गोष्टी भावभावनांच्या : एकटेपण Print

altआई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हल्ली बरीच मुलं एकुलती एक असतात अशावेळी मला कुणी समजून घेऊ शकत नाही, ही भावना घर करू शकते आणि काही वेळा ती भावना प्रबळ होऊन मुलं एकाकी होऊ शकतात. अशावेळी गरज असते ती त्याच्या मनात डोकवण्याची. ती आई-बाबांचीच जबाबदारी आहे.  
वि क्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला पुन्हा खांद्यावर घेऊन तो चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा, तुझ्या जिद्दीचं आणि संतुलित विचार करण्याच्या क्षमतेचं कौतुक वाटतं. म्हणून तुला वेगवेगळ्या घरांच्या गोष्टी दाखवून तुझी परीक्षा घ्यावीशी वाटते. बघ.
आपल्या दप्तरातल्या लॅच कीनं कुलूप उघडून ओंकार घरात शिरला. घरात रोजच्याप्रमाणेच कोणी नव्हतं. ‘सहापर्यंत येते, डब्यातला खाऊ खा’ असं लिहिलेल्या आईच्या चिठ्ठीवरून त्यानं हळूच हात फिरवला. कपडे बदलून, थोडं खाऊन टीव्ही लावला, तेवढय़ात वरच्या मजल्यावर राहणारे त्याचे दोघं मित्रं समीर-सलील हे भाऊ खेळायला आले. दोघांनी मिळून आईची कशी मजा केली ते सांगत ते खिदळत होते. त्यांचं एकमेकांना टाळ्या देत हसणं पाहून ओंकारच्या नजरेत क्षणभर एक वैषम्य तरळून गेलं. ‘तुम्ही दोघं मिळून किती मजा करता रे. मला असं काहीच करता येत नाही.’ तो म्हणाला. ‘असं काही नाही रे. आमची चिक्कार भांडणं, मारामाऱ्यापण होतात.’ समीरनं त्याची समजूत काढली. ‘आईबाबांनी आमच्यासाठी काहीही आणलं तरी आम्हाला वाटून घ्यावं लागतं. मग आम्हाला तुझा हेवा वाटतो.’ सलील म्हणाला. ‘एकटा आहे म्हणून लाड होतात, सगळं माझं एकटय़ाचं असतं हे माहितीय रे मला, पण मारामारी आणि वाटावाटीलापण घरात कुणीतरी असायला हवं.’ ओंकार म्हणाला.  
तिघांचं बराच वेळ काही काही खेळून झालं. मग सलीलनं एक हजार पीसेसचं जिगसॉ पझल आणि स्वप्निलनं मेकॅनो काढला. ओंकारनं एकदम त्यांच्यावर झडप घालून खेळ काढून घेतले आणि तो चिडून म्हणाला, ‘‘नाही देणार तुम्हाला. तुम्ही सगळे पीसेस इकडेतिकडे टाकता. मग मला आई रागावते आणि गेमपण पूर्ण होत नाही. त्यापेक्षा बागेत फुटबॉल खेळू या.’’
‘‘तुझंच काय ऐकायचं? ’’ यावरून भांडाभांडी होऊन दोघं घरी गेले.
* * *
थोडय़ा वेळानं ओंकारची आई ऑफिसमधून आली. त्याला एकटाच पाहून तिनं विचारलं तेव्हा ओंकारनं भांडणाचं सांगितलं. पण आई वेगळ्याच मूडमधे होती. ‘‘ओंकार, पुढच्या आठवडय़ात बाबा येतोय पंधरा दिवसांसाठी.’’
‘‘हे!  आता धमाल. आठ महिने झाले ना ग आई?’’
‘‘ हो ना. ओंकार, आपल्याला घर एकदम चकाचक करायला पाहिजे बरं का. असला पसारा आता चालणार नाही. बाबाला आल्यावर एकदम छान वाटायला पाहिजे.’’
‘‘ माझा पसारा लगेच आठवलाच तुला. बाबा येणार असला ना, की तू एकदम वेगळीच वागतेस. माझ्याकडे लक्षच देत नाहीस आई. तुम्ही दोघंच बोलत बसलात की मला बोअर होतं.’’
‘‘ओंकार, हे फार होतंय हं. एवढय़ा दिवसांनी येतोय बाबा आणि तुला आनंद होण्याऐवजी बोअर होतंय का? तुझ्यावर किती जीव आहे त्याचा. निम्म्या बॅगा तुझ्या खेळणी आणि कपडय़ांनीच भरलेल्या असतात त्याच्या. शिवाय ट्रीप, भटकणं किती करतो आपण. तरीही तो आला की दोनतीन दिवसांत तुझी धुसफुस सुरू होते. या वेळी असं मुळीच चालणार नाही.’’ ओंकार एकदम चूप झाला.
* * *
आई कामाला लागली. मघाचं भांडण विसरलेला ओंकार समीर-सलीलकडे गेला. काकूंच्या मैत्रिणी आल्या होत्या. ते दोघं घरात नव्हते. परत फिरताना आपलं नाव कानावर पडलं म्हणून तो थांबला. सलीलची आई मैत्रिणींना सांगत होती,  ‘‘हा ओंकार, आत्ताच भांडला समीर-सलीलशी. एका म्हणून खेळण्याला हात लावू देत नाही इतरांना. वडील परदेशी असतात जास्ती. मुलांना त्या खेळण्यांचं आकर्षण वाटतं. पण हा एकुलता ना, तो म्हणेल तस्संच व्हावं लागतं त्याला. आईनंही लाडावून ठेवलाय. स्वार्थी होतात हो अशी मुलं. आमची दोघंही भांडतात, पण शेअिरगला ना नसते त्यांची.’’
ओंकारच्या डोळ्यांत नवल, दुख, राग सगळं एकाच वेळी तरळलं. परत घरी आला तर आई फोनवर आजीशी बोलत होती. ‘‘.. इतक्या दिवसांनी येतोय याचं काहीच नाही गं ओंकारला. म्हणजे आनंद झाला त्याला, पण आम्ही दोघं बोलत बसतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं म्हणे. रागावले तर रुसलाय. मघाशी मित्रांवर चिडला होता. नेहमीच होतं असं काहीतरी. एकुलत्या मुलांचं असंच होतं का गं? कसलंच शेअिरग जमत नाही का त्यांना?’’
* * *
वॉचमनच्या टिपू कुत्र्याला कुरवाळत अस्वस्थ ओंकार कॉलनीतल्या बाकावर एकटाच बसला होता. समोर खेळणाऱ्या मुलांमधून समीरनं त्याला पाहून हाक मारली. पण ओंकार गेला नाही.‘‘माझंच का चूक असतं रे टिप्या नेहमी? आई स्वार्थी म्हणते, समीरची आई मनमानी करतो म्हणते, असं कुठे करतो रे मी? एकुलती मुलं अशीच असतात म्हणे. एकुलती मुलं फार एकटी असतात ना रे टिप्या?’’ पाणावल्या डोळ्यांनी ओंकार टिप्याशी बोलत असताना दृश्य धूसर होत होत दिसेनासं झालं.
* * *
वेताळ म्हणाला, राजा, ओंकार असा एकटा का होतो? मुडी का वागतो ? इतर मुलांमध्ये त्याला मिसळता येणार नाही का? शेअिरगची सवयच नसल्यामुळे तो स्वार्थी होत चाललाय का? या प्रश्नांची उत्तरं माहीत असून तू जर दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं..
विक्रमादित्य म्हणाला, ओंकारची समस्या दोन पदरी आहे. ‘मी एकटा आहे’ अशी ओंकारच्या मनातली तीव्र होत जाणारी भावना आणि ‘एकुलती मुलं अशीच स्वार्थी होतात’ या गृहीतकाचा आजूबाजूच्या मोठय़ा माणसांवरचा पगडा. ओंकारची सोबतीची गरज लक्षात न घेता प्रत्येकजण आपापल्या मनातल्या गृहीतकाप्रमाणे त्याच्या वागण्याचा अर्थ लावतोय. ओंकार बराच काळ एकटा असल्यामुळे स्वतशीच सतत विचार करत राहतो. त्यामुळे आणि घडणाऱ्या प्रसंगांमुळे ‘मला कुणी नाही’ ही त्याची भावना पक्की होत राहते.
खरं तर ओंकार स्वार्थी वाटत नाही. तो खेळणी शेअर करतो. मेकॅनोसारखी पार्टस् हरवणारी खेळणी तो देत नाही, कारण आई रागावते. त्याला आपलं म्हणणं नीट शब्दांत, न चिडता सांगता येत नाहीये, एकूणच व्यक्त होता येत नाहीये हे जास्त खरं आहे. बाबांबाबतही तसंच झालंय. आई-बाबा बोलायला लागले की त्याला बाजूला पडल्यासारखं वाटतं हे तो खरं तर आईशी शेअर करायला पाहतो आहे, पण तिच्या मनातल्या ‘एकटी मुलं स्वार्थी होतात’ या गृहीतकाच्या भीतीमुळे ती विपर्यास करते. तो स्वभावानं कुढाही नसावा. समीर-सलीलचा हेवा वाटतो हे तो मोकळेपणानं मान्य करतो. अधूनमधून भांडायलाही कुणीतरी पाहिजे ही त्याची गरज मित्रांना कळते, ते त्याची समजूत घालतात, तिघंही थोडय़ाच वेळात भांडण विसरलेही आहेत. मोठी माणसं मात्र विषय भलतीकडे नेताहेत.
खरं तर बाबा येण्याचं कळल्यावर ओंकारला अतिशय आनंद झाला होता. तेवढय़ात आईनं त्याच्या पसारा करण्यावर बोट ठेवलं. मग त्यानंही आईबाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यावर बोट ठेवलं एवढं सहजही ते असू शकतं. पण आईला ते लगेच आजीशी बोलण्याएवढं गंभीर वाटतं.
समीर-सलीलची आईदेखील मुलांचं भांडण निष्कारण मोठं करून मैत्रिणींसमोर एकुलत्या मुलांबद्दलची मतं व्यक्त करते. त्यामागे ‘माझी मुलं कशी गुणाची’ हे दाखवण्याचा हेतू असेल किंवा ओंकारची आíथक सुबत्ताही खुपत असेल, पण त्यातून आपल्या मुलांच्याच वयाच्या त्यांच्या मित्राला आपण नकळत टाग्रेट करतो आहोत हे ती लक्षातच घेत नाही.   
ओंकार संवेदनशील वयात आहे. एकटा तर आहेच. त्याच्या भावना समजून न घेताच त्याची आणि समीरची आई आणखी चार लोकांशी त्याच्या स्वार्थीपणाबद्दल बोलतात याचा त्याला फार जास्त त्रास होतो. त्यांची संभाषणं ऐकल्यामुळे ‘मला कुणीच समजून घेत नाही’ हे  ओंकारच्या मनातलं गृहीतक पक्कं होतं. तो आणखी एकटा आणि अबोल होत जातो. त्याच्या वयासाठी कधी रुसणं, कधी रागावणं भावनिक चढउतार स्वाभाविक आहेत, आपल्या गृहीतकांमधून त्यांचा अर्थ लावतो आहोत हे मोठय़ांनी समजून घ्यायला हवं. आपल्या मनातली गृहीतकं तपासायला हवीत.
‘‘प्रत्येकानं नुसतं समजून घेऊन पुरेल राजा?’’
‘‘नाही पुरणार. ते कृतीत उतरलं पाहिजे. म्हणजे परस्परसंवाद वाढला पाहिजे. तो एकटा आहे आणि असणार, पण प्रत्यक्ष एकटेपणापेक्षा त्याच्या मनातली एकटेपणाची भावना त्याला जास्त त्रास देते. नीट व्यक्त होता न येणं आणि एकटेपणाच्या चक्रात फिरत राहणं या ओंकारच्या समस्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून घडणाऱ्या प्रसंगांमधली वस्तुस्थिती समजावून घेऊन,   कसं व्यक्त व्हावं याचे पर्याय त्याला आईबाबा, सलीलची आई वेळोवेळी दाखवू शकतात. संवादातून, कृतीतून त्याची एकटेपणाची भावना कमी करू शकतात. तो असताना त्याच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारल्या, सुट्टीचा कार्यक्रम ठरवण्यात त्याचा सहभाग घेतला तरीही त्याला दुर्लक्षित वाटणार नाही. आपल्या म्हणण्याचा विपर्यास होत नाही, समजून घेतलं जातं हा विश्वास आला की ओंकारलाही हळूहळू नीट व्यक्त होता येईल. मोठय़ांनी आपले गृहीतकांचे पडदे जरा दूर करून मुलांच्या मनात डोकावलं की सगळं नीट होतं रे वेताळा,’’ खांद्यावरून अदृश्य होणाऱ्या वेताळाला राजा म्हणाला.