पसाय-धन : देव तूं सोइरा करीं आतां.. Print

अभय टिळक, शुक्रवार, २७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देवाशी सोयरीक करणे, ही संतांनी तुम्हाआम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी! जबाबदार सदाचाराचे, उचित आणि  नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव, हे विसरून आज देवाची रवानगी देव्हाऱ्यात झालेली आहे.. ‘सोयरा’ हा खरोखरच किती गोड शब्द आहे नाही का! ‘सोयरा’ म्हणजे ‘आप्त’ किंवा ‘नातेवाईक’. आपल्या रोजच्या जगण्यात ‘नातेवाईक’ हा शब्द आपण हजारदा वापरतो. पण, (ध्वनिसाधम्र्यामुळे ‘तऱ्हेवाईक’ या शब्दाशी जवळचा संबंध असल्यामुळे असेल कदाचित) ‘सोयरा’ या शब्दाच्या उच्चाराबरोबर निर्माण होणारी आपुलकी ‘नातेवाईक’ या शब्दात उमटत नाही. ‘सोयरा’ या शब्दात काही औरच गोडवा आहे. आमच्या संतांनी देवाला म्हणूनच, ‘सोयरा’ असेच संबोधलेले आहे.  देवाला आपला सखा बनवणे, त्याला आपला सोयरा मानणे, देवाशी सोयरीक करणे, ही संतांनी तुम्हाआम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी आहे. आज आमच्या सगळ्याच संवेदना बऱ्यापैकी निबर बनलेल्या असल्याने त्या देणगीचे आपल्या जगण्याच्या संदर्भातील मोल आपल्याला उमगेनासे झालेले आहे, इतकेच.
‘देव’ नामक संकल्पनेशी वा श्रद्धाविषयाशी थेट सोयरीक स्थापन करून  ‘देव’ आणि ‘माणूस’ यांच्या परस्पर नात्यामध्ये पार अनादी काळापासून साकारत आलेल्या उत्क्रांतीचा तिसरा टप्पा भागवतधर्मीय संतांनी सिद्ध केला. उत्क्रांतीच्या या तिसऱ्या टप्प्यांचे शिल्पकार म्हणजे आमचे नामदेव. विठ्ठल आणि केवळ नामदेवच नव्हे तर नामदेवबाबांच्या कुटुंबातील सगळेच सदस्य यांच्या दरम्यानच्या नात्याचे अतीव मधुर, तरल आणि विलक्षण गहिरे पदर आपल्याला त्यांच्या अभंगांत पाहायला सापडतात. त्यावरून देवाला आपला ‘सोयरा’ बनवण्यात या कुटुंबाने आध्यात्मिक-सांस्कृतिक-नैतिक आणि सामाजिक असे बहुआयामी केवढे उन्नयन घडवून आणले, याची आपल्याला पुरेपूर कल्पना येते.
‘देव’ ही संकल्पना आणि माणूस यांच्या नात्यातील पहिला टप्पा साकारला आदिम काळात. सृष्टीतील नाना प्रकारच्या घटितांचा कार्यकारणभाव उलगडण्याच्या आधीचा तो काळ. वारा, पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर यांसारख्या घटनांच्या मागे त्यांचा कर्ता-करविता कोणीतरी असला पाहिजे, या जाणिवेतून देवतांची संकल्पना मानवाच्या मनात उद्भवली असली पाहिजे याबाबत आता विद्वानांमध्ये एकमत आहे. त्यामुळे, अन्न, पाणी, आरोग्य, दीर्घ आयुष्य, शांती, विपुलता यांसारख्या, माणसाचे लौकिक जीवन सुखसमृद्धकारक बनवणाऱ्या गोष्टी त्या त्या देवतांनी आपल्याला प्रदान कराव्यात, यासाठी देवांना संतुष्ट ठेवण्याची प्रेरणा देवविषयक धारणांच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर अंकुरली. प्राचीन काळातील यज्ञविधी हा याच धारणेचा एक आविष्कार. यज्ञीय आहुतींद्वारे देवांना अनुकूल बनवून घेणे आणि आपले ईप्सित पुरे करण्याबाबत त्यांना बाध्य बनवणे, ही भावना देव आणि माणूस यांच्या दरम्यानच्या संबंधांच्या त्या टप्प्यावर बलवत्तर होती.
संपूर्ण मानवी संस्कृती यज्ञकाळातून उपनिषदांच्या काळात पोहोचेपर्यंत ‘देव’ या संकल्पनेसंदर्भातील भावनांचे उन्नयन घडून आले. उपनिषदांमध्ये ‘भक्ती’ या भावनेचा आपल्याला आज परिचित असलेला अर्थ प्रथम प्रगटलेला दिसतो. तसे बघितले तर हा तुलनेने खूप अलिकडचा काळ. कारण श्वेताश्वतर उपनिषदात प्रथम ‘भक्ती’ ही संज्ञा प्रकटते.  ‘देव’ आणि त्याचा ‘भक्त’ यांच्या दरम्यानच्या नात्याचे आध्यात्मिक परिमाण या टप्प्यावर सिद्ध झाले. म्हणजेच, ‘देव’ या संकल्पनेच्या आणि पर्यायाने देव व माणूस यांच्या परस्पर नात्याच्या उत्क्रांतीचा हा दुसरा टप्पा ठरतो. पहिल्या टप्प्यातील काम्य उपासनेचे आणि देव व माणूस यांच्या दरम्यानच्या भीतीयुक्त आदराच्या भावनेचे या दुसऱ्या टप्प्यावर उन्नयन घडून आलेले दिसते. लौकिक प्रपंचातील सुखासाठी देवाकडे काहीही मागायचे नाही, हा या टप्प्यावरील देव-भक्त संबंधांचा गाभा. भगवंताला केवळ अनन्य भावाने शरण जायचे, त्याची उपासना करायची आणि भक्ताच्या अशा समर्पित भावनेने तुष्टलेल्या देवाने त्याला प्रपंचातून मुक्त करायचे, हा सगळा या दुसऱ्या टप्प्यावरील नातेव्यवहार. देवाची प्रतिष्ठापना देवघरात करून मनोभावे त्याच्या अर्चन- पूजनात निमग्न होणे, ही भक्ताच्या लेखी त्याच्या जीवनाची या टप्प्यावरची इतिकर्तव्यता. ‘देव’ नावाची एक सुभग संकल्पना माणसाच्या भावविश्वात आणि पर्यायाने घरातल्या देवघरात उपास्य बनून प्रतिष्ठित होणे, हा देव व माणूस यांच्या परस्परसंबंधांच्या उत्क्रांतीच्या या अवस्थेतील परमोच्च बिंदू.
..तर, परम आदराने, भक्तीने आणि शरण्य भावाने देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना केलेल्या देवाला देवघरातून बाहेर काढून आपल्या कुटुंबाचा, घरादाराचा घटक बनवणे, ही संतांची अनुपम्य कामगिरी! देव आणि भक्त यांच्या दरम्यानच्या नात्याचा हा तिसरा टप्पा. एका अर्थाने, देव आणि माणूस यांच्यातील नातेसंबंधांच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील हे तिसरे निर्णायक वळण. या आधीच्या दुसऱ्या टप्प्यावर देव आणि त्याचा भक्त यांच्यादरम्यानचे नाते मधुरतम असले, तरी त्यात एक अदृश्य रेष होती.  आमच्या संतांनी या द्वैताचेही विसर्जन घडवून आणले! त्यांनी मुळात ‘भक्ती’ या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली. ‘देव’ आणि ‘भक्त’ यांच्या प्रगाढ ऐक्याच्या अवस्थेलाच त्यांनी ‘भक्ती’ हे संबोधन दिले. द्वैताचा उपसर्ग इथे त्या देवालाही सहन होत नाही आणि भक्तालाही सोसवत नाही. ‘मी - तूं पण जाऊ दे दुरी । एक चि घोंगडे पांघरू हरि’, या ज्ञानदेवांच्या लडिवाळ उद्गारांत त्या अभेदाचे माधुर्य प्रतिबिंबित झालेले आहे.  
देवाला सोयरा बनवणे ही या टप्प्यावरची संतांनी साधलेली खासियत. देव हा घरातला वडिलधारा आप्त आहे, ही ‘देव’ या संकल्पनेकडे सुपूर्त केलेली भूमिका प्रकर्षांने आपल्याला प्रतीत होते ती आमच्या नामदेवबाबांच्या भावविश्वात. नामदेवरायांची गाथा जरा किंचित संवेदनशीलतेने बघा. अहो, एक प्रसंग तर अतीव मधुर आहे. लौकिक प्रपंच विसरून अहोरात्र विठ्ठलाच्याच भजनात नामदेव गुंग झाल्याने संसारात पदोपदी उद्भवणाऱ्या अभावग्रस्ततेने गांजून गेलेली नामदेवांची धर्मपत्नी खुद्द विठ्ठलाच्या अर्धागिनीकडेच आपले गाऱ्हाणे नेते, असा तो प्रसंग. राजाई हे नामदेवबाबांच्या बायकोचे नाव. घरात निजानीज झाल्यावर, दोन प्रहर रात्रीचा एकांत बघून राजाई उठतात आणि रखुमाईला विनवितात की, ‘अहो रखुमाबाई विठोबासी सांगा। भ्रतारासी कां गा वेडें केले।।’  माझा नवरा तुमच्या नवऱ्याच्या नामचिंतनात अहोरात्र मग्न असल्याने, ‘वस्त्र पात्र नाही खाया जेवायासी’ असा मोठा दुर्धर प्रसंग संसारात उद्भवतो आहे, हे गाऱ्हाणे राजाई मांडतात रुक्मिणीकडे. लौकिक प्रपंचाकडे दुर्लक्ष केले तर घर चालायचे कसे, हा गृहिणीचा रोखठोक भाव आहे इथे. बरे, नामदेवांचा प्रपंच तरी लहानसहान होता का? राजाई पुढे सांगतात, ‘चवदा मनुष्ये आहेत माझ्या घरी’. आता या एवढय़ा कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, अशी तक्रार नामदेवांची अर्धागिनी विठोबाच्या वामांगापाशी गुदरते.
आता, कोणी म्हणेल की, हे सारे कल्पित आहे. असेलही. आपण घटकाभर हे सगळे बाजूला ठेवू. पण, आपला नवरा परमार्थात बुडाल्यामुळे प्रपंचाकडे दुर्लक्ष होते आहे, याबाबत नामदेवांची बायको नवऱ्याच्या आराध्य दैवताच्या अर्धागिनीकडेच तक्रार करते यात एक फार मोठा आणि हृद्य संकेत आहे. नामदेवांचे संपूर्ण कुटुंब विठ्ठलाकडे घरातल्या वडिलधाऱ्याची भूमिका सोपवते, हा तो संकेत. संपूर्ण घरादारावर आपली ममतापूर्ण परंतु करडी नजर ठेवणारे घरातले वडिलधारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देव, हा ‘देव’ या संकल्पनेला संतांनी प्रदान केलेला आयाम खरोखरच क्रांतिकारक आहे. घरादाराला जबाबदार सदाचाराचे, उचित आणि  नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव, हे नामदेवांनी आम्हाला शिकवले.  देवाला सोयरा बनवून देव आणि भक्त यांच्या नात्याला एक आगळे परिमाण प्रदान करत असतानाच देव आणि देवाचाराला संतांनी नीतिमय आणि प्रपंचपूरक आचरणाचे अस्तर जोडले ते असे. आमची चालच उफराटी! संतांनी देव्हाऱ्यातून  कुटुंबात आणलेल्या ‘देव’ या संकल्पनेची आम्ही पुन्हा रवानगी केली देव्हाऱ्यात! त्याला एकदा का नैवेद्याचे ताट दाखवले की देव गप्प! परिणाम एवढाच झाला, की ‘देव’ या संकल्पनेबरोबर येणारा नैतिकतेचा धाक पार लोपूनच गेला. त्यामुळे सोय झाली ती आमची. आमचा दांभिक देवाचार आणि नीतिशून्य अनाचार आज सुखेनैव समांतर चालू आहे तो काय उगीच!