बुक-अप : मूर्खाचे कटकारस्थान Print

गिरीश कुबेर, शनिवार, ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बातम्या देण्यासाठी एन्ऱॉनची माहिती जमवणाऱ्या कुर्त आयशेनवाल्ड या पत्रकाराकडे बातम्यांबाहेरची खूप माहिती साठत गेली. त्यानं आणखी माहिती जमवली आणि तयार झाली एन्ऱॉनच्या जन्माची, भरारीची आणि नंतरच्या घसरणीची कथा : ‘कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स’!  एन्ऱॉनचा फुगा आकडय़ांच्या चलाखीने फुगू देण्यात कुणाचे कसे हितसंबंध होते आणि तो फुटल्यावर या चलाख लोकांचं काय झाले, याबद्दलचं ‘द स्मार्टेस्ट गाइज इन द रूम’ हे पुस्तकही वाचनीय.

पण ही झाली एन्ऱॉनची अमेरिकेतली बाजू.  कधीच दिवाळखोरीत गेलेल्या या कंपनीची आपल्याकडची बाजूदेखील दुर्दैवानं तेवढीच- किंवा त्याहून अधिक वाचनीय ठरेल..
‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्जतजवळच्या फार्महाऊसमध्ये वीज गेली नसती तर कदाचित मीनाताई ठाकरे.त्यांची पत्नी.वाचल्या असत्या. पण तिथे वीज गेली आणि ठाकरे यांना विजेचं महत्त्व जाणवलं..’’ असं काहीसं कुर्त आयशेनवाल्ड सुचवतो आणि नंतर त्यातून ध्वनित होतं की ठाकरे यांच्या घरी जे काही घडलं त्याचा थेट संबंध एन्ऱॉनच्या दाभोळमधल्या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाशी आहे..
    परदेशी वृत्तसेवेसाठी हंगामी काम करत असताना तिथे माझा वरिष्ठ असणाऱ्यानं हा किस्सा मला सांगितला आणि आयशेनवाल्ड याचं एन्ऱॉनवरचं कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स हे पुस्तक वाचायचा सल्ला दिला. यातला योगायोगाचा भाग असा की या वृत्तसेवेसाठी मी एन्ऱॉन संबंधातीलच बातमीदारी करत होतो. महाराष्ट्र सरकारनं एन्ऱॉन करार स्थगित केला होता आणि नंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात न्या. कुर्डूकर आयोगाची स्थापना एन्ऱॉनच्या चौकशीसाठी करण्यात आली होती. विजेचा प्रश्न हा बघता बघता राजकीय बनून गेला होता आणि एन्ऱॉनचं आपण काय करतोय याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. त्या वृत्तसेवेत उच्चपदावर असणारा उदय खांडेपारकर (सध्या हा एका बहुराष्ट्रीय वृत्तसेवेचा भारतप्रमुख आहे) आणि ऊर्जा क्षेत्रावर तेथेच बातमीदारी करणारा श्रीराम रामकृष्णन (द इकॉनॉमिक टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचा विद्यमान संपादक) या दोघांचाही एन्ऱॉन प्रकरणाचा गाढा अभ्यास. तो पाहिला की जाणवत होता प्रादेशिक alt

पत्रकारितेतला उथळपणा. मोठय़ा वृत्तसमूहात वार्ताहरांना विषयवार अभ्यास करायला मिळतो. किंबहुना तो असावाच लागतो. त्यामुळे या दोघांनाही या सगळय़ातच प्रचंड माहिती होती. ती कशी मिळवायची, मिळालेल्या माहितीचं विश्लेषण कसं करायचं, त्याच्या मागचे वेगवेगळे कंगोरे, लपलेले धागेदोरे कसे शोधायचे.असं बरंच काही त्यांच्याकडून शिकायला मिळायचं. बातमीचे शब्द कसे जपून वापरायचे असतात, हेही जाणवत होतं. त्या वृत्तसेवेसाठी मी बातमी द्यायला संध्याकाळ उजाडायची. सात वाजायचे. थोडय़ा वेळानं न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज सुरू व्हायचं. आणि त्या वृत्तसेवेची विश्वासार्हता इतकी की त्या बातमीच्या तपशिलाच्या आधारे एन्ऱॉनच्या समभागांचा दर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये वरखाली व्हायचा. म्हणजे माझी बातमी इथून जातीये आणि परिणाम म्हणून एन्ऱॉनचे शेअर वरखाली होतायत.. हे बघणं हा अनुभव होता. पुढे मीही इकॉनॉमिक टाइम्समध्ये रुजू झालो. श्रीरामही तिकडे आला. एन्ऱॉनचा वाद चालूच होता. एव्हाना त्या वादानं आम्हाला भरपूर बातम्या पुरवल्या होत्या आणि त्याच्या आधारे आपापल्या ठिकाणी आम्ही भरपूर कौतुक करून घेतलं होतं. त्या अर्थानं आम्ही एन्ऱॉनचे ऋणीच होतो. या कंपनीचा वाद झाला नसता तर इतक्या बातम्या मिळाल्या नसत्या. साहजिकच त्या मिळाल्या नसत्या तर पदोन्नतीसाठी अंमळ थांबावं लागलं असतं. तर त्या एन्ऱॉनमय काळात वेळ मजेत जात असताना श्रीरामनं हे पुस्तक वाचायला दिलं. कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स.
    अवर्णनीय आनंद असंच त्याचं वर्णन करावं लागेल. वास्तविक हे मूर्खाचं कटकारस्थान कसं आपल्याकडेही सुरू आहे हे पाहायला मिळत होतं. म्हणजे २००१ सालच्या मे महिन्यातला एक प्रसंग तर मला अजूनही जसाच्या तसा आठवतोय. तेव्हाच्या महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) कार्यालयात एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने मला त्या दिवशी दुपारी भेटायला बोलावलं होतं. विषय अर्थातच होता एन्ऱॉनचा. तर आम्ही बोलत असताना दिल्लीहून देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या कार्यालयातून फोन आला. हा अधिकारी क्षणभर गांगरला. कारण फोनवर दुसरीकडच्या बाजूला असणारी व्यक्ती ही त्या वेळी देश चालवत होती. यांना लक्षात आलं फोन कशासाठी आहे ते. त्यांनी क्षणात स्वत:ला सावरलं. पलीकडच्या बाजूनं सांगण्यात आलं , एन्ऱॉन करार रद्द करू नका.. असा अमुकतमुक यांचा स्पष्ट निरोप आहे. या अधिकाऱ्याने ते ऐकलं. स्वत:ला सांभाळत, समोरच्याचा मान ठेवत तो एवढंच म्हणाला.. सर.. आता खूप उशीर झालाय.. एन्ऱॉनला वाचवता येणार नाही.
    समोरच्यानं सांगितलं-   पण त्यांचा  निरोप आहे..
   मग त्यांना सांगा अधिकृत शासन निर्णय म्हणून तो माझ्याकडे पाठवा;  मी त्याचं जरूर पालन करीन..  या आपल्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
    मला कल्पना आली. वातावरणात अचानक असं भारलेपण साचलं. समोरचा अधिकारी तणावाखाली होता हे स्पष्ट दिसत होतं पण त्या दबावाखाली निर्णय बदलायचा नाही, हा त्याचा निर्धारही चेहऱ्यावरून दिसत होता. त्यानं शेवटी स्वत:च्या निर्धाराचाच आदर केला. कारण दिल्लीहून अधिकृत निर्णय काही आला नाही..
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य वीज मंडळानं एन्ऱॉन करार रद्द केला.
तिकडे अमेरिकेतही एन्ऱॉनला घरघर लागायला सुरुवात झाली आणि या कंपनीनं केलेले आर्थिक घोटाळे आता बाहेर येऊ लागले होते. त्या सगळय़ा काळात एन्ऱॉनच्या रिबेका मार्क नावाच्या रूपगर्वित अधिकारी महिलेच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेला एक नव-‘मार्क’वादी वर्ग महाराष्ट्रात तयार झाला होता. रिबेकाचे कैसे वागणे, रिबेकाचे कैसे चालणे..अशी कवनं तेवढी लिहायची राहिली होती. या नव- ‘मार्क’वादात वाहून गेलेल्या विचारवंतीय वगैरे मंडळींनी स्वत:ला एन्ऱॉनशी जोडून घेतलं होतं आणि एन्ऱॉनला विरोध म्हणजे पापच अशी हवा तयार केली होती. या कंपनीची दुसरी बाजू समोर येतच नव्हती.
ते ऐतिहासिक काम केलं ते आयशेनवाल्ड याच्या पुस्तकानं. कुर्त स्वत: पत्रकार. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ऊर्ज क्षेत्रावर सातत्याने लिहिणारा. रोजच्या बातमीदारीय कर्तव्याचा भाग म्हणून एन्ऱॉनवर लक्ष ठेवणं हे त्याचं कर्तव्यच होतं. ते करताना खूप माहिती जमा होत गेली. बातमीसाठी आवश्यक तेवढा ऐवज मुबलकपणे वापरूनसुद्धा कुर्तच्या डायऱ्यांत बराच ऐवज शिल्लक राहत होता. तो एकसंधपणे मांडून एन्ऱॉनच्या जन्माची, त्याच्या उत्तुंग आर्थिक भरारीची आणि तितक्याच खोल घसरणीची सुरस आणि चमत्कारिक कथा सादर करायचं त्यानं ठरवलं आणि त्यातूनच या ‘मूर्खाच्या कटकारस्थाना’चा जन्म झाला.
विकसित देशांत व्यवस्था आकडेवारीला खूप महत्त्व देते. जी काही तुम्ही आकडेवारी सादर करता ती खरीच आहे असं समजून त्याच्या आधारे व्यवहार केले जातात. या व्यवहारांचा आकार बराच मोठा असतो. अनेकांची गुंतवणूक त्यात असते. त्यामुळे ही आकडेवारी, तिची सत्यासत्यता सतत तपासली जात असते. कोणत्याही पातळीवर तिच्या खरेपणाविषयी संशय आला तर संबंधित यंत्रणा आवाज उठवते, इतरांना सावध करते आणि प्रसंगी कारवाईचा बडगा उगारते. हे सगळं एन्ऱॉनच्या बाबतीत घडलं. या कंपनीनं आपल्या फायद्या-तोटय़ाची आकडेवारी खोटी दिल्याचा संशय आला. त्यावर संबंधित यंत्रणेने लक्ष ठेवायला सुरुवात केली. लक्षात आलं ते हे की जेवढा काही फायदा झाल्याचं कंपनी सांगतीये तेवढा तो नाही. किंबहुना फायद्यापेक्षा तोटाच आकाराने मोठा आहे. वास्तविक या कंपनीच्या खतावणीची तपासणी आर्थर अ‍ॅण्डरसनसारख्या जगात आदरणीय अशा व्यवस्थापन सल्लागार कंपनीनं केली होती. पण त्यांनीही लबाडी केल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्था नियंत्रण यंत्रणा इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा म्हणत या दोघांच्या मागे लागल्या. दोन्ही कंपन्या त्यात दोषी आढळल्या. दोघांनाही अतोनात शिक्षा झाली. इतकी की या दोन्ही कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला.
 वास्तविक एन्ऱॉनचे प्रमुख केनेथ ले हे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश यांचे अत्यंत निकटवर्तीय. बुश यांच्या निवडणुकीला एन्ऱॉनचा मोठा आर्थिक टेकू होता. ले हे बुश यांचे निवडणूक निधीप्रमुख होते. पण म्हणून त्यांना कोणतीही विशेष वागणूक मिळाली नाही. एन्ऱॉनचे बारा वाजवल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू झाला. डझनभर आरोप होते त्यांच्यावर. त्यापैकी १० आरोप सिद्ध झाले आणि तब्बल ६५ र्वष तुरुंगवासाची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. एखाद्या साध्या गुन्हेगाराला न्यावं, म्हणजे समोर पाटी, त्यावर नाव वगैरे.. तसंच ले यांनाही वागवण्यात आलं. कोणताही विशेषाधिकार वा सवलत नाही. एव्हाना त्यांच्या संपत्तीवरही टाच आली होती. अखेर ते शिक्षा सुरू व्हायच्या आधीच हृदयविकाराच्या झटक्यात गेले.
    हे सगळं आयशेनवाल्डनं पाहिलं. मुळात हे सगळं इतकं नाटय़पूर्ण आहे की आहे तसं लिहिलं तरी चाललं असतं. पण आयशेनवाल्डनं आपल्या प्रभावी भाषेनं हे एन्ऱॉनायण अधिक खुमासदार केलं आहे. वैषम्य वाटतं ते हे की एन्ऱॉननाटय़ाचा एक मोठा अंक या महाराष्ट्रात घडला. राज्यातले अनेक राजकारणी त्या खेळात वेगवेगळय़ा भूमिकांत होते. त्या त्या काळात त्याच्या बातम्या आल्या असतीलही. पण त्यातून आयशेनवाल्डसारखा ग्रंथ सिद्ध करावा, असं कोणालाच वाटलं नाही. खरं तर आपल्याकडचं नाटय़ अमेरिकेतल्या नाटकापेक्षा अधिक गहिरं आहे. अमेरिकेत कोणी तरी दोषी सापडतो, त्याला शिक्षा होते आणि नाटक संपतं.
 पण आपल्याकडे तसं कधीच होत नाही. एन्ऱॉन समुद्रात का बुडवला, मग बाहेर का काढला..त्या मागच्या राजकीय-आर्थिक alt
प्रेरणा कोणत्या होत्या.. कोणाकोणाचे हितसंबंध त्यात होते.. हे सगळं दैनंदिन रद्दीच्या पलीकडे जाऊन पुस्तकात नोंदवून ठेवावं असं कोणालाच वाटत नाही. असं वाटणारा आयशेनवाल्ड एकटा नाही. याच विषयावर बिथेनी मॅक्लिन आणि पीटर एलकाइंड यांनीही असंच उत्तम पुस्तक लिहिलंय. ‘द स्मार्टेस्ट गाइज इन द रूम - द अमेझिंग राइज अ‍ॅण्ड स्कॅण्डल्स फॉल ऑफ एन्ऱॉन.’ या कंपनीचं मुख्यालय अमेरिकेत हय़ूस्टन इथलं. अमेरिकेचं जॉज बुश घराणं ज्या राज्यातून येतं, त्या टेक्सास राज्याची हय़ूस्टन ही राजधानी. हे वाचल्यावर बुश, एन्ऱॉन, ले आदी संबंधांची साखळी सहज लक्षात येईल. तर एन्ऱॉनचा शासकीय दफनविधी झाल्यानंतर लगेचच हय़ूस्टनला जायची संधी मिळाली. तिथे उद्योगक्षेत्रातल्या अनेकांच्या गाठीभेटी झाल्या. भारतातून- त्यातही मुंबईतून- आणि पुन्हा पत्रकार म्हटल्यावर मी काही त्यांना विचारायच्या आधी तीच मंडळी एन्ऱॉनसंदर्भात विचारायची. त्यातला एक पूर्वी एन्ऱॉनमध्ये होता आणि भारतातही त्यानं काम केलं होतं. आपल्याला कसं अनेक बडय़ांना मॅनेज करावं लागलं.. हे तो नको इतक्या सहजपणे सांगत होता. हे सगळं आपणही ऐकून होतो तरी त्यातल्या एका नावाने तेव्हाही चपापायला झालं होतं कारण तटस्थ आणि निस्पृह वगैरे समजल्या जाणाऱ्या यंत्रणेशी ते संबंधित होते. त्यानंच द स्मार्टेस्ट गाइज.. या पुस्तकाची शिफारस केली. पुढे या पुस्तकावर याच नावाचा सिनेमाही बनला. बिथेनी तेव्हा  फॉर्च्यूनमध्ये होती आणि आता व्हॅनिटी फेअर या मासिकांत आहे. एके काळचा सहकारी पीटर याच्या मदतीनं लिहिलं गेलेलं तिचंही एन्ऱॉनायण वाचनीय आहे.
   मुद्दा अर्थातच हा की दैनंदिन पत्रकारिता करता करता आज आणि उद्याच्या पलीकडे जाऊन परवाचा विचार करत पुस्तक लिहायचं महत्त्व आयशेनवाल्ड, बिथेनी वगैरेंना वाटतं, त्यातूनच ते असा रसरशीत ऐवज निर्माण करतात आणि हे मूर्खाचं कटकारस्थान उघडं पडतं. त्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे गोपीनाथ मुंडे नुकतेच लोकसत्ता कार्यालयात आले होते. त्यावेळी एन्ऱॉनचा विषय निघाला होता..
या कटकारस्थानाची उजळणी त्या निमित्ताने..!