महात्मा गांधी यांच्याविषयीचे गैरसमज दूर करणाऱ्या पुस्तकाचे आज प्रकाशन Print

प्रतिनिधी
लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधी यांच्या विचार आणि तत्त्वांचा पुरस्कार भारतासह जगभरात केला जातो. सध्याच्या परिस्थितीत ‘गांधीवाद’ अनेक समस्यांचे निराकरण करू शकेल, असा विश्वास काहीजणांना वाटतो तर काहीजण ‘गांधीवाद’ कालबाह्य़ झाल्याचे मानतात. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमजही आहेत. हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न  स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.
कुलकर्णी यांनी दोन वर्षांच्या संशोधनातून ‘म्युझिक ऑफ द स्पिनिंग व्हील- महात्मा गांधी मॅनिफॅस्टो फॉर द इंटरनेट एज’ हे पुस्तक लिहिले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्याचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, उद्योगपती मुकेश अंबानी, ‘टाटा सन्स’चे कार्यकारी संचालक आर. गोपालकृष्णन हे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आयोजित चर्चासत्राचे सूत्रसंचालन गीतकार प्रसून जोशी करणार असून हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसहा वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र, मंत्रालयासमोर, नरिमन पॉइंट येथे होणार आहे.
नॅनो तंत्रज्ञान, सौरऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान याद्वारे होणाऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या आदर्श जगाचे स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे का, पैसा आणि नैतिकता यांची सांगड घालता येईल का, इंटरनेट हा गांधी यांच्या चरख्याचा आधुनिक अवतार आहे का आदी प्रश्नांची सकारात्मक उत्तरे या पुस्तकात मिळतात.