिहाय पेजेस तयार केली आहेत. आजमितीस ६० देश आणि २०० खेळाडूंची फेसबुक पाने संवादांच्या, लाइक्सच्या, टॅग्सच्या अखंड प्रवाहाने भरून वाहत आहेत. उसेन बोल्टच्या ट्विटर खात्याचा सहा लाख लोक मागोवा ठेवतात. फेसबुकवर मायकेल फेल्पचे ५४ लाख तर मारिया शारापोव्हाचे ७२ लाख चाहते आहेत. हे सारे खेळाडू स्मार्टफोनवरून केलेल्या एका छोटय़ा नोंदीसरशी इतक्या साऱ्या लोकांपर्यंत पोहचू शकतात. त्यांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अनुभवू शकतात. या सगळ्या संवादशक्यतांमधून जाहिरातींच्या आणि व्यापाराच्याही खूप मोठय़ा शक्यता निर्माण होत आहेत.  
अशारीतीने ऑलिम्पिकच्या निमित्ताने एक भलीमोठी पर्यायी संवाद व्यवस्था आता भक्कम होऊ लागली आहे. त्यातून व्यापाराच्या, मतमतांतराच्या आणि थेट संपर्काच्या अनेक शक्यता आकाराला येत आहेत. खेळाडू, पदाधिकारी, संघटना, मदानावरील प्रेक्षक, बाहेरील प्रेक्षक अशा अनेक घटकांना ही व्यवस्था संवादाच्या एकाच पातळीवर आणून ठेवत आहे.  नियंत्रणाचे, नियमनाचे बंध फार सल करीत आहे. अधिकार, उतरंड, नियंत्रण, एकतर्फी संवाद अशा तत्त्वांनी चालणाऱ्या टीव्ही, वृत्तपत्रांसारख्या माध्यमांनी निर्माण केलेल्या प्रसार व्यवस्थेपेक्षा ही संवाद व्यवस्था फार वेगळी आहे. ऑलिम्पिक चळवळीचे प्रणेते कुबर्टीन यांनी आधुनिकतेच्या प्रेरणेतून १८९६ साली ऑलिम्पिकचे पुनरुज्जीवन केले. टीव्ही रेडिओ आणि वृत्तपत्रांसारख्या प्रसारमाध्यमांनी पुढे त्याला व्यापारी परिमाण दिले. कार्पोरेट भांडवलशाहीची तत्त्वे रुजविली. एका अर्थाने त्याला आधुनिकोत्तर रूप दिले. समूह माध्यमांच्या वाढत्या प्रभावातून लंडन ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने हे रूप अजून स्पष्ट होत आहे. म्हणूनच लंडन ऑलिम्पिक नेहमीप्रमाणे एक परमसोहळा तर आहेच, पण एका स्थित्यंतराचेही साक्षीदार आहे.