प्रसारभान : ‘स्टिंग’चा खरा डंख.. Print

 

विश्राम ढोले - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘झी’ चित्रवाणी समूह आणि ‘रिव्हर्स स्टिंग’चा आरोप करणारे नवीन जिंदाल यांच्यामुळे एरवीच्या ‘स्टिंग’पेक्षा निराळे काही घडले.. पण विश्वासार्हतेवर परिणाम झाला, तो दोघांच्याही!
झी टीव्हीवर रिव्हर्स स्टिंग ऑपरेशन करून उद्योगपती आणि खासदार नवीन जिंदाल यांनी प्रश्नांचे मोहोळ उठवून दिले आहे. एरवी माध्यमांच्या स्टिंग ऑपरेशनचा डंख बाकीच्यांना बसतो. या वेळी तो माध्यमांनाच बसला आहे. भविष्यात जिंदाल समूहालाही या स्टिंगचे फटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण डंख कोणालाही असो, या साऱ्या प्रकारच्या वेदना शेवटी माध्यमांबद्दल आस्था आणि विश्वास असणाऱ्यांनाच होणार आहेत. कारण सध्याच्या पत्रकारितेचे आणि उद्योगक्षेत्र व पत्रकारितेतील संबंधांचे एक विदारक स्वरूप त्यातून दिसून आले आहे.
खरे तर चांगली प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा वाईट प्रसिद्धी टाळण्यासाठी पत्रकारांना आमिष दाखविण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. चांगली प्रसिद्धी देण्याच्या किंवा कुप्रसिद्धी टाळण्याच्या बदल्यात पत्रकारांनी किंवा वृत्तमाध्यमांनी आपले फायदे करून घेण्याचे प्रकारही काही नवीन नाहीत. पेड न्यूजसह त्याचे अनेक नवनवीन अवतार गेल्या काही वर्षांमध्ये समोर येत आहेत. तरीही झी न्यूज आणि जिंदाल यांच्यातील स्टिंगमुळे धक्का बसल्याशिवाय आणि चिंता वाटल्याशिवाय राहात नाही. उच्च स्तरावरील राजकारण, उद्योग आणि पत्रकारिता यांच्यात कशा प्रकारचे व्यवहार चालू शकतात, याच्या विदारक शक्यतांचा एक पटच या प्रकरणाने आपल्यासमोर मांडला आहे.
कोळसा खाणवाटप भ्रष्टाचार प्रकरणात जिंदाल समूहावर आरोप आहेत. याच पाश्र्वभूमीवर झी न्यूजने जिंदाल उद्योग समूहाविरुद्ध बातम्यांची मोठी मोहीम चालविली होती. १०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या तर(च) ही मोहीम बंद करू अशी खंडणीवजा मागणी झी समूहातील वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी केल्याचा आरोप नवीन जिंदाल यांनी केला होता आणि झी विरुद्ध त्या संदर्भात एफआयआरही ऑक्टोबरच्या मध्याला दाखल केला होता. ही तक्रारही धक्कादायकच होती; पण गेल्या आठवडय़ात नवीन जिंदाल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंबंधीचे स्टिंग व्हिडीओ फुटेज दाखवून खळबळ उडवून दिली. झी न्यूजचे संपादक-बिझनेस हेड सुशील चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया आणि जिंदाल समूहाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात दिल्लीत विविध ठिकाणी झालेल्या चर्चा आणि वाटाघाटींचे हे फुटेज आहे. चौधरी आणि अहलुवालिया त्यात स्पष्टपणे दिसतात. २० कोटी द्यायचे की १०० कोटी, वाईट प्रसिद्धी कधी थांबवायची, नवीन जिंदाल यांची बाजू कशी मांडायची, त्याचा लेखी करार कसा करायचा वगरे वाटाघाटींच्या फेऱ्या त्यात ऐकू येतात. अशा बऱ्याच फेऱ्यांचे जे छुपे चित्रीकरण करण्यात आले, त्यापकी थोडेच जिंदाल यांनी त्या दिवशी दाखविले. झी समूहाने आणि या संपादकद्वयीने या साऱ्या आरोपांचा इन्कार केला आहे. उलट जिंदाल समूहच आम्हाला कशी लाच देऊ करतोय हे दाखविण्यासाठी आम्हीच हे स्टिंग करीत होतो. त्यामुळे आम्ही हे पसे घेत असल्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. शिवाय हे स्टिंग फुटेज निवडक आहे आणि संपादित आहे, त्यामुळे आमच्या म्हणण्याचा आणि वाक्यांचा विपर्यास होऊ शकतो असाही बचाव आता झी समूह करीत आहे. प्रकरण अर्थातच आता न्यायालयात गेले आहे. झी विरुद्ध जिंदाल समूहाने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला असून आता न्यायालयात या व्हिडीओ टेप्सची आणि प्रकरणाची सत्यासत्यता तपासण्याचे काम सुरू झालेले आहे.
कोण खरे आणि कोण खोटे हे उघड होईलही, पण कोणाचेही म्हणणे खरे निघाले तरी अंतिमत: नुकसान पत्रकारितेवरील भरवशाचेच होणार आहे. खरे तर या साऱ्या प्रकरणात झीची भूमिका संशयास्पद आहे. आपल्याच वाहिन्यांवर जिंदाल समूहाविरुद्ध बातम्यांचे सत्र सुरू असताना त्या वाहिन्यांची संपादक-बिझनेस हेडसारख्या मोठय़ा पदावर असणाऱ्या व्यक्तीने जिंदालच्या अधिकाऱ्यांची कार्यालयाबाहेर भेट घेण्याचे कारणच काय, असा प्रश्न सहज उभा राहू शकतो आणि जिंदाल समूह लाच देत असल्याचे सिद्ध करायचेच असेल तर त्यासाठी १०० कोटींपर्यंत वाटाघाटी ताणण्याचे कारण काय होते? २० कोटींची लाच देण्याची ऑफर दिल्याने जिंदाल समूहाचा गुन्हा काय कमी गंभीर झाला असता काय? आणि झी जर हे स्टिंग करीत होते तर त्यांच्या वतीने कोणतेच रेकॉìडग का करण्यात आले नाही? जिंदाल समूह आमच्यावर असा दबाव आणत आहे किंवा लाच देत आहे हे सांगण्यामध्ये एरवी सतत वेळेशी स्पर्धा करण्याच्या व्यवसायात असलेल्या झीच्या वाहिन्यांनी इतका वेळ का लावला? एरवी स्टिंग ऑपरेशनचा अनुभव असलेल्या वाहिन्या या इतक्या महत्त्वाच्या प्रकरणात त्यांच्यावरच स्टिंग होण्याइतपत गाफील का राहिल्या, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि झी भोवती संशयाचे धुके वाढवितात. अर्थात, न्यायालयात याचा काय तो निर्णय होईलच, पण दुर्दैवाने झीकडून याबाबत जाहीरपणे दिली गेलेली स्पष्टीकरणे पुरेशी कन्व्हेिन्सग वाटत नाही. हे प्रकरण पोलिसांमध्ये दाखल होताच वृत्तवाहिन्यांच्या संपादकांची संघटना बीईएने संघटनेतील सदस्यांच्या एका समितीकरवी सुधीर चौधरींच्या भूमिकेची चौकशी केली आणि तिच्या अहवालाच्या आधारे सुधीर चौधरी यांचे संघटनेचे सदस्यत्वही रद्द केले. हेच सुधीर चौधरी पूर्वी ज्या लाइव्ह इंडिया वाहिनीचे संपादक होते, तेव्हाही त्या वाहिनीने केलेले एका शिक्षिकेविरुद्धचे स्टिंग असेच खोटे निघाले होते. या साऱ्या बाबी निश्चितच झी समूहाच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. पण अशा प्रकरणांमध्ये माध्यमांच्या मालकांनी वा वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी लोकांना जाहीरपणे काही स्पष्टीकरण देण्याची आपल्याकडे पद्धत नाही.
मरडॉक आणि जिंदाल
या पाश्र्वभूमीवर इंग्लंडमध्ये अलीकडेच झालेली न्यूज ऑफ दी वर्ल्डची चौकशी लक्षात घेण्यासारखी आहे. माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांच्या मालकीच्या न्यूज ऑफ दी वर्ल्ड या ब्रिटिश टॅबलॉईडने बातम्या मिळविताना लोकांचे मेल हॅक केले व खासगी गुप्तहेरांचीही मदत घेतली आणि असे करताना लोकांच्या खासगीपणाचा भंग केला असा आरोप होता. आपल्या मालकीच्या दैनिकामध्ये अशा प्रकारच्या नीतिमूल्यांना आणि संकेतांना न मानणारी पत्रकारिता चालते याची पुरेशी कल्पना असूनही त्यांनी या साऱ्या प्रकाराकडे हेतुत: दुर्लक्ष केले असा रुपर्ट आणि जेम्स मरडॉक पितापुत्रांवरही आरोप होता. संतप्त लोकभावना आणि राजकीय पक्षांच्या दबावामुळे अखेर मरडॉक पितापुत्रांना सांसदीय चौकशी समितीला सामोरे जावे लागले आणि समितीने मरडॉक यांच्यावर तुम्ही माध्यमसमूहाचे मालक म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाही, अशा कडक शब्दांत त्यांच्यावर ताशेरे ओढले. या साऱ्या पाश्र्वभूमीवर झीच्या मालकांचे जाहीर मौन निदान या दोन देशांतली पत्रकारिता किंवा माध्यम संस्कृतीतील फरक ठळकपणे दाखवून देते.
अर्थात असे होत असताना जिंदाल समूहला काही फार स्वच्छ वगरे मानावे अशी स्थिती नाही. कोळसा प्रकरणात त्यांच्यावरही आरोप आहेतच. त्यासंबंधीचे धुके अजून हटायचे आहे. झीसंबंधी प्रकरणात २० कोटी रुपयांवर तडजोड झाली असती तर हे स्टिंग बाहेर आले असते काय, हाही प्रश्न उरतोच. उद्योगजगताचे बातम्यांवर, पत्रकारितेवर प्रभाव पाडण्याचे, त्याला हवे तसे वळण देण्याचे उघड आणि छुपे प्रकार होत असतात, हे तसे पत्रकारितेतल्या आणि बाहेरच्यांनाही बऱ्यापकी माहीत असते. पण ते प्रत्यक्षात कसे आणि कोणत्या पातळीला होत असतात हे या प्रकरणातून समोर आले आहे. या निमित्ताने तद्दन फिल्मी असला तरी राजकुमारचा ‘चिनाय सेठ.. जिनके घर शिशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करतें’ हा डायलॉग आठवल्याशिवाय राहात नाही. खरे तर माध्यमांचे घर असे काचेचे व्हावे हे दुर्दैवी. पण त्याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी एकमेकांवर केलेल्या या दगडफेकीत या दोघांवरील आपल्या  विश्वासाला तडे जाताहेत..