गोष्टी भावभावनांच्या : श्रेष्ठत्त्व Print

आई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुटुंबात मोठय़ांच्या मनातच श्रेष्ठत्वाची संकल्पना रूढ झाली आणि त्यातून बाहेर येणं शक्य न होता उलट स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी जर त्याचा ढालीसारखा उपयोग होणार असेल तर घरातल्या छोटय़ावर त्याचा परिणाम होणारच. त्याची कुटुंबाशी असलेली जवळीक अलिप्ततेत बदलू नये म्हणून मोठय़ांनी वेळीच सावध असायला हवं..
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला खांद्यावर घेऊन तो पुन्हा चालू लागला. वेताळ हसत म्हणाला, ‘राजा, तुलाही माझ्या गोष्टींचा मोह सुटत नाही तर. ठीक आहे. बघ.’

* * *
तिसरीत पहिला आलेला मिहीर आईनं बक्षीस दिलेल्या गोष्टींच्या पुस्तकांकडे अभिमानानं पाहात होता. तेवढय़ात त्याचे आजोबा खेळण्यातली मोठ्ठी मशिनगन घेऊन आले. ‘बघ आई, अगदी खऱ्यासारखी वाटतेय. तू ‘नाही’ म्हणालीस तरी आबांनी आणलीच मशीनगन. भाऽरी. थॅंक्यू आबा.’  पुस्तकं टाकून मिहीरनं आबांकडे झेप घेतली. आई हसली, पण तिचा चेहरा उतरला होता.
‘‘मशीनगन ‘नाही’ म्हटलं होतं तरी का आणली आबांनी? माझ्या म्हणण्याची किंमत काय राहिली?  आईला वाटलच. मिहीरला वाटतं, ‘आई नाही म्हणते, आबा मात्र सगळं आणतात.’ मी दिलेल्या पुस्तकांना त्यानं दिवसभरात हातपण लावला नाही. बंदुकीशीच खेळत राहिला.’ रात्री आई बाबांजवळ फुणफुणली. ‘मी महाग मशीनगन आणू शकणार नाही असं वाटलं असेल आबांना. नेहमीचं आहे त्यांचं. मला कमी दाखवायची एकही संधी सोडत नाहीत ते. मिहीरच्या तोंडून शब्द निघण्याचा अवकाश, की वस्तू हजर..’ बाबाही वैतागले.
‘मिहीर सगळ्या नातवंडांत हुशार, चुणचुणीत, लाडका. मग तो जे करेल ते बरोबर. तोही आबा-आबा करत त्यांच्या मागे असतो. आबांचं हे पहिल्यापासून आहे. माझ्यात आणि अभयमध्येपण कायम पक्षपात करायचे. मी मोठा म्हणून कामं मी करायची, काही बिघडलं तर बोलणी मी खायची. अभय धाकटा - लाडाला कायम तो पुढे. आता तर काय? तो सॉफ्टवेअर इंजिनीअर. डॉलरमध्ये कमावतोय. मी आपला इथंच. त्यात माझं मार्केटिंगचं अनियमित उत्पन्न. मिळाले तर लाखांमधे नाहीतर दोनदोन महिने काहीच नाही. आबा तेही बोलून दाखवतात कोणाकोणापाशी.’
‘अहो, कुठल्याही विषयावरून तुम्ही पुन्हापुन्हा तिथेच का येता? लहानपणचं लहानपणी. आपल्याला आता काही कमी आहे का? मीपण कमावतेय ना? आबा अभयचं कौतुक करतात म्हणजे तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत बरं का.’ आई बाबांना समजावत म्हणाली.
‘ तुला नाहीच कळायचं. मला लहानपणीपासून माहितीय. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.’
 * * *
संतापलेल्या बाबांसमोर आठवीतला मिहीर खाली मान घालून उभा होता. ‘ असले दिवे लावायचे होते तर आयआयटीचं नाव काढतोस कशाला? आठवीपासून गणिताची तयारी व्हावी म्हणून महागडय़ा क्लासची चाळीस-पन्नास हजार रुपये फी भरली. जेवढे हजार गेले तेवढेही टक्के आणले नाहीस. खुशाल दांडय़ा मारल्यास? मागताक्षणी मिळतंय ना? किंमत नाही तुम्हाला कशाची..’ बाबांना संताप आवरतच नव्हता.
आबा मध्ये पडले. ‘ जाऊ दे दादा, किती रागावशील? अजून फार काही बिघडलेलं नाही. कधीतरी होते चूक मुलांकडनं. मित्रांच्या नादानं दांडय़ा मारल्या ते चुकलं म्हणतोय ना तो? एक संधी मागतोय ना? करेल तो. अजून चार र्वष आहेत. पोराचं तोंड किती उतरून गेलंय बघ.. ’ यावर बाबा थोडे शांत होताहेत तोवर बाबांच्या कानावर पुढची वाक्यं आदळली. ‘ तूसुद्धा बारावीला हेच केलंस म्हणून इंजिनीअिरगची अ‍ॅॅडमिशन हुकली तुझी. हवं तर पुढच्या वर्षांची फी मी भरतो ..’
आता बाबा आबांवर खवळले. ‘ तुमचं नेहमीचं आहे आबा. प्रश्न पैशांचा नाही, जबाबदारीचा आहे.. माझं झालं ते त्याचं होऊ नये म्हणूनच रागावतोय तर तुम्ही त्याच्यासमोर माझी ..  
 ०             
नवीन बाइकवर मित्राला राइड देताना मिहीर सांगत होता, ‘ आयआयटीला गेलास तर बाइक घेऊन देईन, असं आबा म्हणाले होते, त्यांनी शब्द पाळला. बाबा मात्र अजून आठवीचंच काढतायत. म्हणाले, ‘अ‍ॅडमिशन मिळाली असली तरी चार र्वष जायचीत. मिहीरच्या अभ्यासात सातत्य नाही. कशाला लगेच बाइक देता?’ बाबांकडून मला फारसं कौतुक कधी मिळालंच नाही रे. सगळे लाड आबांनीच केले. आई बाबा कशाला ‘नाही’ म्हणाले की मी लगेच आबांना सांगतो. त्यामुळे बाबा आमच्या दोघांवरही चिडतात. घरात सहजपणानं वागताच येत नाही. ट्रिगरवर बोट ठेवलेल्या लोडेड गनसारखं वाटतं आमचं घर मला.  कोणत्या क्षणी बाबांचा भडका उडेल, आबा एखादंच वाक्य बोलून त्यात तेल ओततील आणि त्याचा ताण येऊन आई कधी रडायला लागेल हे सांगताच येत नाही. निमित्त नेहमी माझंच असतं. पुढच्या वर्षी इथल्या कॉलेजात नसलेला विषय निवडून दुसऱ्या कुठल्या तरी गावात ट्रान्सफर घ्यावीशी  वाटतेय ’
मिहीरची बाइक वळणावर दिसेनाशी झाली त्यासोबत राजाला दिसणारं दृश्यदेखील.
*   *   *         
वेताळ म्हणाला, ‘राजा, मिहीरच्या घरातल्या वातावरणात एवढं बारूद का भरलंय? मिहीरला घरात राहणं नकोसं होतंय, बाबांबद्दल जवळीक वाटत नाही हे गंभीर नाही का? कुणाचं चुकतंय?  माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं..’
राजा म्हणाला, ‘ कोणाचं चुकतंय हे शोधण्यापेक्षा जे चुकतंय ते ‘कशामुळे’ चुकतंय ते शोधायला हवं. बाबा आणि आबांच्या मनातली ‘श्रेष्ठत्वाची संकल्पना’ आणि बाबांच्या मनातली स्वीकाराची गरज हे या समस्येच्या मुळाशी आहेत वेताळा. एखाद्याला लाडावून आपल्या बाजूला करून घेणं हे आबांच्या स्वभावात थोडंसं असावं. त्या व्यक्तीच्या नजरेत आपण कायम दुसऱ्यापेक्षा वर दिसलं पाहिजे ही त्यांची गरज असावी. याउलट अभयसारखा किंवा मिहीरसारखा आपला स्वीकार आबा करत नाहीत या अस्वीकाराच्या भावनेनं लहानपणापासून आजतागायत बाबांचं मन व्यापलेलं आहे. त्यांना स्वत:च्या आणि इतरांच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करायचंय. या आपापल्या गरजांमधून ती दोघं एकमेकांशी युद्ध चालल्यासारखं वागतात. एवढंच नव्हे तर दुसऱ्याचा आत्मसन्मान दुखावणं हा स्वत:चा आत्मसन्मान जपण्याचा मार्ग समजतात.  
बाबांच्या लहानपणी कदाचित परिस्थिती एवढी चिघळलेली नसेल. बहुतेक घरांमध्ये धाकटय़ा मुलाचे होतात तसेच अभयचे लाड कदाचित आबांनी केले असतील. त्या वेळी त्यांच्या मनात थोरल्याला दुखवण्याचं नसेलही. पण आवडत्यावर छाप पाडण्याची सवय आणि मुलानं अपेक्षित गुण दाखवले की अति कौतुक यामुळे मिहीरचे बाबा लहानपणापासून ‘माझ्यात काहीतरी कमी आहे’च्या चक्रात सापडले असावेत. त्यात त्यांची इंजिनीअिरगची हुकलेली अ‍ॅडमिशन आणि अभयची चौफेर प्रगती. यातून बाबा स्वत:च्या मनातूनही उतरून गेले. मात्र स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी त्यांनी आबांच्या स्वभावाचा आधार घेतला आणि मतभेदांना युद्धाचं स्वरूप आलं असावं. त्यांच्यातल्या संघर्षांचं मूळ आईला समजतंय. तसा आबांच्या वागण्यातून अनेकदा तिचाही मान राहात नाही पण ती पूर्वग्रह धरून बसत नाही. उलट बाबांना त्यातून बाहेर काढायला पाहते. पण बापलेक आपल्या वागण्याच्या कारण आणि परिणामांकडे पूर्वग्रहाशिवाय पाहातच नाहीत तेव्हा ती हळूहळू हतबल होत अखेर रडण्यापर्यंत पोहोचते.
आपल्या बोलण्या-वागण्यातून मिहीर आईबाबांपासून दुरावतो आहे हे आबांच्या लक्षात येत नाही. आई ‘नको’ म्हटली असताना मिहीरला बंदूक देण्याऐवजी, ‘तू सारखा बंदुकीशीच खेळशील आणि पुस्तकं वाचणार नाहीस म्हणून आई  ‘बंदूक नको’ म्हणत असणार. तू पुस्तकं वाचायचं प्रॉमिस केलंस तर आई ‘हो’ म्हणेल. मग आपण बंदूक आणू’ असं आबा करू शकले असते. त्यात आईचा, तिच्या हेतूचाही मान राहिला असता आणि आबांनी बंदूक दिल्याचा आनंदही राहिला असता.
मिहीर आठवीला चुकीच्या संगतीमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा सुरुवातीला आबांची भूमिका घरातल्या ज्येष्ठ माणसाची असावी तशी समंजस व प्रगल्भ वाटते. मात्र मिहीरच्या नजरेत  वर राहण्याच्या गरजेतून शेवटच्या क्षणी ते बाबांवर वार करतात.  
आबांचा स्वभाव ओळखून मिहीर त्यांच्या मागेमागे राहून हवं ते पदरात पाडून घेतोच आहे. तो लाडावला असला तरी विचारी आहे. यांच्या युद्धात तो शस्त्रासारखा वापरला जात असला तरी सुदैवानं त्यात तेल ओतून घरातल्या विसंवादाचा फायदा उकळत नाही. मात्र मोठेपणी अलिप्त होत जातो. घरापासूनच दूर जाण्याचा विचार करतो. हे गंभीर आहे.
‘ मग आता काय करायचं राजा?’
‘‘परस्परांबद्दल प्रेम असूनही कुटुंब आनंदात राहू शकत नाही. सर्वामधला दुवा असणारा मिहीर घरापासून तुटला तर घर कोलमडेल हे मोठय़ांनी निदान आता तरी समजून घ्यावं. आपल्या श्रेष्ठत्वाच्या कल्पना आणि गरजांमधून बाहेर यावं. स्वत:च्या वागण्याकडे त्रयस्थपणे पाहून स्वत:वरचा पूर्वग्रहांचा पगडा त्यांनी समजून घेतला तर परस्परांच्या हेतूबद्दलची गृहीतकं सोडता येतील. आयुष्यभर धरून ठेवलेले पूर्वग्रह आपण ठरवलं म्हणून ताबडतोब निघून जात नाहीत. ते पुन्हापुन्हा डोकं वर काढतात. पण त्यांच्याकडे पाहायला शिकल्यावर त्यांची शक्ती कमी होते. त्यातली निर्थकता आणि बालिशपणा लक्षात आला, तर यापुढे टाळता येतो. त्यातून भांडणांची तीव्रता टप्प्याटप्प्यानं कमी होत जाते. पण त्यासाठी परस्परसंवाद हवा, स्वत:च्या वागण्याकडे त्रयस्थपणे पाहता यायला हवं, पूर्वग्रह सोडण्याची इच्छा प्रामाणिक हवी आणि संयम हवा. समस्या ‘घराची’ आहे हे ओळखून आपलं बालिशपण सोडून एकत्रित प्रयत्न करणं मोठय़ांना जमेल का वेताळा?’
राजा थांबला तसा विचारांतून भानावर आलेला वेताळ काहीही न बोलता अदृश्य झाला.