बुक-अप : समर्थाच्या घरचे.. Print

गिरीश कुबेर, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे पाळीव प्राणी, हा राष्ट्रव्यापी चर्चेचा विषय होतोच आणि पुस्तकांचाही होतो.. अध्यक्ष श्वानप्रेमी की मार्जारस्नेही, त्यांचे ‘पेट’ कुठल्या जातीचे, यावरून त्यांची प्रतिमा ठरते. पण हे सारं प्रतिमेसाठी चाललेलं नाही, त्यामागे प्रेमाचा धागा आहे, हे लक्षात येण्यासाठी प्राणीपालनाचं वेड मुळात असायला हवं!


१९४४ सालची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक. म्हणजे काय माहोल असेल बघा. दुसरं महायुद्ध तापलेलं. जपानच्या पर्ल हार्बरवरच्या हल्लय़ाला तीन वर्षे झालेली. अमेरिकाही त्यामुळे युद्धात उतरलेली. युरोपभर सगळीकडे संहाराची राख आणि रक्तमासाचा चिखल. काय होईल आणि काय नाही.अशी परिस्थिती. आणि त्यात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका. आता निवडणुका म्हटल्या की प्रचाराची राळ उडणार. आरोप-प्रत्यारोप होणार आणि दोन्ही उमेदवारांना काही ना काही कारणासाठी टीकेचं धनी व्हावं लागणार. हे ओघानं आलंच. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांनाही एका मुद्दय़ावर वर्तमानपत्रांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. नेहमीचेच आरोप. रूझवेल्ट यांनी उधळपट्टी केलीये..सरकारचा पैसा अकारण खर्च केलाय..
कशामुळे झाला हा उधळपट्टीचा आरोप?
 झालं होतं असं की निवडणूक प्रचारात हिंडताना एका बेटावर रूझवेल्ट सहकुटुंब गेले होते. सहकुटुंब म्हणजे पत्नी एलिनॉर आणि अत्यंत लाडका कुत्रा फाला. ते येताना काय झालं नक्की ते कोणालाच माहिती नाही..पण फाला त्या बेटावरच राहून गेला. झालं. अध्यक्षांच्या घरचा कुत्राच राहतो म्हणजे काय.. या अध्यक्षांचा त्याच्यावर एवढा जीव की त्याला आणण्यासाठी नौदलाचं एक जहाजच्या जहाज त्या बेटावर परत पाठवण्यात आलं.
टीकेचा विषय झाला तो हाच. जनतेच्या कराच्या पैशाचा अध्यक्षानं असा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षानं टीकेची झोड उठवली. त्यात टीकेला आणखी धार आली ती त्या बातमीच्या केलेल्या व्रात्यपणातून. रूझवेल्ट यांनी आपल्या कुत्र्याला शोधण्यासाठी एक युद्धनौकाच पाठवली.. असं तिथले जे कोणी केजरीवाल वगैरे असतील त्यांनी सांगायला सुरुवात केली. बघता बघता हा मुद्दा भलताच गाजला. इतका की रूझवेल्ट यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी २३ सप्टेंबरला आरोपांच्या उत्तरार्थ एक भाषण केलं..
या रिपब्लिकनांना केवळ मी, माझी बायको, मुलगा यांच्यावर टीका करून समाधान मिळेनासं झालंय. आता ते माझ्या फालालाही टीकेत ओढू लागलेत. हे फारच झालं. मी, बायको.. वाटलं तर मुलगा यांच्याबाबत तुम्ही काहीही बोला ना.. माझी काहीही हरकत नाही. पण फालावरही टीका? रिपब्लिकनांना हे कळणारदेखील नाही.. तो त्यामुळे किती अस्वस्थ झालाय ते.. त्यांना समजायला हवं की फाला हा काही कोणी साधा कुत्रा नाही. स्कॉटिश टेरियर आहे तो. त्याला जेव्हापासनं कळलंय की मला त्याच्यामुळे काही ऐकून घ्यावं लागतंय.. रिपब्लिकनांचे कथाकार वाटेल ते बोलू लागलेत.. तेव्हापासून तो दु:खी आहे.. त्याचा जातिवंत स्कॉटिश जीव बंड करून उठलाय. ही टीका झाल्यापासून फाला पूर्ण बदललाय.. माझ्यावरच्या टीकेला मी घाबरत नाही, त्याची दखलही घेत नाही.. परंतु फालाविषयी जर कोणी काही वेडंवाकडं बोलत असेल तर त्याचा निषेध करण्याचा पूर्ण अधिकार मला आहे आणि मी तो पूर्ण ताकदीने बजावणार..
रूझवेल्ट यांचं हे भाषण प्रचंड गाजलं. इतकं की अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात ते फाला स्पीच म्हणूनच ओळखलं जातं. या भाषणाचा इतका चांगला परिणाम झाला की रूझवेल्ट यांच्यावरची टीका अमानुष ठरवली गेली आणि किती सहृदयी राजकारणी आपला अध्यक्ष आहे अशी प्रतिमा तयार झाली आणि ते प्रचंड मताधिक्याने पुन्हा निवडले गेले. त्यांच्या फालाची महती इतकी होती की यूएसएस ऑगस्टा या अमेरिकी युद्धनौकेवर जेव्हा अटलांटिक सनद नावानं ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक करारावर विन्स्टन चर्चिल आणि रूझवेल्ट यांनी जेव्हा स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा फालासुद्धा त्या घटनेचा साक्षीदार होता. अर्थात त्या करारास एक पाय वर करून त्यानं आपलीही मान्यता दिली किंवा काय याचा तपशील नाही. पण तो तिथे होता याच्या सर्व नोंदी आहेत. छायाचित्रंही आहेत. महायुद्धानंतर रूझवेल्ट गेलेच. पण फाला मात्र राहिला. फ्रँकलिन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी एलिनॉर या वर्तमानपत्रात माय डे नावाचा स्तंभ लिहायच्या. त्यात बऱ्याचदा हा फाला डोकावायचा. त्यांची सांगितलेली एक आठवण सांगायलाच हवी..
फ्रँकलिनच्या निधनानंतर १९४५ साली त्यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहण्यासाठी एकदा आमच्या घरी जनरल आयसेनहॉवर आले. ते येताना लष्कराचा, सुरक्षा रक्षकांचा पूर्ण ताफाच्या ताफा होता आणि त्यांच्यासाठी म्हणून आमच्या निवासस्थानाचं विशेष प्रवेशद्वार उघडलं गेलं. फ्रँकलिन गेल्यापासून ते बंदच होतं. पण ते उघडलं गेलं हे पाहिल्यावर फाला बंगलाभर नाचायला लागला.. धावपळ करायला लागला.. अनेकांना कळेचना त्याला काय झालं ते. काही वेळानं मला लक्षात आलं की फक्त रूझवेल्टच यायचे तो दरवाजा उघडला गेल्यामुळे फालाला वाटू लागलं, आला.. आपला मालकच आला. म्हणून तो आनंदानं नाचूच लागला. थोडय़ा वेळानं आयसेनहॉवर यांची गाडी आली. ते उतरले. हा पुढे जाऊन शोधू लागला..आणि रूझवेल्ट गाडीत नाहीत म्हणून हिरमुसला होऊन कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन बसला. मला खूप वाईट वाटलं त्याला पाहून. फाला माझ्याबरोबर राहायचा.. तसं त्यानं मलाही आपलं म्हटलं होतं. पण ती सोय होती.. फ्रँकलिन त्याच्या आयुष्यात पुन्हा येईपर्यंतची.
निसर्गनियमानुसार फ्रँकलिन काही पुन्हा आले नाहीत. ते येणारही नव्हते. नंतर बाराव्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी फालाच त्यांना भेटायला गेला. फँ्रकलिन डी रूझवेल्ट या माजी अध्यक्षाचं जिथं दफन करण्यात आलं होतं त्याला खेटूनच फालाही आता चिरनिद्रा घेतोय.
हे असं अनेकदा घडलंय. जनरल आयसेनहॉवर अध्यक्ष असताना त्यांचे उपाध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांच्यावर त्यांनी देणग्या लपवून ठेवल्याचा आरोप झाला. त्याची तीव्रता इतकी होती की निक्सन यांची तेव्हाच गच्छंती होणार होती. तेव्हा या आरोपांना उत्तर देण्यासाठी निक्सन यांनी टीव्हीवरनं भाषण केलं. त्यांनी सगळेच आरोप फेटाळले. ते म्हणाले.. जे आरोप होतायत त्यातली एकही देणगी मी घेतलेली नाही. मी लपवलेली असेल तर ती एकच देणगी. ती म्हणजे चेकर्स. माझा लाडका चेकर्स हा कॉकर्स स्पॅनियल जातीचा कुत्रा. तो आमचा जीव की प्राण आहे. मी वाटेल ते देईन. पण चेकरला हात लावू देणार नाही..
निक्सन यांचं हे भाषण चेकर्स स्पीच म्हणून ओळखलं जातं. त्याचा परिणाम इतका चांगला झाला की निक्सन यांना जीवदानच मिळालं. त्यांच्यावरचं बालंट टळलं. आणि त्यांचं भाषण ऐकून त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या सौ. मामी आयसेनहॉवर. त्यांनी आपल्या पतीला अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांना गळच घातली..एवढा सहृदय माणूस.. तो कसा काय इतका भ्रष्ट असेल.. तेव्हा त्यांना राहू द्या. युद्ध जिंकून देणाऱ्या या सेनानीनं घरच्या आघाडीवर पांढरं निशाण फडकावलं. निक्सन यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. अर्थात पुढे त्यांनी वॉटरगेट उद्योग केल्यावर सौ. आयसेनहॉवर यांची प्रतिक्रिया काय होती हे कळायला मार्ग नाही. पण तेव्हापासनं एक झालं.
अध्यक्षांचे आवडते पाळीव प्राणी हा अमेरिकी समाजजीवनात मोठय़ा आवडीने चघळायचा विषय बनला. हर्बर्ट हूवर हे तर आपल्या प्रचारात आपला लाडका जर्मन शेफर्ड- ज्याला सर्वसाधारण अल्सेशियन म्हणतात- घेऊन सगळीकडे जायचे. त्या काळी त्यांच्या या रुबाबदार कुत्र्याबरोबरची छायाचित्रं प्रचारात अनेकदा छापली जायची. जर्मन शेफर्ड हा जातीनंच राजबिंडा. त्यामुळे त्या वेळी हूवर यांच्यापेक्षा त्यांच्या कुत्र्यालाच पाहून मतदान झाल्याचं बोललं गेलं होतं. असो.
आता ज्या समाजात अध्यक्षांचा कुत्रा वा मांजर यांना इतकं महत्त्व दिलं जात असेल तर त्याच्यावर पुस्तकं निघाली नसती alt

तरच आश्चर्य वाटायला हवं. या विषयावर गप्पा मारताना प्राण्यांवर माणसांपेक्षा अंगुळभर जास्तच प्रेम असलेल्या एका मित्रानं एक पुस्तक ‘वाचच..’ असा सल्ला दिला. दोन पायी जिवांबरोबर कर्तव्य म्हणून राहावं आणि आनंदासाठी चार पायांनाच जवळ करावं या त्याच्या मताशी मीही सहमत असल्यानं ते पुस्तक लगेचच मिळवलं. त्याचं नाव ‘प्रेसिडेन्शियल पेट्स : द वियर्ड, वॅकी, लिटल, बिग, स्केरी, स्ट्रेंज अ‍ॅनिमल्स दॅट हॅव स्टेड इन द व्हाइट हाउस’. नावाप्रमाणेच पुस्तकाची कल्पना भलीमोठी आहे. ज्युलिया मोबर्ग यांनी ते लिहिलंय आणि जेफ आल्ब्रेख्तची रेखाचित्रं आहेत. प्रत्येक अध्यक्षाचे आवडते प्राणी, त्याच्यावर केलेली कवनं, त्यांची गमतीशीर रेखाचित्रं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या प्राण्यांच्या गमतीदार कथाही त्यात आहेत. आपण चर्चा फक्त कुत्र्या-मांजऱ्यांचीच करतोय. परंतु व्हाइट हाउसमधे थॉमस जेफर्सन यांच्या काळात दोन दोन अस्वलं पाळली गेली होती आणि ज्वॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांनी तर चक्क मगरच पाळली होती. हे वाचून काय चित्र उभं राहिलं..व्हाइट हाउसमध्ये गूढगहन आंतरराष्ट्रीय समस्येवर तावातावानं चर्चा सुरू आहे आणि  आपला अवजड देह आणि त्याहूनही अवजड तोंड वेंगाडत, पोट घासत घासत ज्युली किंवा तत्सम नावाची मगर येतीये.. समोरच्याची बोबडीच वळत असावी. अनेक प्रश्नांचा निकाल अमेरिकेच्या बाजूनेच का लागतो त्याचं उत्तर बहुधा या मंडळींत.म्हणजे अस्वल, मगर वगैरे.. दडलेलं असावं.
एक पुस्तक मिळालं म्हटल्यावर आणखी कोणी कोणी काय लिहिलंय ते शोधलं. त्यात आणखी एक उत्तम ऐवज हाती आला. ‘फर्स्ट डॉग्ज : अमेरिकन प्रेसिडेन्ट्स अँँड देअर बेस्ट फ्रेंड्स’. म्हणजे पहिला नागरिक असतो, तसे अमरिकेतले प्रथम मानांकित श्वान. रॉय रोवन आणि ब्रुक जॅनेस यांनी हे पुस्तक लिहिलंय. आता नावावरनंच कळतंय की हा फक्त श्वानेतिहास आहे ते.  एका अर्थानं अन्यायकारकच. विशेषत: मार्जार कुलावर. असो. पण लिहिलाय तो मात्र वाचावा असा इतिहास आहे. अब्राहम लिंकन हा तसाही मोठाच माणूस. पण त्याचा लाडका कुत्रा होता फिडो नावाचा हे कळल्यावर तो जास्त आदरणीय वाटू लागतो. दुर्दैव हे की ज्याप्रमाणे अब्राहम लिंकन यांचा अंत झाला तसाच फिडोचाही झाला. त्याचीही हत्याच झाली. तिथपासून ते विद्यमान व्हाइट हाउसवासी बराक हुसेन ओबामा यांच्या बो या चौपायी सदस्यांपर्यंत सगळय़ाचाच आढावा त्यात घेण्यात आलाय. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा कुत्रा चांगला फॉक्सहाउंड जातीचा होता तर बिल क्लिंटन यांचा त्यांच्याप्रमाणेच आनंदी असा लॅबड्रोर जातीचा. बुश यांचा त्यांच्याप्रमाणेच गोंधळलेला दिसणारा स्प्रिंगर जातीचा मिली. या सगळय़ाचा तपशील यात आहे. यातला लेखक रॉय रोवन हा लाइफ, टाइम आणि फॉच्र्युन अशा तगडय़ा मासिकांसाठीचा वार्ताहर होता. त्यामुळे लिखाणात सहजता आहे आणि वाचकांना काय आवडेल याचा पूर्ण अंदाज त्याला आहे. तो या पुस्तकातनं दिसतोय. आणि दुसरं असं की ही नियतकालिकं लिखाण उत्तम होईपर्यंत ते अगदी घोटवून घेतात. त्यामुळे काम चांगलंच होतं. परत हे पुस्तक लिहिताना त्या त्या वेळची अमेरिका, तिथलं समाजजीवन, त्याची छाया आणि रेखाचित्रं..असंही दिलं गेल्यामुळे सगळाच आनंदी आविष्कार त्यात आहे.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी अध्यक्ष श्वानप्रेमी आहे की मार्जारकुलाशी त्याचं सख्य आहे याच्या जाहीर चर्चा झडतात आणि आपलं प्रेम अध्यक्षाला जाहीर करावं लागतं. श्वानप्रेमी म्हणजे स्वभावानं तो कसा असेल याचे आडाखे बांधले जातात आणि अगदी त्याच्या मनी मार्जारसख्यच असेल तर तो कोणत्या प्रसंगी काय करेल याचे अंदाज केले जातात.
आपण अर्थातच या सगळय़ापासून काही योजने दूर आहोत. पण आज ना उद्या तिथे पोचूच. मग आपल्या पंतप्रधानांना कोण आवडतं.मनमोहन सिंग यांच्या ‘७ रेसकोर्स’मधले श्वान..सोनिया गांधी यांच्या स्वयंपाकघरामागच्या मार्जारकन्या, अटलबिहारी बाजपेयी यांच्या घरातले स्वांतसुखाय बोके यांचाही धांडोळा घेतला जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतात त्या वर्षांवर कोणते कुत्रे..फार वाईट शब्द आहे हा, पण इलाज नाही.. जमतात त्याचीही चर्चा होईल. अर्थात जात प्रकरण हे आपल्याकडे फार नाजूक असल्यानं या श्वानजातींचा उल्लेख कसा करायचा हा प्रश्न पडेल. असो.
ही पुस्तकं अर्थातच नेहमीच्या वाचकांसाठी नाहीत. प्राण्यांकडे पाहून तोंड वेंगाडणाऱ्यांसाठी तर नाहीच नाहीत. शहाणपणानं, जमाखर्चाचे ताळेबंद मांडत जगणाऱ्यांनाही ही पुस्तकं आवडणार नाहीत. ही पुस्तकं वेडय़ांसाठीच आहेत.     
हे वेडेच तर जगात महत्त्वाचे. अन्यथा हिशेब ठेवण्यापलीकडे शहाण्यांच्या हातून दुसरं नाहीतरी होतंच काय? अशा हिशेबाच्या चौकटीत स्वत:ला न अडकवून घेणाऱ्यांसाठी..

alt
फर्स्ट डॉग्ज: अमेरिकन प्रेसिडेन्ट्स अँड देअर बेस्ट फ्रेंड्स
ले: रॉय रोवन आणि ब्रुक जॅनेस
प्रकाशक :अ‍ॅलोग्विन बुक्स
पृष्ठे १६३
किंमत ९. ९५ डॉलर

प्रेसिडेन्शियल पेट्स: द वियर्ड, वॅकी, लिटल, बिग, स्केरी, स्ट्रेंज अ‍ॅनिमल्स दॅट हॅव स्टेड इन द व्हाइट हाऊस.
alt
- ज्युलिया मोबर्ग आणि जेफ अल्ब्रेख्त
प्रकाशक : चार्ल्सब्रिज
पृष्ठे: ९६  हार्डकव्हर
किंमत. १०.१७ डॉलर
(वि. सू.- ही पुस्तके कोठे मिळतील या माहितीसाठी लेखकाशी संपर्क साधू नये.)