बुक-अप : एका हत्येचे वर्षश्राद्ध! Print

alt

गिरीश कुबेर, शनिवार, ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘क्रूरकर्मा’ वगैरे बिरुदं लादेननं ज्या घटनेनंतर मिळवली, त्या ‘९/११’च्या नंतरची सात-आठ र्वष स्टीव कोल लादेनचा माग काढत होता.. कशामुळे हा क्रूरकर्मा घडला, याचा शोध घेत होता. ओसामा अधिकाधिक हिंसक होत असताना दुसरीकडे हे बिन लादेन कुटुंब अमेरिकी समाज आणि अर्थजीवनात आपली मुळं अधिकाधिक घट्ट करत होतं, यातला विरोधाभासही या शोधातून समोर आला आणि उत्तरं मिळण्याऐवजी, प्रश्न अर्थगर्भ झाले..

सौदी देश नुकताच कुठे जन्माला आलेला. कोणत्याही नव्या देशाला भेडसावणाऱ्या समस्या त्या देशालाही भेडसावत होत्या. मुख्य म्हणजे पैसे नाहीत. त्यात या देशाचा जन्मदाता महंमद बिन इब्न सौद हे एक भारी प्रस्थ होतं. ऑटोमन साम्राज्य लयाला गेल्यानंतर प. आशियाच्या वाळवंटात रक्ताचे पाट मुक्तपणानं वाहत होते आणि त्याचं एक कारण होतं सौद. त्याच्या काळात मक्केसाठी तुंबळ युद्ध झालं. या पवित्र धर्मस्थळावर ताबा करू पाहणाऱ्या हाशेमाइट घराण्याच्या मंडळींना सौदनं शब्दश: कापून काढलं. त्याचा हा कत्तलखाना इतका मोठा होता की मक्केवरचे रक्ताचे ओघळ कित्येक दिवस वाहतेच होते.
या पठ्ठय़ानं हा प्रदेश पादाक्रांत केला. आपलंच नाव आपल्या देशाला दिलं आणि तो एका महत्त्वाच्या कामाला लागला. मुलं जन्माला घालायच्या. तीन गोष्टी मला अतिप्रिय आहेत, असं तो जाहीरपणे सांगायचा. स्त्रिया, अत्तर आणि अल्लाची प्रार्थना. तिन्हीत तो रंगून जायचा. इतका की त्याच्या मुलांचीच संख्या साधारण दोनशेच्या आसपास आहे. त्याच्या डगल्यात सतत अत्तराची कुपी असायची. कोणीही भेटायला आला की आधी हा अत्तर लावायचा. वर, तू गेल्यावरही माझी आठवण त्यामुळे तुझ्याबरोबर काही काळ तरी राहील.असं सांगायचा. आणि प्रार्थनाही त्याला तितकीच प्रिय होती. महंमद वहाब हाच त्याचा धर्मगुरू होता. वहाबी परंपरा जन्माला आली ती त्याच्याच काळात.
पण हे झालं तरी राज्य कसं करायचं हे काही त्याला माहीत नव्हतं. राज्य श्रीमंत करायचं म्हणजे राजवाडय़ाच्या खोल्यांत सोन्याची बिस्किटं पोत्यात भरून ठेवायची ही त्याची कल्पना. त्याच्या काळात देश जन्माला आला. पण वाढेना. पुढे त्याचा थोरला मुलगा दिवटाच निघाला. अय्याशी- रंगरलियेत त्याची जवानीच काय, आयुष्य गेलं. हे त्याचा भाऊ फैझल यांना पाहवेना. अखेर त्यांनी सत्ता हाती घेतली आणि देश उभा करायला सुरुवात केली.
तरी प्रश्न होता, भांडवल कोण देणार? साधी मशीद बांधायची तर भांडवल लागतं. अशा कफल्लक देशात कोण गुंतवणूक करणार? वास्तविक त्या देशात जमिनीखाली तेलाचे धबधबेच्या धबधबे सापडत होते. पण त्यांतून नीट पैसा यायला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे फैझल यांना हवं तसं कोणी भांडवल देईना.
अखेर एक व्यक्ती पुढे आली.
शेख महंमद बिन अवद बिन लादेन.
हे त्याचं नाव. मूळचा येमेनचा. पोटासाठी वणवण करत सौदीच्या जेद्दाह इथं येऊन पोहोचला. तिथं बंदरात तो मजुरी करायचा.

नंतर त्याला वाटलं आपण बांधकामं करणारी कंपनी काढावी. काढली. त्यावेळी तिथं सत्तेवर होता महंमद बिन इब्न सौद. त्याला असे हरहुन्नरी व्यावसायिक हवे होते. सौदकडे इच्छा होती, पण माणसं नव्हती. ती तो बरोबर हेरायचा. त्यामुळे त्याला लक्षात आलं-  महंमद कामाचा माणूस आहे, ते. हे दोघे एकत्र आले. सौदची सुरुवातीची कामं लादेन करायचा. कुठे रस्ते बांध, मशीद बांध.. पुलाची उभारणी कर. असं करता करता थेट मक्केच्या मशिदीची उभारणी त्याच्याकडेच आली. अल्लाचीच कृपा. मग त्यानं कधी मागे वळून पाहिलं नाही. तो इतका गडगंज o्रीमंत झाला की पहिल्या सौदच्या पोरानं देशाचं वाटोळं केल्यावर थेट राजालाच कर्ज देण्याइतकी त्यांची ऐपत सुधारली. राजे फैझल यांनाही गरज होती. त्यांनी ते कर्ज घेतलं. पुढे सौदीतली अनेक कामं महंमद बिन लादेन याला मिळाली. त्याचा व्याप इतका वाढला की तेलसम्राटाच्या देशातला सर्वात मोठा धनाढय़ म्हणून तो ओळखला जाऊ लागला.
तुम्हा-आम्हाला माहिती असलेला ओसामा हा याच महंमदचा सुपुत्र. १७वा. म्हणजे महंमदलाही त्याचा मित्र इब्न सौद, म्हणजे दुसरा महंमद, याच्याप्रमाणे लग्नाचा षौक होता. एकंदर २३ लग्नं केली त्यानं. त्यापासून ५४ छोटे लादेन जन्माला आले. यातला सगळय़ात नाव काढणारा तो ओसामा. १६ जणांच्या पाठीवरचा. इतकी लग्नं केली तरी त्यानं नियम कधी मोडला नाही. म्हणजे एका वेळी त्याच्या पत्नींची संख्या चारपेक्षा कधी जास्त झाली नाही. जुन्या सोडायच्या आणि नव्या धरायच्या. पण एका वेळी चारच. पुढे १९६७ साली, सप्टेंबर महिन्यात, २४ व्या लग्नासाठी कांदेपोहय़ाच्या कार्यक्रमाला जात असताना याचं खाजगी विमान कोसळलं आणि तो गेला. त्यानंतर सलीम या त्याच्या थोरल्या मुलानं बिन लादेन समूहाची धुरा खांद्यावर घेतली. या उद्योगाचा व्याप नंतर इतका वाढला की त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्याच ४० हजाराच्या वर गेली. ओसामानं ९/११ घडवलं, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते दोन दिमाखदार मनोरे कोसळले आणि हे सगळेच बिन लादेन प्रकाशात आले.
मी तेलावर पुस्तकं लिहीत असताना हे बिन लादेन घराणं सतत पाश्र्वभूमीवर असायचंच. म्हणजे १९७९ साली अफगाणिस्तानात सोविएत रशियाच्या फौजा घुसण्याचा प्रसंग असू दे, १९९३ सालचा पहिला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला असू दे किंवा १९९१ नंतर सौदी alt
आणि अमेरिकेच्या संबंधात आलेला तात्पुरता तणाव असू दे.या सगळय़ात ओसामा नाही असं कधी व्हायचंच नाही. त्यामुळे स्टीव कोल याचं जेव्हा द बिन लादेन्स : अ‍ॅन अरेबियन फॅमिली इन द अमेरिकन सेंच्युरी हे पुस्तक जेव्हा अमेरिकेत प्रकाशित झालं, तेव्हा ते मिळवण्यासाठी इतके प्रयत्न केले होते की १५ दिवसाच्या आत ते माझ्या हाती आलंदेखील. स्टीवचं लिखाण त्याच्या आधी ‘द न्यूयॉर्कर’ नियतकालिकात सातत्यानं वाचत होतोच. बिन लादेन्सच्या आधी त्याचं घोस्ट वॉर्स हे पुस्तक आलं होतं. तेही माझ्या संग्रही होतं. १९७९ साली अफगाणिस्तानात सोविएत फौजा घुसल्यानंतर अमेरिकेने त्या साऱ्या परिसरात केलेले उद्योग तपशीलवार त्यात आहेत. त्यावेळी स्टीव बहुधा वॉशिंग्टन पोस्टमध्ये होता. त्याचं हे घोस्ट वॉर्स इतकं गाजलं की त्याला त्या वर्षीचं पुलित्झर मिळालं होतं. त्याच्या नंतरच्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय अराजकवादी उद्योगांचा आढावा म्हणजे बिन लादेन्स.
ओसामामुळे हे घराणं नको त्या कारणांसाठी चर्चेत आलं आणि नंतर त्यांच्याभोवती गूढ वलय घट्ट घट्टच होत गेलं. या घराण्याचा इतिहास स्टीवने उत्तमपणे मांडलाय. आपल्याकडे मोठं काही घडलं की त्याच्यावर पटापटा पुस्तकं पाडणारे लेखक आहेत आणि छापणारे प्रकाशकही आहेत. स्टीवचं पुस्तक तसं नाही. कारण मुळात स्टीव तसा नाही आणि ते प्रकाशकही तसे नाहीत. त्यामुळे ९/११ घडल्या घडल्या २००१ सालानंतर लगेच त्याचं पुस्तक आलं नाही. त्यानं निवांत सात-आठ र्वष घेतली अभ्यास करायला. त्या परिसरांत तो हिंडला. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातल्या तपशिलाचा वापर पुस्तकात करायचं ठरवल्यावर त्यांच्याकडे परत तो गेला. तुम्ही जे म्हणालात आणि मला जे कळलंय..ते असं आहे-  बरोबर आहे ना.. असं विचारत त्यानं तपशिलाची खातरजमा करून घेतली.
आणि मगच ते पुस्तक बाहेर आलं. त्यामुळे त्याला वजन आहे. ऐतिहासिक दस्तावेजाचा दर्जा आहे. एका बाजूला ओसामा अधिकाधिक हिंसक होत असताना दुसरीकडे हे बिन लादेन कुटुंब अमेरिकी समाज आणि अर्थजीवनात आपली मुळं अधिकाधिक घट्ट करत होतं. हे सगळंच समजून घेणं आवश्यक आहे. कारण इतिहास हा काळय़ा आणि पांढऱ्या रंगात नसतोच कधी. त्यामुळे अमेरिका नसती. म्हणजे अमेरिकेनं जे काही उद्योग केले ते केले नसते तर..ओसामा तयार झाला असता का, असा प्रश्न पडू शकतो. अशी पुस्तकं वाचायची असतात ती उत्तरांसाठी नाही, तर अधिकाधिक प्रश्न पडावेत यासाठीच.
स्टीवच्या आधी बिन लादेन/ बिहाइंड द मास्क ऑफ द टेररिस्ट हे अ‍ॅडम रॉबिन्सन याचं पुस्तक संग्रही होतंच. मुंबईतल्या मॅग्ना बुक स्टेाअर्समध्ये कोपऱ्यात पडलेलं होतं. फक्त १०० रुपयांत मिळालं होतं तेव्हा ते. बिन लादेन घराण्याशी अ‍ॅडमला फारसं काही घेणं-देणं नाही. ओसामाचं ओसामापण आणि ते सापडल्यानंतरचे त्याचे उद्योग याच्यात त्याला जास्त रस आहे. बऱ्याचशा वदंताही यामुळे पुस्तकाच्या काही पानांत घुसल्या आहेत. पुस्तक वाचनीय आहे, हे नक्की. पण प्रत्यक्ष गुप्तहेराने अधिकृतपणे सांगितलेली एखाद्या गुन्ह्य़ाच्या शोधाची कथा आणि गुरुनाथ नाईक यांची गुप्तहेर कथा. यात जसा फरक असतो तसा या दोन पुस्तकांत तो आहे. अर्थात ही तुलना फक्त उदाहरणार्थच. नाही तर अ‍ॅडमवर अन्याय व्हायचा. त्या पुस्तकाची म्हणून एक उपयुक्तता आहेच.
ज्या व्यवस्थेन त्याला पाळलं, पोसलं.. त्या व्यवस्थेलाच तो आव्हान द्यायला निघाला. अखेर अमेरिकेनं सर्वसोयिस्कर वेळ गाठून ओसामाला उडवला. व्यवस्थेलाच आव्हान देण्याइतके आपण मोठे झालो आहोत असं वाटण्याएवढा तो मोठा कसा झाला, हे समजून घ्यायचं असेल आणि असं सोयिस्कर मोठं करणाऱ्यांना आव्हान दिलं की काय होतं हे शिकायचं असेल तर ही दोन्ही पुस्तकं वाचायला हवीत. ओसामाच्या वर्षo्राध्दाच्या निमित्ताने..