बुक-अप : ‘अंतरिम युगा’चा चरित्रकार Print

गिरीश कुबेर, शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दुसऱ्या महायुद्धानंतर अगदी आत्तापर्यंत युरोपात आणि जगात ‘इंटरिम एज’ किंवा अंतरिम- तात्पुरतं, सरतं आणि अस्थिरच ‘युग’ चालू आहे, असं टोनी ज्युडचं म्हणणं. चिमटीत पकडता न येणाऱ्या आणि ठाशीव चेहराच नसलेल्या या युगाचं व्यक्तिमत्व तो शोधतो. चरित्रकाराप्रमाणे या युगाच्या जडणघडणीचा आणि वाटचालीचा वेध घेतो..


ही  पृथ्वी भले सात खंडांत विभागली गेली असेल. पण या सातांपैकी खरी मजा आहे ती दोघांतच. आशिया आणि युरोप. आशिया कारण त्यात आपण आहोत म्हणून आणि आपल्या बरोबरीने चीन आणि प. आशियाचं, तेलानं रसरसलेलं वाळवंट आहे म्हणून; आणि युरोप अशासाठी की त्या खंडानं या सगळय़ांच्या जगण्याला आकार दिला म्हणून. बाकीचे पाच म्हणजे आहेत म्हणून आहे म्हणायचं. आता त्या अन्य पाचांत अमेरिका आहे. पण अमेरिकाही घडवली ती युरोपीय आणि आशियाईंनीच. आशियाच्या तुलनेत युरोप आकाराने काहीच नाही. पण या खंडानं आधुनिक जगाला काय काय दिलंय. काव्य. संगीत. चित्र. शिल्प. राजकीय विचार. वैज्ञानिक प्रेरणा. युरोपनं स्पर्श केलं नाही, असं जगण्याचं एकही अंग नसेल. तसं बघायला गेलं तर युरोप हा सातही खंडातलं शेंडेफळ. आकारानं तर पिटकाच. यातून रशिया आणि टर्की वगळलं तर अख्खा युरोप खंड म्हणजे फक्त ५५ लाख चौ. फुटाचा पसारा. आपल्या शेजारचा एकटा चीनच ९६ लाख चौ. फुटांत पसरलाय. तिकडे अटलांटिकच्या पलीकडचा ब्राझीलसुद्धा ८५ लाख चौ. फूट इतका मोठा आहे आकारानं. आणि आर्थिक आघाडीवर ज्या अमेरिकेशी युरोप स्पर्धा करू पाहतोय तो अमेरिका देश या दोन्ही देशांपेक्षा मोठा आहे. जवळपास ९८ लाख चौ. फुटांत अमेरिका विस्तारलेली आहे. मुद्दा इतकाच की युरोपला जरी खंड म्हणून म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात हा खंड अनेक देशांपेक्षाही लहान आहे. पण युरोपकडे जे आहे ते अनेक देशांकडे वा देशांच्या समूहाकडेही नाही. ताज्या आकडेवारीनुसार जवळपास ४६ देश आहेत या लहानशा खंडात. प्रत्येक देश म्हणजे स्वतंत्र संस्कृती आहे. स्वतंत्र भाषा आहे आणि स्वतंत्र अस्मिता आहे. या अस्मितेचे सांस्कृतिक कंगोरे इतके तीव्र आहेत की फ्रेंच हे इंग्रजांना हलके समजतात. या दोघांच्याही मते जर्मनी म्हणजे नुसता हडेलहप्प्यांचा देश. जर्मनांना वाटतं त्यांच्याइतकं अभियांत्रिकी कौशल्य आणि बौद्धिक संपदा कोणाकडेच नाही. ऑस्ट्रिया स्वत:ला सगळय़ात रोमँटिक समजतो तर स्वित्र्झलड नाक वर करून ब्राह्मणी पद्धतीनं इतरांपासून फटकून वागत असतो. इटलीची तऱ्हाच वेगळी. झेक, लक्झेंबर्ग, ग्रीक, स्पेन असे अनेक देश आपापल्या अस्मितेच्या वेगळय़ा चुली अजूनही टिकवून आहेत.
खरं तर दुसऱ्या महायुद्धानं युरोप बेचिराख केलं. या युद्धानं काळवंडलेल्या युरोपच्या जखमा अजूनही ठिकठिकाणी दिसतात. हे युद्ध, त्यानंतरचं शीतयुद्ध यामुळे हा खंडच विभागला गेला. हे महायुद्ध संपून जेमतेम सहा-सात र्वष होत असताना प. आशियाच्या वाळवंटात नवे वारे वाहू लागले. इजिप्तमध्ये उठाव होऊन गमाल नासर सत्तेवर आले. पुढे त्यांच्याच काळात सुवेझचा संघर्ष रंगला आणि त्यातूनच इंग्लंड आणि फ्रान्सचं नाक कापलं गेलं. अमेरिकेच्या आयसेनहॉवर यांनी मदत करायला नकार दिल्यानं या दोन्ही देशांना माघार घ्यावी लागली. त्या नंतरच्या चर्चेत अमेरिकाला सामोरं जाण्यासाठी आपण एकत्र यायला हवं असं फ्रान्स आणि जर्मनीनं सुचवलं आणि युरो ही संकल्पना जन्माला आली. ती प्रत्यक्षात यायला पुढे तीन दशकं जावी लागली. पण प्रत्यक्षात आली, हे मात्र खरं. त्यानंतर दशकभरानं १९८९ साली बर्लिनची भिंत  पडली. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले. इतकी र्वष झाली त्याला पण त्या दुहीच्या जखमांचे व्रण अजूनही कायम आहेत. बर्लिनमध्ये भर वस्तीतल्या रेल्वे स्थानकात पूर्वी पश्चिम आणि पूर्व जर्मनीच्या रहिवाशांची भेट होत असे. तिथे आता एक अप्रतिम वस्तुसंग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. मूळ चित्रफिती, ताज्या इतिहासकालीन वस्तू आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहय़ानं तिथं युरोपच्या इतिहासाला आपल्यासमोर जिवंत करतात.
तो इतिहास पाहत असताना त्याची सांगड मनातल्या मनात न कळतपणे वर्तमानाशी घातली जाते. तेव्हाचा आणि आताचाही एक मुद्दा आपल्याला आतून टोचायला लागतो. तो म्हणजे जर्मनी. तेव्हाही जर्मनी या पिटक्या युरोपीय देशांत दादा होता. आताही तोच दादा आहे. साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला नख लावणाऱ्या युरो प्रश्नावर सध्या जर्मनी आणि बरेच युरोपीय देश एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे या युरोपीय समुदायातून ग्रीस बाहेर जायचं म्हणतोय. फिनलंडचंही काही खरं नाही. पोर्तुगाल आणि स्पेन या दोघांना प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं. इटलीत तर या आर्थिक संकटानं पंतप्रधानांचाच बळी घेतला. ग्रीसलाही नवं सरकार आणावं लागलं. तेव्हा युरोपचं.. आणि मर्यादित प्रमाणात आपलंही.. काय होणार हे समजून घेणं ही काळाची गरजच आहे. मुळात तिकडच्या घटनांचा इथं.. पुण्या-मुंबईत.. काही परिणाम होतोय, हेच पहिल्यांदा अनेकांना खरं वाटत नव्हतं. आता ते वाटायला लागलंय. तेव्हा युरोप हे प्रकरण काय आहे, हे मुदलातून समजून घेणं हे अत्यंत आनंददायी आहे.
तो आनंद वाढला एका मित्रानं टोनी ज्युड याचं पोस्टवॉर हे पुस्तक वाच म्हणजे वाचच असा सल्ला दिला आणि मी तो पाळला alt

तेव्हा. आधुनिक युरोपचा अद्वितीय इतिहासकार असं टोनीचं वर्णन अनेक अभ्यासकांनी केलंय. टोनी मूळचा इंग्लंडचा. निधर्मी अशा यहुदी (म्हणजे ज्यू) घरात जन्मलेला. वाचनाची लहानपणापासूनच आवड. त्यातूनच पंधराव्या वर्षी या पठ्ठय़ानं यहुदी धर्मगंडा बांधायचं ठरवलं. साहजिकच आई-वडिलांना काळजी वाटली. कारण पोरगं असं काही करणार म्हणजे अभ्यासाची बोंब व्हायची. पण टोनीनं ती होऊ दिली नाही. वयाची विशी गाठायच्या आतच मी कडवा यहुदी आणि कडवा मार्क्‍सवादी असे दोन्ही अनुभव घेऊन आलोय, असं टोनी म्हणायचा. पुढे केम्ब्रिज विद्यापीठात इतिहासाचं रीतसर शिक्षण घेतलं त्यानं. त्या अभ्यासात बरीच पारितोषिकं मिळाली त्याला. तिथेच त्यानं पीएच.डी. केलं आणि नंतर शिकवायलाही लागला. पुढे तो पॅरिसलाही गेला. तिथेही तो शिकवण्याचं काम करत होता. त्याचं फ्रेंच उत्तम होतं. फ्रेंचमध्ये त्यानं काही पुस्तकंही लिहिली. समस्त फ्रेंचांचे आवडते जाँ पॉल सार्त् यांच्या विचारसरणीला कशा मर्यादा होत्या हे त्यानं तिथं राहून, फ्रेंच भाषेत लिहून सांगितलं. साहजिकच फ्रेंचांना तो काही तितकासा आवडला नाही. त्याच काळात न्यूयॉर्क विद्यापीठानं त्याला प्राध्यापकीसाठी विचारलं. हा अमेरिकेला गेला. तो लिहायचा खूप. वर्तमानपत्रात, न्यूयॉर्क रिव्हय़ू ऑफ बुक्स अशा अनेक ठिकाणी. त्यातून त्याची स्वतंत्र मांडणी समोर येत गेली.
हा कम्युनिझमला घरघर लागली होती तो काळ. अफगाणिस्तानात घुसल्यानंतरचा खर्च सोविएत रशियाला पेलवेनासा झाला होता. युरोपमध्ये नवे वारे वाहू लागले होते आणि मिखाइल गोर्बाचोव यांच्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका यांनी नवी आश्वासक हवा तयार केली होती. त्याच वेळी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना इथं एका व्याख्यानाचं निमंत्रण होतं टोनीला. विषय होता युरोपचं भवितव्य. व्याख्यान देऊन तो परत निघाला. व्हिएन्ना रेल्वे स्थानकात गाडीत बसला. त्याच वेळी त्याच्या डोक्यात पहिल्यांदा कल्पना चमकली. आपण आधुनिक युरोपचा इतिहास लिहायला हवा.
त्यातूनच जन्माला आलं एक अप्रतिम असं पुस्तक. पोस्टवॉर : अ हिस्टरी ऑफ युरोप सिन्स १९४५. नावात म्हटल्याप्रमाणे यात अर्थातच महायुद्धोत्तर युरोपचा इतिहासच चितारण्यात आला आहे. जवळपास ९०० पानांचा जाडजूड ऐवज आहे. पण एकाही पानावर कंटाळा येत नाही की पुस्तक रेंगाळतंय असं होत नाही. अनेक अभ्यासकांनी पोस्टवॉरचं वर्णन मास्टरपीस असं केलंय. इतिहास म्हणजे केवळ घटनांची कालानुक्रमे मांडणी नसते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं वाचन फक्त अभ्यासकच करतात असं नाही. तर तो सामान्यांनाही वाचायचा असतो. तेव्हा सामान्यांना रसदार वाटेल आणि अभ्यासकांना थिल्लर वाटणार नाही अशी काळजी घेत इतिहास लेखन करायचं असतं. कसं? ते टोनीच्या या एकाच पुस्तकावरून समजून घेता येईल. इतिहासाची मांडणी करीत असताना, मोठय़ा मोठय़ा निर्णायक घटना सांगत असताना त्याच्या खाली छोटय़ा पण महत्त्वाच्या अनेक घटना घडलेल्या असतात. त्या टिपायची हातोटी असेल तर इतिहास अधिकच रंजक होतो. पोस्टवॉर तसं झालंय. म्हणजे टोनी सहज सांगून जातो, ब्रिटिशांना इजिप्तचं प्रेम होतं कारण त्यांचा भारतावर डोळा होता. पुढे भारताची जागा खनिज तेलानं घेतली. किंवा १९५१ सालात फ्रान्समध्ये दर १२ घरांपैकी एकाकडे मोटार होती. किंवा इटलीतल्या आइसक्रीम बाजारपेठेत सरकारी कंपनीचीच कशी मक्तेदारी होती. किंवा १९७० हे बौद्धिकदृष्टय़ा सर्वात अंधारलेलं वर्ष होतं. किंवा १९७९ साली जर्मनीत टीव्हीवर यहुदींवर झालेल्या अत्याचारांवरची वृत्तमालिका वातावरण बदलासाठी कशी महत्त्वाची ठरली. किंवा १९८२ साली युरोपियनाचं सरासरी उत्पन्न जर १०० एकक धरलं तर डेन्मार्कचा नागरिक सरासरी १२६ कमावत होता आणि त्याच वर्षी ग्रीसचं सरासरी उत्पन्न होतं फक्त ४४. त्याच्या या निरीक्षणाला दाद द्यायला हवी. कारण ग्रीसवर जो काही आर्थिकदृष्टय़ा अनवस्था प्रसंग ओढवलाय त्याची मुळं टोनीनं १९८२ सालीच पाहिली होती. इतिहासाची मांडणी करताना वर्तमानाकडे अंगुलीनिर्देश करायचा असतो. या पुस्तकात तसा तो सर्वत्र दिसतो. दुसरं महायुद्ध संपलं १९४५ साली. पण उर्वरित संपूर्ण शतकावर या महायुद्धाची सावली कायम राहिली. टोनी या कालखंडाला अंतरिम युग (इंटरिम एज) असं म्हणतो.
लिस्बनपासून लेनिनग्राडपर्यंत पसरलेला अवाढव्य भूप्रदेश टोनीनं या पुस्तकासाठी निवडलाय. त्यावरून त्याच्या ताकदीची कल्पना येऊ शकेल. इतकं मोठं वजन उचलताना दमछाक होते. त्याची ती अजिबात झालेली नाही. निवांतपणे त्यानं हे आधुनिक युरोपचं चित्रण केलेलं आहे. सहा भाषा, ३४ देश आणि ६० वर्षांचा कालखंड पेलायचा म्हणजे मोठा दमसास लागतो. टोनीनं तो पुस्तकभर दाखवलाय. या कालखंडात हा परिसर आमूलाग्र बदलला. हे बदल जितके राजकीय होते तितकेच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकही होते. पोस्टवारचं वैशिष्टय़ हे की ते हे सगळे बदल दाखवतं.
ते दाखवताना भाष्य करायचं असतं. किंबहुना ही भाष्य करायची ताकद हेच चांगल्या पुस्तकाचं आणि लेखकाचं वैशिष्टय़ असतं. टोनीत ती ताकद आहे. याचं कारण टोनी पुरेसा अलिप्त असा सामाजिक भाष्यकार, निबंधकार आहे. तो प्रस्थापितांना धक्के द्यायला कचरत नाही आणि विचार खंडन टाळत नाही. इस्रायलचा प्रश्न हा असाच त्याच्या अभ्यासाचा विषय. त्याविषयीही त्यानं भरपूर लिखाण केलं आहे. त्या विषयीच्या एका निबंधाची सुरुवातच मुळी प. आशियातील शांतता मोहीम आता काळाच्या पडद्याआड गेली आहे.या वाक्यानं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करणाऱ्या त्याच्या लेखाचं शीर्षक आहे : बुशस यूजफुल इडियट्स. इतकं विपुल आणि दर्जेदार लिखाण करणाऱ्या टोनीच्या पुस्तकांना, आणि त्यातही पोस्टवॉर या पुस्तकाला, बरेच पुरस्कार मिळाले नसते तरच नवल.
 २००८ साली टोनीला मोटार न्यूरॉन- म्हणजे विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आजारी आहेत त्या- व्याधीनं ग्रासलं. नंतर नंतर तर या व्याधीनं तो मानेखालनं लुळाच पडला. तरीही जीभ शाबूत होती. विचारप्रक्रिया अबाधित होती. त्यामुळे त्याचं लिखाण, भाषणं वगैरे सुरूच होतं. बीबीसीनं या काळात त्याची मुलाखत घेतली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं नो ट्रायम्फ, नो ट्रॅजेडी. पण हळूहळू त्याचं अपंगत्व वाढत गेलं. टोनी शरीरानं थकत गेला. नंतर तर तो गेलाच.
 सर्व समाजाला अस्वस्थ करणारं सत्य सांगायची कला म्हणजे इतिहासलेखन, असं टोनीचं मत. ते सांगतानाच तो पुढे म्हणतो.सर्व समाजाला, समाजातील एखाद्या घटकाला बरं वाटावं म्हणून गोड गोड खोटं सांगणं.म्हणजे इतिहासलेखन नाही. संबंधित दुखावले तरी चालतील पण मी सत्यच सांगीन.. ही इतिहासलेखकाची भूमिका हवी.
बरं झालं टोनी भारतात जन्माला नाही आला ते. हे असलं काही त्याला नक्कीच करता आलं नसतं.
पण अशा टोनीची प्रतीक्षा आपल्याला आहे. असा एखादा टोनी ज्युड आपल्याकडेही निपजेल.आणि मुख्य म्हणजे अशा टोनींना जगू आणि लिहू देईल.असं वातावरण त्या आधी आपल्याकडे जन्माला येईल.. अशी आशा अंतरिम या युगाच्या चरित्रकाराच्या स्मरणार्थ बाळगायला हवी.
परवाच्या गुरुवारी, ६ ऑगस्टला, टोनीला जाऊन बरोबर दोन र्वष झाली.. त्या निमित्तानं.