बुक-अप : गाळलेल्या जागा भरणारा लेखक Print

गिरीश कुबेर - शनिवार, १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अहमद रशीद हा मूळचा चळवळय़ा. तो पत्रकार झाला, अफगाणिस्तानतल्या उलथापालथींचा एक मोठा काळ त्यानं पाहिला आणि त्यानं लिहिलेलं तालिबान हे महत्त्वाचं पुस्तक ठरलं..
पुढल्या पुस्तकांसाठी त्यानं विषय निवडले तेही कुणीच जिथं पाहात नाही, पोहोचत नाही, असे!

अहमद रशीद पहिल्यांदा भेटला गोविंदराव तळवलकरांच्या लेखातून. अमेरिका, सोव्हिएत रशिया.. त्यांच्यातलं ते अत्यंत ज्वलनशील असं शीतयुद्ध. त्याच्यातच अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियानं केलेली घुसखोरी आणि त्यामुळे या वैराण देशात रशियाचं व्हिएतनाम करण्याची अमेरिकेला मिळालेली संधी.. हे सगळं समजावून घेताना जाम मजा येत होती. मुळात आपल्याकडे मराठी वर्तमानपत्रांत आंतरराष्ट्रीय घटनांचं विश्लेषण ‘टाइम’, ‘न्यूजवीक’ वगैरेंच्या मदतीशिवाय करणारी फार मंडळी नाहीत. त्या काळात त्यामुळे गोर्बाचेव यांचं ते ग्लासनोस्त आणि पेरिस्त्रोयका म्हणजे काय हे तपशिलात समजावून घेण्यात फार वेळ जायचा आणि त्यात त्या वेळी काही इंटरनेट नव्हतं आणि त्यामुळे काही गुगल करायचीही सोय नव्हती. चांगलं काही समजावून घ्यायचं असेल तर चांगली पुस्तकं वाचायला पर्याय नव्हताच. आताही तो नाहीच म्हणा, पण तेव्हा चांगली पुस्तकं सहज मिळायचीही नाहीत. परत मिळाली तर परवडतील की नाही, हाही मुद्दा होता.
त्या काळात अहमद रशीद याच्या ‘तालिबान’ या अप्रतिम पुस्तकाचं परीक्षण गोविंदरावांनी केलं होतं. या सगळ्या परिसराचं आकर्षण आधीही होतंच. त्यामुळे त्या विषयावर जे जे उत्तम लिहून येतंय, ते सगळं संग्रहित करायचा छंदच लागला. त्यात रशीदचं ‘तालिबान’ पहिल्यांदा हाती लागलं. ते वाचल्यावर, कोणतंही चांगलं पुस्तक वाचल्यावर येतो तसा- एक सुन्नपणा येतो. वर्तमानपत्र, अन्य माध्यमं तालिबान वगैरे विषयावर किती अर्धवट माहितीवर लिहीत असतात, याची जाणीव करून देणारं ते पुस्तक होतं. ते वाचलं आणि रशीद आवडायला लागला.
पत्रकारितेत काही काही जागा हेवा वाटाव्या अशा असतात. म्हणजे जातिवंत वार्ताहराला आपण त्या परिसरात असायला हवं, असं वाटतंच वाटतं. अफगाणिस्तान, प. आशिया हे असे परिसर. पुढे तेलावरच्या पुस्तकांच्या निमित्ताने प. आशियाचं वाळवंट बऱ्यापैकी पायाखालून घालता आलं, पण अफगाणिस्तान मात्र दूरचाच राहिला. रशीदच्या पुस्तकांमुळे तो जवळ आला. त्या अर्थानं रशीद भाग्यवान. त्याला या परिसरातून बातमीदारी करायला मिळाली. वार्ताहरांच्या हातावर वेगळी काही भाग्यरेखा असते की नाही माहीत नाही, पण ती रशीदच्या हातावर तरी नक्कीच असावी, कारण नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी हजर राहण्याचा भाग्ययोग त्याच्या आयुष्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंही त्या क्षणांचं सोनं केलं.
म्हणजे डिसेंबर महिन्यातल्या कुडकुडत्या सकाळी कंदाहारच्या रिकामटेकडय़ा बाजारपेठेत एका चहाच्या टपरीवर हा बसला होता. अशा ठिकाणी ज्या शिळोप्याच्या गप्पा होतात, त्याच वायफळतेत तो वेळ घालवत होता आणि त्या रस्त्याच्या टोकाला जरा काही झुंबड उडाली. अशा रिकाम्या वातावरणात कशानंही उत्सुकता निर्माण होते आणि माणसं दोन घटका गंमत बघायला तयारच असतात. तसंच काहीसं इथेही असेल असंच त्याला वाटलं. म्हणून सुरुवातीला त्यानं जरा दुर्लक्षच केलं, पण गडबड आणि उत्सुकता वाढली तसा तो उठला. तिकडे गेला. तर समोर रणगाडे- रांगेत- एकामागून एक येत होते.. नीट पाहिल्यावर त्याला दिसलं : ते सोव्हिएत रशियन बनावटीचे आहेत. ते पाहिलं आणि त्याच्यातला वार्ताहर जागा झाला.
कारण ती सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानातील घुसखोरीची सुरुवात होती. १९७९ साली जेव्हा रशियन फौजा या बकाल देशात घुसल्या तेव्हा तो क्षण नोंदविण्यासाठी रशीद तिथं हजर होता. त्याच्याआधी बरोबर एक वर्ष (१९७८ मध्ये) अफगाणिस्तानात बंड झालं होतं आणि महम्मद दौद यांची सत्ता स्थानिकांनी उलथून पाडली होती. त्या परिसरातील एकूणच यादवीचा तो आरंभ होता. त्याही वेळी रशीद काबूलमध्ये होता आणि जे काही घडत होतं त्याची जिवंत बातमीदारी करीत होता.
एखाद्या विषयाचा ध्यास असेल तर त्याच्याशी संबंधित चांगले योगायोगही आपल्या आयुष्यात घडू लागतात. असं होतं बऱ्याचदा. रशीदच्या बाबतीतही तसं घडलं. त्यामुळे नजीबुल्लाह यांना भर चौकात तालिबान्यांनी दिलेली फाशी असू दे वा बामियानच्या बुद्धाचं उद्ध्वस्त होणं असू दे, रशीदला बऱ्याच गोष्टींचं साक्षीदार होता आलं. इतकंच नाही तर पुढे अफगाण प्रश्नावर मॉस्को, वॉशिंग्टन, जेद्दाह, लंडन.. अशा अनेक ठिकाणी वेगवेगळय़ा निमित्तानं घडणाऱ्या चर्चा-परिसंवादांना जाता आलं. हे सगळं त्यानं मनापासून केलं, कारण त्याचा जीव त्या अफगाणिस्तानच्या रगेल मातीत गुंतलाय. इतका की, पदवी घेतल्यानंतर बलुचिस्तानात तो क्रांतिबिंती करण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळी पाकिस्तानचे लष्करशहा जनरल अयुब खान आणि याह्याखान यांच्याविरोधात बंडाळी करवण्याचा काहींचा प्रयत्न होता. त्याची तयारी बलुचिस्तानात सुरू होती, पण ते काही जमलं नाही. आपले गुडघे-ढोपरे फोडून घेऊन हरलेली ही पोरं सगळी मायदेशी परतली. हा उठाव तर चांगलाच फसला. तेव्हा आता पुढे काय, हा प्रश्न होता. अशा दिशा माहीत असलेल्या, पण वाट चुकलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय नेहमी असतो वर्तमानपत्रं. रशीदनं बरोबर तोच निवडला आणि तो बातमीदार बनला. लंडनचं ‘द टेलिग्राफ’, पुढे ‘फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’, नंतर ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ अशा मातबर दैनिकांत त्याला या सगळय़ा अशांत टापूंवर लिहायची संधी मिळाली. लंडनच्या ‘टेलिग्राफ’साठी तर तब्बल २० र्वष त्यानं अफगाणिस्तानातून बातमीदारी केली आणि हे सगळं केव्हा? तर अफगाणिस्तान खदखदत होता तेव्हा! त्यामुळे रशीद आज अफगाणिस्तानवरचा भाष्यकार म्हणून ओळखला जात असेल तर ते साहजिकच म्हणायला हवं.
त्याची पुस्तकं महत्त्वाची ठरतात ती याचमुळे आणि परत एकाच वर्षी निरनिराळ्या दिवाळी अंकांत १० रिपोर्ताज, १२ कथा वगैरे लिहिण्याच्या फंदात तो न पडल्यामुळे त्याच्याकडे असा सणसणीत ऐवज असतो आणि तो पूर्ण मन लावून तो पुस्तकात ओततो. ‘तालिबान : मिलिटंट इस्लाम, ऑइल अँड फंडामेंटलिझम इन सेंट्रल एशिया’ हे त्याचं पहिलं पुस्तक. किती र्वष घेतली असतील त्यानं ते लिहायला? मध्य आशियाचा हा अप्रतिम दस्तावेज तयार करायला त्यानं तब्बल २० र्वष घेतली. इतका चांगला रियाज झाल्यावर उत्तम स्वर न लागला तरच नवल. हे त्याचं पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की जवळपास पाच-सहा र्वष ते कायम बेस्ट सेलर यादीत क्रमांक एकवर राहिलं. २००१ सालच्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा न्यूयॉर्कमधले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते दोन ट्विन टॉवर्स दहशतवादी हल्ल्यात कोसळले. त्यानंतर काही काळ अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा बधिर झाली होती. अमेरिकेच्या कानाखाली इतका मोठा जाळ कोणीच कधी काढलेला नव्हता. तेव्हा भानावर आल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना तालिबान्यांची संपूर्ण, साद्यंत माहिती हवी होती. तेव्हा रशीदच्या ‘तालिबान’मधील शब्दन् शब्द सुरक्षा यंत्रणांनी छिनून काढला. नंतर तर तालिबानवरचं अधिकृत पुस्तकच बनलं ते.
या एकाच पुस्तकाच्या यशानं रशीदला शांत केलं नाही. तो लिहिताच राहिला. वेगवेगळ्या नियतकालिकांत, कधी ‘न्यूयॉर्कर’मध्ये तर कधी सीएनएन वाहिनीवर रशीद सतत चर्चेत राहिला. त्यामुळे माझ्यासारख्या त्याच्या चाहत्यांची कधीच उपासमार झाली नाही. एरवी ती झाली असती. याचं कारण असं की, ताजिकिस्तान, उजबेकिस्तान, अझरबैजान वगैरे नावं आपण फक्त पुस्तकांत किंवा प्रचंड बरंवाईट- बऱ्याचदा वाईटच- घडलं तर वर्तमानपत्रांतच वाचलेली असतात. ते देश म्हणजे काही मोठय़ा बाजारपेठा नव्हेत. तेव्हा तिथं माध्यमांना काही रस नाही. त्यामुळे या साऱ्या प्रदेशाविषयी माहितीचा मोठाच बारमाही दुष्काळ असतो. त्याला बऱ्याच प्रमाणात रशीदची पुस्तकं उतारा ठरली. हा सगळा परिसर जैव-राजकीय स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण अगदी दरिद्री आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याकडे कुणाचं लक्ष नाही. ही सगळ्यांनीच गाळलेली जागा रशीदनं अलगद भरून काढली. त्यातूनच त्याचं पुढचं पुस्तक आलं ‘जिहाद : द राइज ऑफ मिलिटंट इस्लाम इन सेंट्रल एशिया’. त्याचंही उत्तम स्वागत झालं. अर्थात एव्हाना तालिबान, अल कईदा.. वगैरे नावं सगळ्यांच्याच तोंडावर येऊन पडली होती. त्यामुळे हे पुस्तक काही ‘तालिबान’इतकं गाजलं नाही. असं होतंच. अर्थात पुस्तक गाजणं हा काही त्याच्या गुणवत्तेचा निकष असू शकत नाही. अभ्यासूंसाठी या पुस्तकाचं महत्त्वही तितकंच आहे. खूप तपशिलात जाऊन रशीद लिहितो.
त्याचं नंतरचं पुस्तक म्हणजे ‘डिसेंट इंटू केऑस : द युनायटेड स्टेट्स अँड द फेल्युअर ऑफ नेशन बिल्डिंग इन पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया’. हे थोडंसं विखुरलेलं आहे. म्हणजे त्याचे अनेक ठिकाणचे लेख त्यात आहेत. त्यामुळे त्याची वाचनीयता काही कमी झाली आहे, असं नाही.
रशीद पाकिस्तानात राहतो, लाहोरला. या सगळ्या परिसराविषयी त्याची मतं अभ्यासातून बनलेली आहेत. काही आपल्याला पटणार नाहीत. उदाहरणार्थ काश्मीरची तुलना तो पॅलेस्टिनशी करतो. त्याच्या युक्तिवादाला पुष्टी देणारेही बरेच आहेत. तेव्हा त्याच्या मताचा अनादर करणे हे योग्य नाही.
गेल्याच महिन्यात त्याचं ताजं पुस्तक आलंय. ‘पाकिस्तान ऑन द बिं्रक : द फ्यूचर ऑफ अमेरिका, पाकिस्तान अँड अफगाणिस्तान’. ते अजून वाचायचंय, पण त्याच्या आधीच्या पुस्तकांइतकीच प्रामाणिक मतं त्याच्या याही पुस्तकात असतील असं मानायला जागा आहे, कारण वर्तमानातल्या अनेक गाळलेल्या जागा त्यानं भरून काढलेल्या आहेत, आपल्या लिखाणानं. दखल घ्यायला हवी अशीच ही कामगिरी आहे.