बुक-अप : पोलादी पडद्यामागचा खुनशी सूत्रधार.. Print

गिरीश कुबेर ,शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मारामाऱ्या करणारा मुलगा म्हणून शेजाऱ्यांना त्याची आठवण आहे.. केजीबीसाठी काम करायचं स्वप्न बाळगणारा हा मुलगा, पुढे राजकारणात यायचं ठरवून तिथून बाहेर पडला आणि रशियाचा अध्यक्ष झाला.. विषय म्हणून पुतिन खुणावत असतील, तर हे तपशील महत्त्वाचेच!
स्थळ : इस्तंबुल. नोव्हेंबर, २००५. वातावरणात म्हटलं तर थंडी. पण हातपाय आखडून टाकणारी नक्कीच नाही. उलट प्रसन्नपणे घराबाहेर काढणारी. एकतर हे गाव कमालीचं सुंदर. बायझंटाईन, रोमन, ऑटोमन अशी अनेक साम्राज्यं त्यानं पाहिलेली. आपण शाळेत असताना कॉन्स्टॅन्टिनोपल नावानं त्याचा परिचय झालेला.

आता त्याचं इस्तंबुल झालंय. कॉन्स्टॅन्टिनोपलपेक्षा इस्तंबुल कितीतरी सुरेख आहे. म्हटलं तर अरेबिक , म्हटलं तर युरोपिअन. एकाच वेळी ख्रिश्चन, इस्लामी अशा संस्कृतींचा परिचय देणारं. पण तिथला माझा जो यजमान होता त्याला तसं संस्कृतीशी वगैरे काही देणंघेणं नव्हतं. तो वास्तव्याला दुबईत असतो. तेलाच्या व्यापारातला गडगंज. त्याचं इस्तंबुललाही घर होतं. तेलाच्या व्यवसायात असल्यानं अनेक ठिकाणी- जिथं सर्वसामान्य जात नाहीत- त्याची ऊठबस होती. या क्षेत्रातल्यांना पडद्यामागून अनेक गोष्टी करायची सवय असते. कोण कोण काय काय उद्योग करतं हे माहीत असतं. या क्षेत्रात त्याचा अधिकार नोंद घेण्यासारखा होता. बाकीच्या बाबतीत तो इतका आंधळा होता की त्याला ओऱ्हान पामुक या नोबेल विजेत्या लेखकाचं घर इस्तंबुलमध्ये कुठे आहे, हे माहीत नव्हतं. पण कोणता भारतीय उद्योगपती इथे कोणाला भेटायला येतो आणि काय काय करतो. अशा चविष्ट पण निरुपयोगी माहितीचे तुकडे त्याच्याकडे सतत चघळायला असायचे. संपायचेच नाहीत. माझा तेलातला रस लक्षात घेऊन त्या दिवशी तो एकाला भेटायला घेऊन गेला. कोण, काय विचारलं, तर म्हणाला बघच. आधी सांगितलं तर तू येणारच नाहीस..
हे असं म्हटल्यामुळे उत्कंठा भलतीच ताणलेली.
बोस्फोरस या जगातल्या अतिरम्य म्हणता येईल अशा परिसरातल्या एका रेस्तराँमध्ये भेट ठरली. जागा अप्रतिम. पाण्याला समांतर अशी रेस्तराँची जमीन. प्रत्येक खिडकीतनं बाहेरचं पाणी दिसेल अशी व्यवस्था. संध्याकाळ उतरत होती. सीगल पक्ष्यांचे थवे शरीर अलगद पाण्यावर सोडून लाटेप्रमाणे वरखाली होत होते. आत टेबलाटेबलांवर काचेच्या पात्रांत मेणबत्या लावायला सुरुवात झाली होती. बाहेर पाण्यावर त्या मेणबत्त्यांच्या पिवळलाल प्रकाशाची प्रतिबिंबं पडत होती. आकाशातही तशाच रंगांचा प्रकाश. तिथून वितळून तो थेट असा समोर टेबलावर आल्यासारखा वाटावा. पण यातली मजा घेता येत नव्हती. कारण कोण येणार आहे भेटायला हे अजून कळत नव्हतं. दरम्यान, काचेच्या चिमुकल्या कपातनं दोनतीन वेळा त्याच मेणबत्तीच्या प्रकाशरंगाचा चहा येऊन गेला.
तर थोडय़ा वेळानं तो आला. तोपर्यंत बाहेर अंधार अधिकच गडद झालेला. रम्यता धूसरतेकडे झुकलेली.. आणि धिप्पाड अशा सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात तो आला. ते सुरक्षा रक्षक कुपोषित वाटावेत असा त्याचा देह. महाकाय. हनुवटी संपल्यावर लगेच बाहेर आलेली छातीच. देहाचा परीघ इतका की चालताना हात अर्धवर्तुळाकार फिरायचे आणि त्या टप्प्यात जे काही येईल त्याचा कपाळमोक्षच होईल असं वाटायचं. तो आलेला पाहिल्यावर माझा यजमान म्हणाला, आत चल. आता आम्ही एका खोलीत गेलो. माझ्या यजमानानं ओळख करून देताना हा अधिक जवळून पाहता आला. गोरागोरापान. शुद्ध वर्तुळाकार चेहरा. दाढी. अगदी भूमितीय पद्धतीनं कोरलेली. बसला. ओळख सांगितल्यावर मी थिजलोच. रशियातल्या चेचेन बंडखोरांचा तो नेता होता. यजमानानं सांगितलं : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात जे काही बंड सुरू आहे, त्याचं नेतृत्व हा करतोय.. पुतिन आणि केजीबी याच्या मागावर आहे. हे ऐकल्यावर मी सहज इकडेतिकडे बघितलं. कोणी आपल्या टेबलाकडे नजर ठेवून आहे का वगैरे.. त्याला इंग्रजी येत नव्हतं. आणि बोलायची फारशी इच्छाही दिसली नाही त्याची. काहीतरी पुटपुटत होता. ते माझ्या यजमानाला कळायचं. दोघांचे चेहरे आपले मी पाहत होतो. संभाषण असं काही नव्हतंच. एक नाव मात्र बोलताना दोनेकदा आलं. लिटविनेन्को. अध्र्या-पाऊण तासानं तो गेला. आम्ही जेवलो. येताना मी यजमानाला विचारत होतो त्या लिटविनेन्को नावाबद्दल. तो म्हणाला, तो केजीबीत होता.. आता पुतिनविरोधी उचापती करतोय. आता आला होता त्याचा मित्र आहे वगैरे. त्याच्याविषयी आणि या चेचेनविषयी बरंच काही चमचमीत कानावर आलं.
दुसऱ्या दिवशी माझं भल्या सकाळचं विमान होतं. मुंबईत घरी पोहोचल्यावर सवयीनं टीव्हीवर बीबीसी लावलं तर बातमी सुरू होती अलेक्झांडर लिटविनेन्को याच्या लंडनच्या रुग्णालयात झालेल्या गूढ मृत्यूची. मी गारच झालो. नाव कोणी घेत नव्हतं उघडपणे. पण त्याच्या मृत्यूमागे अध्यक्ष पुतिन यांचा हात होता असं सूचित केलं जात होतं. पुढे त्याचे अनेक तपशील आले.
पुतिन हे एक विषय म्हणून तेव्हा डोक्यात घुसले ते घुसलेच. पुतिन केजीबीत होते. त्यांच्याविषयी बरंच काही वाचायला मिळत गेलं. पुढे नाटो फौजांनी जॉर्जियावर केलेला हल्ला, तेलावर लिहीत असताना भेटलेली रशियाची युकोस ही बलाढय़ कंपनी, गाझप्राम आणि तो वादग्रस्त मिखाईल खोडोर्कोव्हस्की.. अशा सगळय़ातून रशिया आणि पुतिन ही रसाळ कहाणी तयार होत गेली. जेवढं जेवढं अधिक वाचायला मिळालं पुतिन यांच्याविषयी तेवढा तेवढा हा माणूस अधिकच वाचनीय होत गेला. त्यात सगळय़ात जास्त अशी आनंददायी भर घातली अत्यंत ताज्या पुस्तकानं.
‘द मॅन विदाउट अ फेस : द अनलाइक्ली राइज ऑफ व्लादिमीर पुतिन’ हे अगदी ताजं पुस्तक. एका मित्रानं कळवलं आवर्जून वाचच. म्हणून लगेच मिळवलं आणि मित्राच्या शिफारशीवरचा विश्वास अधिकच दृढ झाला.
लेनिनग्राडला अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय- खरंतर गरीबच म्हणता येईल अशा कामगारी घरात व्लादिमीर याचा जन्म. अभ्यासात हुशार वगैरे अजिबातच नाही. अत्यंत वांड म्हणता येईल असाच स्वभाव. मारामारी करणं हा छंद. लेखिका माशा गेसन हिनं पुतिन यांचे शाळासोबती वगैरे शोधून काढले. त्यांना भेटली. ते जिथं राहत होते तेव्हाच्या शेजाऱ्यांना तिनं हुडकून काढलं. त्यांच्या व्लादिमीरच्या लहानपणीच्या आठवणी नोंदवल्या. सगळय़ांतून पुढे आली ती एकच बाब. मारामाऱ्या करणारा व्लादिमीर. अनेकांनी त्याच्या मारामाऱ्यांच्या कौशल्याच्या आठवणी रंगवल्यात. अगदी हिंदी चित्रपटात शोभाव्यात अशा त्या आहेत. मुळातूनच वाचायला हव्यात त्या. त्यातूनच रशियन प्रकार सँबो आणि नंतर ज्युदो यात व्लादिमीर पारंगत झाला. कळायला लागल्यापासून एकच ध्यास होता त्याचा. तो म्हणजे, केजीबीत नोकरी करायची. केजीबीत लागलो रे लागलो की आपल्याला काही विशेषाधिकार मिळतात आणि जेम्स बाँडसारखंच आपण करू शकतो, असा काहीसा त्याचा समज होता. पुढे तो लागलाही केजीबीत. पहिली नेमणूक झाली ती ड्रेस्डेन इथं. हे झेक सीमारेषेवरचं गाव. त्या वेळी पूर्व जर्मनीत होतं, आणि पूर्व जर्मनी हा तेव्हाच्या सोविएत गटात होता. म्हणजे ही नेमणूक तशी काही शत्रुराष्ट्रातली नव्हती. त्यापेक्षा अमेरिकेच्या गटातल्या पश्चिम जर्मनीत त्याची नेमणूक झाली असती तर जास्त रोमांचक काम करायला मिळालं असतं. ड्रेस्डेनमध्ये काही नव्हतं. नुसतं उद्योगांचा, वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा अहवाल मॉस्कोला पाठवायचा. इतकंच काय ते काम. पण तरुण व्लादिमीर केजीबीच्या प्रेमापोटी तेही करत राहिला. त्यातल्या त्यात उत्साहजनक एवढंच की व्लादिमीर तिकडे असतानाच पूर्व आणि प. जर्मनी यांना विभागणारी बर्लिनची भिंत कोसळली आणि या दोन्ही देशांच्या एकत्रीकरणाची- आणि अर्थातच शीतयुद्धाच्या शेवटच्या पर्वाची- सुरुवात झाली.
तिथून पुढे व्लादिमीरची नेमणूक झाली ती परत रशियात. लेनिनग्राडला. तिथल्या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांवर हेरगिरी करण्याचं काम त्याच्याकडे होतं. त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं ते इथेच. या विद्यापीठात त्याची गाठ पडली ती अनातोली सोब्चाक यांच्याशी. लेनिनग्राडचे महापौर होते ते. एव्हाना ९१ साल उजाडलं होतं. केजीबीनं अध्यक्ष मिखाइल गोर्बाचोव यांच्याविरोधात कधीच हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातला मोठा उठाव म्हणता येईल असा प्रयत्न त्या वर्षी घडला. हा क्षण व्लादिमीरनं साधला आणि थेट राजीनामाच देऊन टाकला केजीबीचा. त्याला आता राजकारण खुणावू लागलं होतं. सोब्चाक यांच्या कार्यालयात त्यानं सल्लागार म्हणून स्वत:ची वर्णी लावून घेतली. पहिला म्हणता येईल असा मोठा भ्रष्टाचार व्लादिमीर यांच्या नावावर इथेच घडला. लेनिनग्राडमधील उद्योगाचा भाग म्हणून जर्मनीशी कच्चा माल पुरवण्याचा करार त्यांनी केला. त्या बदल्यात लेनिनग्राडला धान्यसाठा दिला जाणार होता. त्यानुसार लेनिनग्राडमधून कच्चा माल गेला परदेशात. पण त्या बदल्यात आलं मात्र काहीच नाही. नऊ कोटी ३० लाख डॉलर्सचा हा सगळा व्यवहार होता. ही सगळी रक्कम पुतिन यांनीच घशात घातल्याचा संशय आहे. त्या संदर्भात त्यांची चौकशीही झाली होती. पुढच्या आयुष्यात अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे आहोत असा दावा पुतिन यांच्याकडून केला गेला. पण गेसन हिनं धारिष्टय़ दाखवत पुतिन म्हणतात तसे स्वच्छ नाहीत. असं पुस्तकात सोदाहरण दाखवून दिलंय. ‘धारिष्टय़ दाखवत’ असं एवढय़ासाठी म्हणायचं की पुतिन यांना विरोध करणारे अनेक पत्रकार अचानक गायब झाल्याचा इतिहास ताजा आहे. अगदी इंग्लंडमध्ये राहून पुतिनविरोधी लिहिणारेही अचानक दिसेनासे झाल्याच्या नोंदी आहेत.
तेव्हा अशा कराल राजकारण्याविषयी इतकं तपशीलवार लिहिणं असं अवघडच. आणि त्यात मॉस्कोत राहून हे सगळं करणं अधिकच अवघड. गेसन हिनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. गोर्बाचोव यांच्यानंतर रशियाचं नेतृत्व करणारे बोरिस येल्तसिन आजारी असताना त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांच्याच कार्यालयात असलेले व्लादिमीर पुतिन अध्यक्षपदासाठी योग्य वाटले. त्यांना वाटलं या माणसाला नेमून सूत्रं आपल्याकडेच ठेवता येतील.
अर्थातच त्यांचा हा अंदाज पुतिन यांनी खोटा ठरवला. सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत गूढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतिन यांच्याविषयीचं हे पुस्तक जगाच्या राजकारणावर प्रेम असणाऱ्यांसाठी आवश्यक वाचनच ठरेल. ते महत्त्वाचं अशा अर्थाने की रशिया म्हटलं की आपल्याकडे स्मरणरंजनात रंगणारा एक मोठा लेखकवर्ग आहे. स्टालिन, ट्रॉटस्की वगैरेंच्या पुढे काही हा विचारवंतांचा वगैरे वर्ग गेलेला नाही. त्यामुळे विद्यमान रशियाचं प्रतिबिंब आपल्याकडे माध्यमांत दिसतच नाही. तेव्हा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं.
पण आतापर्यंतचा रशियाचा इतिहास हा पक्षीय अभिनिवेशाला दूर ठेवत समजून घ्यायचा असेल तर आणखी एक पुस्तक नुसतं वाचनीयच नाही तर संग्रहणीयदेखील आहे, ते म्हणजे ‘द पेंग्विन हिस्टरी ऑफ मॉडर्न रशिया : फ्रॉम झारीझम टू द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’. क्रांती, नागरी उठाव, दहशतवाद ते आताची अवस्था अशा अनेक टप्प्यांवर रशिया समोर येत असतो. त्याची क्रमवार आणि तपशीलवार मांडणी लेखक रॉबर्ट सव्‍‌र्हिस यांनी या पुस्तकात अत्यंत उत्तमपणे केली आहे. रशियाचा राजकीय इतिहास देता देता या देशाच्या आर्थिक अवस्थेवर ते उत्तम भाष्य करतात आणि तो देश समजून घ्यायला त्यामुळे मदतच होते.
आता मे महिन्यात पुतिन पुन्हा सत्तेवर आलेत. त्यांना सत्तेवर आणणाऱ्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुका बनावट होत्या अशी नागरिकांची धारणा आहे. पण पुतिन यांना पर्वा नाही. अमेरिकेच्या डॉलरचं स्थान हिरावून रुबल्सला जगाचं चलन बनवण्याचं अशक्यप्राय असं स्वप्न ते बघतायेत.
..आणि त्याच वेळी गेले काही महिने रशियात मोठय़ा प्रमाणावर पुतिन यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की, पुतिन यांना राज्य करणं आता अवघड जाईल. त्या देशातनं पूर्ण आणि खरी माहिती मिळत नाही. अजूनही तिथला पोलादी पडदा पूर्णपणे हटलेला नाही. अशा वेळी त्या पडद्यामागचा खुनशी सूत्रधार आहे तरी कसा, हे जाणून घ्यायला या पुस्तकांमुळे मदतच होईल.