नात्यांची वीण उलगडणारा ‘साद’ Print

मलेशियात चित्रित झालेला मराठी चित्रपट
प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षक करमणूक म्हणून चित्रपट पाहायला जातात. म्हणूनच गंभीर विषय करमणूक आणि विनोद करता करता मांडायचे, असे आम्ही ठरविले आणि आई-वडील-मुलगा-मुलगी-सासरे यांच्या नात्यांतील गुंतागुंत हा गंभीर विषय ‘साद’ या चित्रपटातून हाताळला, असे पटकथा-संवाद लेखक आणि अभिनेता दीपक देऊळकर यांनी सांगितले. या चित्रपटाचे मलेशिया-सिंगापूर येथे चित्रीकरण करण्यात आले आहे.
आपण दत्तक पुत्र असल्याचे समजल्यानंतर खऱ्या आईचा शोध घेण्याचे नायक ठरवितो या कथानकाभोवती चित्रपट गुंफलेला आहे. अनलेश देसाई आणि अवंतिका ही नवोदित जोडी या चित्रपटाद्वारे झळकणार आहे. मराठी चित्रपटात ‘सिक्स पॅक अ‍ॅब’ असलेला नायक प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे चित्रपटाचे वैशिष्टय़ असल्याचे देऊळकर यांनी सांगितले. संगीतप्रधान चित्रपट तरीही गंभीर विषय विनोदाच्या अंगाने मांडणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हेमंत दाभाडे यांनी केली आहे.